Tuesday, June 19, 2012

आवळा, चिकू लागवड कशी करावी

आवळा लागवडीसाठी हलकी ते मध्यम जमीन निवडावी. लागवडीसाठी कृष्णा, कांचन, चकय्या, नीलम या जातींची निवड करावी. लागवडीसाठी एप्रिल महिन्यात 7 x 7 मीटर अंतरावर 1 x 1 x 1 मीटर अंतराचे खड्डे करून 20 किलो शेणखत, दीड किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि शिफारशीत कीडनाशक भुकटी आणि मातीच्या मिश्रणाने भरून घ्यावेत. चांगला पाऊस झाल्यावर कलमांची लागवड करावी. लागवड करताना एकाच जातीची कलमे न लावता दोन ते तीन जातींची निवड करावी. त्यामुळे फळधारणा वाढण्यास मदत होते. 
चिकू लागवडीसाठी चांगल्या निचऱ्याची जमीन निवडावी. लागवडीसाठी खिरणीचा खुंट वापरून तयार केलेले कलम निवडावे. लागवडीसाठी 10 X 10 मीटर अंतरावर 1 X 1 X 1 मीटर अंतरावर खड्डे खणून त्यामध्ये माती, तीन घमेली शेणखत, दोन किलो सिंगल सुपर फॉस्फेट, 100 ग्रॅम कार्बारिल भुकटी यांच्या मिश्रणाने भरावेत. लागवडीसाठी कालीपत्ती, क्रिकेटबॉल जातींची निवड करवी.


http://www.agriplaza.in/agri-guide.htm

मत्स्यशेतीसाठी कोणत्या जाती निवडाव्यात

मत्स्यशेतीसाठी लागणारे मत्स्यबीज विविध जातींचे म्हणजेच कटला, रोहू, मृगल हे भारतीय प्रमुख कार्प असून, चंदेरा, गवत्या, सायप्रिनस या चिनी माशांचा वापर करतात. मत्स्यबीज संचयनाचे प्रमाण 5000 ते 10,000 नग प्रति हेक्‍टरी एवढे असावे. या मत्स्यबीजांचा आकार कमीत कमी दोन इंचापेक्षा लांब असला पाहिजे. मत्स्यबीज शक्‍यतोवर नजीकच्या केंद्रावरून आणावे म्हणजे त्यांची मरतुक होणार नाही. 

मत्स्यबीज घेताना ते चांगल्या प्रतीचे व योग्य प्रमाणात आहेत याची खात्री करून घ्यावी. यावरच मत्स्यशेतीचे उत्पादन अवलंबून असते. लांबच्या ठिकाणावरून मत्स्यबीज आणावयाचे असल्यास ते ऑक्‍सिजन पॅक केलेल्या डब्यामध्ये आणावेत; मत्स्यबीजांची वाहतूक आणि संचयन थंड वेळेस करणे केव्हाही चांगले असते. मत्स्यबीज तलावापर्यंत आणल्यानंतर त्या प्लॅस्टिक पिशव्या तलावांमधील पाण्यामध्ये 15 ते 20 मिनिटे तरंगत ठेवावे. त्यानंतर तलावातील थोडे पाणी पिशवीमध्ये घेऊन नंतर हळुवारपणे मत्स्यबीज तलावात सोडावे. अशा पद्धतीने मत्स्यशेतीची पूर्वतयारी केल्यास निश्‍चितच फायदेशीर ठरते. 

माशांचे प्रमुख खाद्य प्लवंग असून, प्लवंग वाढीकरिता तलावामध्ये सेंद्रिय आणि रासायनिक खतांचा वापर करतात. सेंद्रिय खतामध्ये प्रामुख्याने शेणखत, पोल्ट्रीखत व गांडूळखत यांचा वापर करतात. प्रति हेक्‍टरी शेणखताची मात्रा 10,000 किलो एवढी वापरावी. ही मात्रा सुरवातीला 2000 किलो प्रति हेक्‍टरी द्यावी. त्यानंतर उर्वरित टप्प्याटप्प्याने वर्षभरात दिली जाते. यासोबत सिंगल सुपर फॉस्फेटची मात्रा 300 किलो प्रति हेक्‍टरी एवढी द्यावी. ही सर्व खते तलावामध्ये टाकण्यापूर्वी चुन्याची मात्रा 250 किलो प्रति हेक्‍टरी एवढी द्यावी. त्यामुळे तलावाच्या गाळामधील जीवजंतूंचा नायनाट होतो आणि पाण्याचा सामू स्थिर राहण्यास मदत होते. 
तलावामध्ये पाणी कमीत कमी पाच ते सहा फूट एवढे असावे. एक आठवड्यानंतर पाण्याचा रंग फिकट हिरवा होण्यास होण्यास सुरवात होते. याचाच अर्थ तलावामध्ये प्लवंगनिर्मिती सुरू झाली आहे. म्हणजेच माशांना आवश्‍यक असलेले नैसर्गिक खाद्य (वनस्पती व प्राणी प्लवंग) उपलब्ध आहेत. आता आपल्याला तलावामध्ये मत्स्यबीज संचयन करता येते. 


http://www.agriplaza.in/agri-guide.htm

शेळ्यांसाठी गोठा

बंदिस्त शेळीपालन करताना शेळ्यांची संख्या हळूहळू वाढवावी, त्याप्रमाणे विस्ताराच्या दृष्टीने गोठा बांधताना जागेची सोय ठेवावी. गोठा बांधणी ही शेतातील उपलब्ध साधन सामग्रीचा वापर करून करता येते. गोठा बांधताना शक्‍यतो गोठ्याची लांबी पूर्व-पश्‍चिम ठेवावी, जेणेकरून अति ऊन, पाऊस आणि वारा यांच्यापासून शेळ्यांचे संरक्षण होईल. गोठ्याच्या जमिनीवर शक्‍यतो माती, मुरूम, लाकडाचा भुस्सा, विटा यांच्या साह्याने चांगले दाबून धुम्मस तयार करावे. अशी जमीन हिवाळ्यात उबदार राहते व करडांचे व शेळ्यांचे थंडीपासून संरक्षण होण्यास मदत होते. शेतातील बाभळीच्या झाडांपासून खांब; तर तुराट्या, भाताचा पेंढा, गव्हाच्या पेंढ्या, तसेच बाजरीचे सरमाड यांचा वापर करून गोठ्याचे छत शाकारता येते. कुंपण तसेच गोठ्यातील कप्पे, भिंती तुराट्या, बांबूच्या पट्ट्यांचा वापर करून तयार करता येतात. गोठ्याचे छत हे नेहमीपेक्षा थोड्या जास्त उंचीवर शाकारावे, जेणेकरून हवा खेळती राहील, तसेच दुर्गंधी राहणार नाही. गोठ्याच्या छताला प्लॅस्टिक, पॉलिथिन अथवा खताच्या रिकाम्या पिशव्या शिवून केलेले आवरण / आच्छादन बसवल्यास पावसापासून जास्त संरक्षण मिळते. थंडीच्या दिवसांत गोणपाटाच्या साह्याने शेळ्यांसाठी, मुख्यत्वेकरून करडांसाठी ऊब राखता येते. एकेरी गोठ्यासाठी पूर्व व पश्‍चिमेकडून पत्र्यापर्यंत भिंतीचे बांधकाम व मोकळ्या पटांगणाच्या विरुद्ध बाजूकडून तीन ते चार फूट भिंत व त्यावर छतापर्यंत चेनलिंक जाळी बसवावी, तर मोकळ्या पटांगणाकडून जमिनीपासून चेनलिंक जाळी व त्याचेच दार बसवावे. दुहेरी गोठ्यासाठी (100 पेक्षा जास्त शेळ्यांसाठी) पूर्व-पश्‍चिम छतापर्यंत भिंती, त्यामध्ये लाकडाचे दार व दोन्ही बाजूंस आवार करून चेनलिंक जाळीचे कुंपण घालावे. छताला सिमेंटचे पत्रे लोखंडी अँगलचा वापर करून बसवावे. सिमेंटच्या अर्ध्या पाइपाच्या साह्याने एकेरी गोठ्यात पूर्व-पश्‍चिम लांबी असलेल्या भिंतीच्या बाजूने, तर दुहेरी गोठ्यात मधल्या जागेच्या दोन्ही बाजूंस जाळीच्या बाहेर जमिनीपासून साधारण एक ते दीड फूट उंचीवर गव्हाण बसवावी. या गव्हाणीची रुंदी एक फूट, साधारण तेवढीच खोली असावी. गव्हाणीच्या बाजूची जाळी ही लोखंडी पट्ट्यांच्या साह्याने मोठे कप्पे असलेली करावी, जेणेकरून शेळ्यांना त्या कप्प्यातून चारा खाणे शक्‍य होईल. पिण्याच्या पाण्यासाठी सिमेंटची एक टाकी गोठ्याबाहेर एका कोपऱ्यात ठेवावी.


http://www.agriplaza.in/agri-guide.htm

मसाला पिकांची लागवडसाठी कोणत्या पिकांची लागवड करावी

कोकणामध्ये उपलब्ध असलेल्या पाण्याचा ठिबक सिंचनाने कार्यक्षम वापर करून नारळ - मसाला मिश्र पिकांची लागवड करता येते. या बागेमध्ये नारळाच्या पिकाचा मुख्य पीक म्हणून अंतर्भाव असून, त्याची लागवड 7.5 x 7.5 मीटर अंतरावर करण्याची शिफारस केली आहे. या चार नारळांच्या मध्यबिंदूवर जायफळ, नारळ लागवडीच्या रेषेतील दोन नारळांच्या मध्य अंतरावर दालचिनी कलम आणि नारळाच्या बुंध्याजवळ प्रत्येकी दोन मिरी वेल लागवड करावी. नारळ, जायफळ यांच्या लागवडीसाठी 1 x 1 x 1 मीटर आकाराचे, तर दालचिनी आणि काळी मिरी लागवडीसाठी 0.60 x 0.60 x 0.60 मीटर व 0.30 x 0.30 x 0.30 मीटर आकाराचे खड्डे घेऊन त्यांच्या तळाशी वाळवी व हुमणी प्रतिबंधक कीटकनाशके वापरावीत. खड्ड्याच्या तळाशी कुजलेला पालापाचोळा अथवा गिरिपुष्पाचा पाला, दोन ते तीन घमेली चांगले कुजलेले शेणखत आणि शिफारशीनुसार सिंगल सुपर फॉस्फेट आणि चांगली माती यांच्या मिश्रणाने खड्डा भरून घ्यावा. खड्डा भरताना माती जमिनीच्या पृष्ठभागाच्या थोडी वर ठेवावी, जेणेकरून पाणी झाडाच्या बुंध्याशी साठणार नाही. खड्ड्याच्या चारही कोपऱ्यांवर किंवा मध्यभागी खुणेसाठी खुंट ठेवावे. 

नारळ व मसाल्याची पिके एकाच वेळी लावता येणार नाहीत. पहिल्या वर्षी विद्यापीठाने शिफारस केलेल्या प्रताप, टी x डी यांसारख्या नारळ जातींच्या जोमदार रोपांची निवड करून जून किंवा जुलैमध्ये लागवड करावी. त्याचबरोबर दालचिनीची लागवडही करावी. पहिली दोन वर्षे दालचिनीला सावली करावी. पाचव्या वर्षी जायफळ लागवड करावी. जायफळाला पहिली तीन वर्षे सावली करावी. त्याचप्रमाणे ऑक्‍टोबर व पहिल्या उन्हाळ्यात नारळाच्या झाडासही सावली करावी. बागेमध्ये सुरवातीच्या काळात केळी किंवा पपईची मिश्र पीक म्हणून लागवड केल्यास मसाला पिकांना सावली तर मिळतेच, शिवाय केळी, पपईच्या उत्पादनामधून बागेच्या व्यवस्थापनावर होणारा खर्चही काही प्रमाणात भागविता येतो. मिश्र पीक म्हणून सुरवातीच्या काळात अननसाचीही लागवड करणे शक्‍य आहे. सातव्या वर्षी नारळाच्या झाडाच्या बुंध्याजवळ मिरीच्या वेलांची लागवड करावी. तिसऱ्या वर्षाच्या सुरवातीला प्रथमतः दालचिनीच्या झाडांपासून उत्पन्न मिळण्यास सुरवात होईल. जायफळाचे झाड जरी तिसऱ्या वर्षी फुलोऱ्यावर येत असले, तरी उत्पादन हे अतिशय मर्यादित असते. सर्वसाधारणतः पाचव्या वर्षापासून नारळ (टी x डी) आणि दालचिनी यांचे उत्पन्न मिळू शकते. जायफळाची लागवड पाचव्या वर्षी असल्याने जायफळाचे उत्पन्न आठव्या वर्षापासून मिळू लागते, तसेच मिरीचे वेल सातव्या वर्षी लावल्यामुळे त्याच्या वेलीचा विस्तार झाल्यावर किफायतशीर उत्पादन मात्र लागवडीपासून तिसऱ्या वर्षी मिळते. 

बागेतील सर्व झाडे ही निरोगी आणि उत्पादनक्षम राहण्यासाठी योग्य खतांच्या मात्रा, पाणीपुरवठा, तसेच पीक संरक्षण या तीन मूलभूत बाबी आहेत. त्यापैकी झाडास लागणारी मूलद्रव्ये एकाच माध्यमातून न देता ती रासायनिक, तसेच सेंद्रिय खतांच्या माध्यमातून द्यावीत. लाखी बागेसाठी मूलभूत अन्नद्रव्ये योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात देणे आवश्‍यक आहे. कोकणातील जमिनीचा प्रकार व त्यांची अल्प जलधारणशक्ती पाहता बागेतील झाडांना आवश्‍यकतेनुसार दररोज सूक्ष्म अथवा ठिबक सिंचन पद्धतीने पाणी द्यावे. 


http://www.agriplaza.in/agri-guide.htm

कांदा बीजोत्पादनाबाबत माहिती

ऑक्‍टोबर महिन्यात चाळीतील कांदे निवडून बीजोत्पादनासाठी वापरता येतात. कारण या कांद्यांना पाच ते सहा महिने विश्रांती मिळालेली असते, त्यामुळे फुलांचे दांडे मोठ्या प्रमाणात निघतात. कांदा पीक बीजोत्पादनाच्या दृष्टीने तापमानास अत्यंत संवेदनशील आहे. कंद लावल्यापासून ते फुलांचे दांडे निघेपर्यंत थंड हवामान हवे असते. मधमाश्‍यांचा वापर केल्यास पराग सिंचन चांगले होऊन बीजोत्पादन चांगले होते. पराग सिंचन चांगले झाले, तापमान चांगले राहिले, खते व पाण्याचे व्यवस्थापन योग्य प्रकारे केले, तर बियांचे चांगले उत्पादन मिळू शकते. 

फलधारणा ते बी तयार होण्याचा काळ एक ते दीड महिन्याचा असतो. या काळात रात्रीचे तापमान 15 ते 20 अंश व दिवसाचे तापमान 35 अंश सेल्सिअसच्या वर राहिल्यास वाढ चांगली होते व बी लवकर तयार होते. पाणी नियोजन करताना जमिनीचा मगदूर व पिकाची वाढीची अवस्था यानुसार पाणी द्यावे. कांदा बीजोत्पादन साधारणपणे मध्यम ते भारी जमिनीत घेतले जात असल्यामुळे दोन पाळ्यांत आठ ते दहा दिवसांचे अंतर ठेवावे. प्रत्येक पाळीत नेहमी हलके पाणी द्यावे. कांदा पिकाची मुळे 15 ते 20 सें.मी. खोलीवर जातात. तेवढाच भाग ओला राहील इतकेच पाणी देणे गरजेचे असते. पाणी जास्त झाले, तर कंद सडतात व नांगे पडतात. म्हणून हलक्‍या जमिनीत पाणी सहा ते आठ दिवसांच्या अंतराने द्यावे. नोव्हेंबर ते जानेवारी या काळात थंडी असल्यामुळे पाण्याची गरज कमी असते. या काळात 10 ते 12 दिवसांनी पाणी द्यावे. फेब्रुवारी-मार्च या काळात फुलांचे दांडे निघून फलधारणा होते. या काळात पाण्याचा अजिबात ताण पडू देऊ नये, म्हणून पाणी सात ते आठ दिवसांनी द्यावे. एप्रिल महिन्यात फलधारणा होऊन बी पक्व होते. ठिबक सिंचन केल्यास बीजोत्पादन चांगल्या प्रकारे घेता येते. कांदा बीजोत्पादन पिकात वाळलेले गवत, गव्हाचा कोंडा किंवा भाताचे तूस याचे आच्छादन केले, तर पाण्याची बचत होते व तणांचा उपद्रव कमी होतो. याशिवाय पाण्यातून विद्राव्य खते देण्याची सोय असल्यामुळे खतांचीदेखील बचत होते. कांदे लावल्यानंतर साधारणपणे 45 दिवसांनी खुरपणी करावी. अधिक मार्गदर्शनासाठी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा. 

जातींची शुद्धता राखण्यासाठी विलगीकरण -
कांदा पिकात परपरागीभवन होऊन फलधारणा होते. दोन जाती बीजोत्पादनासाठी दीड कि.मी.च्या आत लावल्या किंवा रब्बी कांदा पिकात डेंगळे आले, तर परपरागीभवन होऊन जातींची शुद्धता राहत नाही. तेव्हा, जातींची शुद्धता राखण्यासाठी दोन जातींमध्ये बीजोत्पादन करते वेळी कमीत कमी दीड कि.मी. विलगीकरण अंतर राखणे अत्यंत आवश्‍यक आहे. याशिवाय बीजोत्पादनाच्या शेजारी कांदा लागवड केली असेल आणि त्यात डेंगळे आले असतील, तर फुले उमलण्याअगोदर डेंगळे तोडणेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे, अन्यथा आपल्या चांगल्या जातीमध्ये डेंगळे येण्याची प्रवृत्ती वाढीस लागू शकते.


http://www.agriplaza.in/agri-guide.htm

ढोबळी मिरचीचे अळीपासून संरक्षण

स्पोडोप्टेरा या किडीचा जीवनक्रम अभ्यासल्यास अंडी अवस्था दोन ते तीन दिवस, अळी अवस्था 20 ते 22 दिवस, कोषावस्था आठ ते दहा दिवस, प्रौढ अवस्था सात ते आठ दिवस अशा प्रकारचा असतो. एक प्रौढ मादी तीन ते चार पुंजक्‍यांत 2100 अंडी एकावेळी घालते. यावरून अंड्यापासून किती मोठ्या प्रमाणात अळ्या तयार होतात, हे ध्यानात घेणे महत्त्वाचे आहे. अळी पाने खाते, प्रादुर्भाव वाढू दिल्यास सर्वच झाडांची पाने खाते. फळे लागल्यानंतर फळे पोखरते. अशा अळीपासून पिकाचे वेळीच संरक्षण करावे, हीच अळी टोमॅटो, बटाटा पिकासही प्रादुर्भाव करते. 


http://www.agriplaza.in/agri-guide.htm

गाभण म्हशीचे व गाईचे संगोपन महत्त्वाचे

गर्भावस्थेत गाभण जनावराला स्वतःच्या पोषणाकरिता त्याचबरोबर गर्भाची वाढ चांगली होण्याकरिता जनावरास पोषक व पचनास सुलभ असणारे अन्न देणे चांगले असते. सर्वसाधारणपणे म्हशीचा गाभणकाळ दहा महिने, दहा दिवस, तर गाईचा गाभणकाळ नऊ महिने, नऊ दिवस असतो. गाभण जनावरांचा खुराक समतोल असावा. त्यात प्रथिने पिष्टमय पदार्थ, खनिज क्षार, जीवनसत्त्वे हे सर्व घटक योग्य प्रमाणात असले पाहिजेत. गर्भावस्थेचे अंतिम काळात अशा गाभण जनावरांना पोषणाकरिता एक किलो जादा पशुखाद्य खुराक म्हणजे दररोज दोन किलो खुराक देणे आवश्‍यक असते. त्यामुळे गर्भाची वाढ चांगली होते. 

http://www.agriplaza.in/agri-guide.htm

क्षारपड जमिनीचे व्यवस्थापन महत्त्वाचे

क्षारपड जमिनीची खोलवर मशागत केल्यामुळे जमिनीत हवा खेळती राहून पाणी मुरण्याची क्षमता वाढते. त्यामुळे पृष्ठभागावरील क्षार खोलवर जाण्यास मदत होते. नांगरणीसाठी सबसॉयलर अवजाराचा उपयोग करावा. सबसॉयलर हा एक प्रकारचा खोलवर नांगरट करणारा नांगरच असतो. जमिनीतील कडक पापुद्रे या नांगराने ढिले होतात आणि पाण्याचा निचरा होण्यास जागा मोकळी होते. गहू, ज्वारी, सोयाबीन, हिरवळीची पिके घेणे फायद्याचे असते. अशा जमिनींना सेंद्रिय खतांचा अधिक वापर केल्यास जमिनी भुसभुशीत राहतात. जमिनीची तपासणी करून जमिनीचा सामू, विद्युतवाहकता, विनिमययुक्त सोडिअमचे प्रमाण किती आहे ते तपासणे गरजेचे असते. 


http://www.agriplaza.in/agri-guide.htm

रब्बी हंगामातील गहू-हरभरा पिकांचे पाणी व्यवस्थापन महत्त्वाचे

रब्बी हंगामातील गहू-हरभरा या पिकांना पिकांचे वाढीचे अवस्थेनुसार पाणी देणे महत्त्वाचे असते. गव्हाच्या वाढीच्या अवस्था पेरणीनंतर प्रत्येक 21 दिवसांनी बदलतात. मुकुटमुळे फुटणे, फुटवा, कांड्या फुटणे, फुलोरा, वाढीची अवस्था आणि दाणे भरणे या पाच अवस्था महत्त्वाच्या आहेत. तर हरभऱ्याच्या बाबतीत फुलोरा आणि दाणे भरणे या अवस्था महत्त्वाच्या आहेत. वाढीच्या अवस्थेनुसार पाणी दिल्यास उत्पादन आणि उत्पादकता अधिक येते. 


http://www.agriplaza.in/agri-guide.htm

आल्यापासून सुंठनिर्मिती कशी करतात

भाजीपाला सुधार प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील तज्ज्ञांनी माहिती दिली आहे. आल्याचे विविध प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करण्यासाठी आल्याचे कंद स्वच्छ धुऊन मातीपासून वेगळे करावेत आणि उन्हात चांगले वाळवावेत. आल्याच्या कंदापासून खारे आले, आलेपाक, आल्याचे सरबत, वाळलेले आले आणि आल्याचे लोणचे बनवितात. सुंठ तयार करावयास वापरावयाच्या आले पिकाची काढणी परिपक्व झाल्यानंतर करावी. ते पूर्ण वाढलेले, निरोगी असावे. सुंठीसाठी वापरायचे आले अधिक तंतुमय असू नये. रिओडी जानेरो, माहीम यांसारख्या कमी तंतुमय असणाऱ्या जातींचा वापर करावा. यापासून उत्तम प्रतीची सुंठ तयार होऊन चांगला बाजारभाव मिळतो. 

सुंठ तयार करण्याच्या पद्धती ः 
1) मलबार पद्धती ः या पद्धतीत आले स्वच्छ निवडून आठ-दहा तास पाण्यात भिजत ठेवतात. त्यानंतर त्याची साल काढून दोन टक्के चुन्याच्या द्रावणात सहा-सात तास भिजत ठेवतात. त्यानंतर द्रावणातून काढून हे आले छोट्याशा व बंद खोलीत पसरून ठेवतात. बंद खोलीत आल्याच्या कंदाला 12 तास गंधकाची धुरी देतात. थोडक्‍यात, बंद खोलीत गंधक जळत ठेवतात. त्यानंतर कंद बाहेर काढून दोन टक्के चुन्याच्या द्रावणात सहा तास भिजत ठेवतात व परत 12 तास गंधकाची धुरी देतात. अशाप्रकारे ही प्रक्रिया तीन वेळा करावी लागते, त्यामुळे आल्याच्या कंदांस पांढराशुभ्र रंग येतो. हे प्रक्रिया केलेले आले सूर्यप्रकाशामध्ये वाळवले जाते व गोणपाटामध्ये घालून स्वच्छ केले जाते. हेच आले सुंठ म्हणून बाजारात पाठविले जाते. 

2) सोडा व खास मिश्रण पद्धती ः या पद्धतीने सुंठ तयार करण्यासाठी आले सर्वप्रथम स्वच्छ निवडून घ्यावे. त्यानंतर आठ ते दहा तास पाण्यामध्ये भिजत ठेवून त्याची साल काढून घ्यावी. त्यानंतर दीड x दोन फूट आकाराच्या हाताने उचलेल इतक्‍या क्षमतेच्या गॅल्व्हनाइज्ड जाळीच्या पिंजऱ्यामध्ये आले भरून घ्यावे. तीन वेगवेगळ्या भांड्यांमध्ये सोडिअम हायड्रॉक्‍साईड (कॉस्टिक सोडा)ची 20 टक्के, 25 टक्के आणि 50 टक्के तीव्रतेची द्रावणे तयार करून उकळून घ्यावीत. या द्रावणांमध्ये कंदाने भिजलेला पिंजरा 20 टक्के द्रावणामध्ये पाच मिनिटे, 

25 टक्के द्रावणामध्ये एक मिनीट आणि 50 टक्के द्रावणामध्ये अर्धा मिनीट धरावा. त्यानंतर पिंजऱ्यातील आले चार टक्के सायट्रिक ऍसिडच्या द्रावणात दोन तास बुडवून ठेवावे. त्यानंतर चांगले निथळून स्वच्छ सूर्यप्रकाशात वाळत घालावे. चांगले वाळल्यानंतर थोडीफार राहिलेली साल चोळून काढावी. अशा पद्धतीने चांगली सुंठ तयार होते. प्रक्रिया करण्यापूर्वी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेणे आवश्‍यक आहे. 


http://www.agriplaza.in/agri-guide.htm

शेळीपालनाबाबत माहिती

दूध आणि मांस उत्पादनाच्यादृष्टीने संगमनेरी शेळी तर मांस उत्पादनासाठी उस्मानाबादी शेळ्या निवडाव्यात. या शेळ्यांचे पाय सरळ, मजबूत व दोन पायांत भरपूर अंतर असावे. पाठ सरळ व रुंद असावी, छाती भरदार व रुंद असावी. पैदाशीचा बोकड निवडताना उत्तम शारीरिक क्षमता असलेला, मजबूत पाय, लयबद्ध चाल, चपळ असणारा व चांगली वंशावळ असणारा बोकड निवडावा. वंशावळीची नोंद असल्यास दूध उत्पादनासाठी जास्तीत जास्त दूध देणाऱ्या शेळ्यांपासून जन्मलेल्या पाटींची निवड करावी, तर मांसोत्पादनासाठी जुळे वा तिळे करडे देणाऱ्या शेळ्यांपासून तयार झालेले बोकड व शेळ्या निवडाव्यात. 
बंदिस्त शेळीपालन करताना शेळ्यांची संख्या हळूहळू वाढवावी, त्याप्रमाणे विस्ताराच्या दृष्टीने गोठा बांधताना जागेची सोय ठेवावी. गोठा बांधणी ही शेतातील उपलब्ध साधनसामग्रीचा वापर करून करता येते. गोठ्याच्या जमिनीवर शक्‍यतो माती, मुरूम, लाकडाचा भुस्सा, विटा यांच्या साह्याने चांगले दाबून धुम्मस तयार करावे. अशी जमीन हिवाळ्यात उबदार राहते. करडांचे व शेळ्यांचे थंडीपासून संरक्षण होण्यास मदत होते. शेतातील बाभळीच्या झाडांपासून खांब, तर तुराट्या, भाताचा पेंढा, गव्हाच्या पेंढ्या, तसेच बाजरीचे सरमाड यांचा वापर करून गोठ्याचे छत शाकारावे. कुंपण तसेच गोठ्यातील कप्पे, भिंती, तुराट्या, बांबूच्या पट्ट्यांचा वापर करून तयार करावे. गोठ्याचे छत हे नेहमीपेक्षा थोड्या जास्त उंचीवर शाकारावे, जेणेकरून हवा खेळती राहील, तसेच दुर्गंधी राहणार नाही. गोठ्याच्या छताला प्लॅस्टिक, पॉलिथिन अथवा खताच्या रिकाम्या पिशव्या शिवून केलेले आवरण, आच्छादन बसविल्यास पावसापासून जास्त संरक्षण मिळते. थंडीच्या दिवसांत गोणपाटाच्या साह्याने शेळ्यांसाठी, मुख्यत्वेकरून करडांसाठी ऊब राखता येते. पिण्याच्या पाण्यासाठी सिमेंटची एक टाकी गोठ्याबाहेर एका कोपऱ्यात ठेवावी. शेळ्यांचा गोठा नेहमी कोरडा राहील याची काळजी घ्यावी. तज्ज्ञांच्या शिफारशीनुसार लसीकरण करून घ्यावे. 


http://www.agriplaza.in/agri-guide.htm

मोसंबी लागवडीविषयी माहिती

चोपण, क्षारपड जमिनीवर मोसंबीची लागवड टाळावी. मोसंबीसाठी मध्यम जमीन एक मीटर खोल काळी माती व त्याखाली नरम मुरूम असलेली जमीन लागवडीसाठी चांगली असते. जास्त चोपण, पाण्याचा निचरा न होणारी, जमिनीतील मुक्त चुनखडीचे प्रमाण दहा टक्‍क्‍यांपेक्षा जास्त असलेली जमिनीत लागवड करू नये. लागवडीसाठी न्यूसेलर, काटोल गोल्ड, फुले मोसंबी या जातींची निवड करावी. मोसंबीची लागवड 6 × 6 मीटरवर करावी. लागवडीसाठी 1 x 1 x 1 मीटर आकाराचे खड्डे घ्यावेत. खड्डे खोदताना खड्ड्यातील वरील चांगली माती वेगळी टाकावी. खड्डे उन्हाळ्यात 15 ते 20 दिवस चांगले तापवून द्यावेत. खड्डे खोदताना, भरताना तळाशी शिफारशीत कीडनाशक, पालापाचोळा किंवा वाळलेला काडीकचरा यांच्या मिश्रणाचा 15 सें.मी. थर भरावा. त्यानंतर खड्डा भरण्यासाठी दोन टोपली शेणखत, खड्ड्यातून काढलेल्या वरच्या मातीच्या मिश्रणाने खड्डा भरावा. पाऊस पडल्यानंतर कलमांची लागवड करावी. कलमाचा जोड जमिनीपासून 20 ते 25 सें.मी. उंचीवर राहील याची काळजी घ्यावी. कलमे खात्रीच्या रोपवाटिकेतूनच घ्यावी. रंगपूर लाइम खुंटावरील कलमांना प्राधान्य द्यावे. कलमांचा डोळा 22 ते 25 सें.मी.वर बांधलेला असावा. 
http://www.agriplaza.in/agri-guide.htm

डाळिंब लागवडीविषयी माहिती

डाळिंब हलक्‍या ते मध्यम प्रकारच्या जमिनीत अत्यंत चांगल्याप्रमाणे घेता येते. हलक्‍या व मध्यम जमिनीत जमिनीच्या मगदुराचा विचार करून 4.5 x 3.0 मीटर अंतरावर 60 सेंटिमीटर लांबी, रुंदी व खोलीचे खड्डे उन्हाळ्यात खणून ते पावसाळ्यापूर्वी खत, माती मिश्रणाने भरून घ्यावेत. लागवडीसाठी गणेश, जी- 137, मृदुला, फुले आरक्ता, भगवा या जातींची निवड करावी. डाळिंबाच्या झाडास अनेक फुटवे येतात. यापैकी एकच खोड ठेवल्यास खोडकिडीच्या प्रादुर्भावामुळे काही वेळा संपूर्ण झाड जाण्याचा धोका असतो. यासाठी सुरवातीच्या वाढीच्या काळातच चार ते पाच खोडे विकसित होऊ द्यावीत आणि यावरील जमिनीपासून दोन ते अडीच फुटापर्यंतचे फुटवे येऊ देऊ नयेत. आवश्‍यकतेनुसार झाडास आधार दिल्यास झाडाची वाढ चांगल्या प्रकारे होते. पिकाच्या चांगल्या वाढीसाठी व उत्पादनासाठी रासायनिक व सेंद्रिय खतांचा नियमित पुरवठा करणे आवश्‍यक आहे. पहिल्या एक ते दोन वर्षांच्या कालावधीत खतांच्या मात्रा दर महिन्यास पिकाच्या वाढीनुसार विभागून दिल्यास झाडाची वाढ जोमाने होते. पुढील टप्प्यात गरजेनुसार रासायनिक खतांची मात्रा वाढवीत न्यावी. जमिनीच्या मगदुराप्रमाणे चांगल्या उत्पादनासाठी नियमित पाणीपुरवठा करणे आवश्‍यक आहे. सिंचनाचे पाणी त्या ठिकाणच्या बाष्पीभवनाचा दर लक्षात घेऊन ठिबक पद्धतीनेच द्यावे. www.agriplaza.in