Thursday, July 5, 2012

बहुपयोगी वाळा लागवड

भारतामध्ये उत्तर प्रदेशात जंगलांमधून व तमिळनाडू, केरळ इ. राज्यांत वाळा लागवड करून तेलनिर्मिती केली जाते. या गवताची लागवड मृद, जल संधारणासाठी उत्कृष्ट समजली जाते. पडीक माळराने, नापिक जमिनी, जास्त धूप होणाऱ्या जमिनी इ. ठिकाणी लागवडीसाठी ही वनस्पती उपयुक्त आहे. या बहुवर्षायू, सुंदर दिसणाऱ्या गवताची मुळे काहीशी कंदवर्गीय असतात, त्यांची वाढ माती, हवामान यांच्या अनुकूलतेप्रमाणे 10-35 सें.मी.पर्यंत होते. हे गवत दोन मीटरपर्यंत वाढते. पाने अरुंद, चपटी, चकचकीत, तेलकट असतात. अनेक ताटे झुबक्‍याने एकत्र वाढतात व त्यामुळे या गवताचे बोंधे तयार होते. लागवडीनंतर झाडे एक-दोन वर्षांची झाल्यानंतर त्यांस पुष्पगुच्छ येतात. 

या बहुवर्षायू गवतास वाढीसाठी उष्ण व दमट हवामान चांगले मानवते. 1000 ते 2000 मि.मी. पाऊस आणि 21 ते 43 अंश से. तापमानाच्या ठिकाणी, हलक्‍या ते मध्यम जमिनीत हे गवत चांगले वाढते. त्याचप्रमाणे 9.5 ते 10.5 सामू असलेल्या व भारी जमिनीत, मोकळ्या पडलेल्या, खार, चढ - उताराच्या, नदीकाठच्या, पाणी धरून ठेवणाऱ्या जमिनीतही याची लागवड होऊ शकते. गवताची लागवड "स्लिप्स'पासून केली जाते. यासाठी गवताची ताटे वेगवेगळी केली जातात, त्याची वरील पाने तोडून 10 ते 20 सें.मी.ची स्लिप्स लागवडीसाठी तयार केली जातात. दोन - तीन ताटे बरोबरीने असतात, ती वेगळी करणे आवश्‍यक असते. लागवड फेब्रुवारीपर्यंत केली जाते. लागवडीसाठी सरी - वरंबे 60 सें.मी. अंतराने तयार करून सरीमध्ये 60 x 60 सें.मी. अंतराने ओळीने लागवड करावी. शेतात कुजलेले शेणखत प्रति हेक्‍टरी दहा बैलगाड्या टाकून मातीत मिसळावे. लागवडीपूर्वी शेत चांगले नांगरून तणे, काडीकचरा वेचून तयार करणे आवश्‍यक असते. पावसाळ्यानंतर लागवड करावयाची झाल्यास लागवडीनंतर लगेचच पाणी देणे आवश्‍यक असते. या गवताच्या वाढीसाठी सूर्यप्रकाशाची आवश्‍यकता असते. वणवा, थंडी इ.साठी हे गवत कणखर मानले जाते. 

काढणी -
लागवडीनंतर 18 ते 24 महिन्यांनंतर वाळ्याची मुळे काढणीयोग्य होतात. मुळे हाताने अथवा नांगराने काढली जातात. काढलेल्या मुळांची माती, काडी-कचरा काढून टाकण्यासाठी पाण्यात स्वच्छ धुवावी. ताज्या मुळांमध्ये तेल कमी मिळत असल्याने मुळे वाळवूनच तेल काढण्यासाठी वापरली जातात. मुळे वाळविण्यापूर्वी त्यांचे लहान लहान तुकडे करणे आवश्‍यक असते. मुळांची काढणी नोव्हेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत केली जाते. हवामान व पीक व्यवस्थापनानुसार प्रति हेक्‍टरी 10 ते 50 क्विंटल मुळांचे उत्पादन मिळते. सरासरी प्रति हेक्‍टरी 25 ते 30 क्विंटल उत्पादन मिळते. यामध्ये खुशीमोल, व्हेटीसेलीनॉल, युडेसॅमॉल, खुशीलॉल, खुशीन, खुशेर, खुशीऑल, व्हीटीव्हेरी हे रासायनिक घटक असतात. 

उपयोग -
पाण्याची वाफ (स्टीम डिस्टिलेशन) वापरून ताज्या किंवा वाळलेल्या मुळांपासून तेल काढले जाते. साठवलेल्या मुळांपासून चांगल्या प्रतीचे तेल मिळते, त्यामुळे काढणीनंतर चार ते सहा महिने मुळे साठवून ठेवणे आवश्‍यक असते. 

तेल ः अत्तरे, सौंदर्यप्रसाधने, उटणे, साबण आणि अन्य तेलांच्या निर्मितीसाठी याचा वापर केला जातो. तेलामधून व्हीटीव्हेरॉल, व्हीटीव्हेरॉन इत्यादी द्रव्ये काढली जातात. तंबाखू, पान मसाला, शीतपेये यांना सुवासिक स्वाद देण्यासाठीही तेलाचा वापर होतो. 

पाने ः कोवळ्या पानांचा गुरांना चारा म्हणून आणि घोड्यांना बसण्यासाठी वापर केला जातो. झाडू, टोपल्या इ. वस्तू पानांपासून बनविल्या जातात. जास्त तापमान असलेल्या प्रदेशात पानांचा वापर कुलरमध्ये अथवा कर्टन तयार करून घरातील तापमान कमी करण्यासाठी केला जातो. लिखाणाचे किंवा प्रिंटिंग पेपर निर्मितीसाठीही पानांचा वापर होतो. 

जल-मृद्‌संधारणासाठी वनीकरण गरजेचे 
आपल्या परिसरातील जंगलाचे प्रमाण दिवसेंदिवस झपाट्याने कमी होत चालले आहे; तसेच झपाट्याने होणाऱ्या नागरीकरणाचा परिणाम वनसंपदेवर होताना दिसतो. वनांच्या कमी झालेल्या क्षेत्रामुळे ऋतुमानात बदल होत आहेत. जंगलांच्या घटलेल्या प्रमाणामुळे मातीची धूप झाली आहे, जलस्रोतांवर परिणाम झालेला आहे; माती, पाणी इ.वर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. एक सें.मी. मातीचा थर तयार होण्यास हजारो वर्षे लागतात. खडकांची झीज होऊन विविध सूक्ष्मजीव, शेवाळ, नेचेवर्गीय, अपुष्प, पुष्पवर्गीय वनस्पतींच्या सहयोगाने माती तयार होते. जंगलाचे जमिनीवरील आवरण कमी झाल्याने पर्यावरणात असमतोल निर्माण झाला आहे. अन्नसाखळ्यांचे संतुलन बिघडले आहे. रस्ते दुतर्फा, नद्याकाठ, शेते इ. ठिकाणी धुपणासाठी संवेदनशील आहेत. 
मातीच्या संवर्धनासाठी नैसर्गिक स्थिती आपण जर पाहिली तर पहिल्या पावसानंतर लगेचच गवत येते. या गवतामुळे हजारो टन मातीचे संवर्धन होते; परंतु बऱ्याचशा भूभागावर गवतही आढळत नाही, अशा परिस्थितीमध्ये मोठे नुकसान होते. शक्‍यतो यासाठी प्रदेशनिष्ठ किंवा त्याच प्रदेशात मिळणाऱ्या प्रजातींचा वापर करणे आवश्‍यक आहे. परदेशातील प्रजाती वापरल्याने त्या ठिकाणी असलेल्या परिस्थितीवर विपरीत परिणाम होतात, हे प्रयोगाअंती सिद्ध झाले आहे. म्हणून वनस्पतिशास्त्राच्या आधाराने निवडक प्रजातींचीच लागवड करणे आवश्‍यक आहे. 

योग्य प्रजातींची निवड ः 
एकदल प्रवर्गातील गवत म्हणजेच तण यात काही वर्षायू आहेत, तर काही बहुवर्षायू. या गवताची लागवड बियांपासून, खोडांच्या किंवा मुळांच्या छाटांपासून केली जाते. गवतांचे मृद्‌ व जलसंधारणासाठीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. 
कुश गवत ः हे गवत बहुवार्षिक असल्याने खोड ताठ आणि दांडगे असते. भुईसरपट आडवे जाणारे, अनेक खोडे या प्रजातीस असतात, त्यापासून अनेक शाखा येतात आणि आजूबाजूला नवांकुर येऊन नवीन झाडे मुख्य झाडाभोवती तयार होतात. कमी पाण्यावर येणारे हे गवत खोडाच्या किंवा मुळांच्या छाटाने लागवड करतात. 
मुंज ः हे गवत चांगले वाढते. खोड ताठ, जोरदार कांडे असणारे असते. या बहुवर्षायू गवताची लागवड बिया किंवा खोडाच्या छाटांपासून केली जाते. 
मारवेल ः या गवताची उंची 15 ते 90 सें.मी.पर्यंत वाढते. लागवड बियांपासून केली जाते. 
वाळा (खस) ः यास "व्हेटीव्हर' असेही म्हणतात. या बहुवर्षायू गवताची उगवण दाट होते. हे गवत मृद्‌संधारणासाठी अतिशय चांगले मानले जाते. लागवड "स्लिप्स'पासून केली जाते. 
कुंदा ः हे गवत तीन फुटांपर्यंत वाढते. हे गवत बहुवर्षायू असून, या गवताला आडवे खोड असते. त्यापासून धुमारे निघतात आणि बियांपासून याची लागवड होऊ शकते. 
पवना ः सुमारे तीन फुटांपर्यंत वाढणाऱ्या या बहुवर्षायू गवताचे खोड मुळाजवळ जाड, भक्कम व गुळगुळीत असते. लागवड बियांपासून होते. 
शेंडा ः हे बहुवर्षायू गवत दोन फुटांपर्यंत वाढते. पवना गवतासारखे दिसणारे; मात्र खोड थोडे लवचिक असते. लागवड बियांपासून होते. 
मोशी ः डोंगर उतारावर 15 ते 50 सें.मी.पर्यंत वाढते. हे बहुवर्षायू गवत आहे. तामरट, दूर्वा, गवती चहा, सिझेनेला, जावा, बेर, कुशळी इ. गवतांचाही वापर करून मातीचे पावसाने होणारे नुकसान आपण टाळू शकतो. या गवताची लागवड बियाणे वापरून करावयाची झाल्यास भातासारखी धूळपेरणी मे महिन्यात करावी. 

पारंपरिक गवताबरोबरच गिन्नी, रोड्‌स, सिटारिया, पॅराग्रास इ. गवतांची लागवड मृद्‌संधारणाबरोबरच गुरांना चारा म्हणून केली जाते. नद्या, नाले, ओहोळ, रस्ते खचणे, ढासळणे इ.साठी बांबू फायदेशीर आहे. देशामध्ये बांबूच्या 140 प्रजाती आढळतात. यातील प्रामुख्याने आढळणाऱ्या आणि आपल्याकडे होऊ शकणाऱ्या बांबूंमध्ये कळक, मानवेल, चिवारी, मेस, कोंड्यामेस, मेसकाठी, पिवळाबांबू, बुद्धा बांबू इ.ची लागवड आपण नवीन येणारे फुटवे (कंद), बिया, खोडांचे छाट इ.पासून करू शकतो. 

गवताबरोबरच झुडपांचेही महत्त्व तेवढेच आहे. गवताच्या बरोबरीने झुडपांची लागवड केल्यास ती अधिक प्रभावी होऊन मृद्‌ व जलसंधारणासाठी उपयुक्त ठरते. यासाठी करवंद, घायपात, निर्गुडी, अडुळसा, मेंदी, कडू मेंदी, चित्रक इ.ची लागवड आपण करू शकतो. गवत, झुडपे आणि झाडे यांच्या माध्यमातून मातीची धूप आपण थांबवू शकतो, यासाठी पूर्ण प्रजातींची निवड वनस्पती तज्ज्ञांच्या मदतीने करून घेणे आवश्‍यक असते. 

गवताची वैशिष्ट्ये ः 
गवत वर्षभर उपलब्ध होऊन वेगवेगळ्या हवामानांत गवताची वाढ होऊ शकते. जमिनीच्या वरच्या तसेच खालच्या थरात वाढ होत असल्याने माती धरून ठेवण्यास इतर वनस्पतींपेक्षा फारच मदत होऊ शकते. कमीत कमी पाण्यावर, कोणत्याही हवामानात तसेच जमिनीत गवताची वाढ चांगली होऊ शकते. फुटव्यांची संख्या खूप असते. लवकरात लवकर वाढ होते. गवताचा वाढलेला भाग जरी जनावराने खाल्ला तरी खालील भाग तसाच राहिल्याने पुढील गवताची वाढ चांगली व जोमाने होते, त्यामुळे सर्वत्र हिरवळ दिसून येते, त्यामुळे रानटी जनावरांसाठी वर्षभर खाद्य उपलब्ध होते. पर्यायाने रानटी जनावरांची वाढ चांगली होते. 


Ref. Link : http://www.agrowon.com/Agrowon/20120325/5561109475309633307.htm