Sunday, March 18, 2012

उशिरा तुटलेल्या उसाच्या खोडव्याचे व्यवस्थापन

संदेश देशमुख, डॉ. देवेंद्र इंडी, डॉ. सुरेश पवार

ऊस पिकाचे सरासरी उत्पादन वाढविण्यासाठी लागणीच्या उसाइतकेच खोडवा पिकास महत्त्व देणे आवश्‍यक आहे. एक हेक्‍टर क्षेत्रापासून आठ ते दहा टन पाचट मिळते. त्यापासून 40 ते 50 किलो नत्र, 20 ते 30 किलो स्फुरद, 75 ते 100 किलो पालाश मिळते. तसेच तीन ते चार हजार किलो सेंद्रिय कर्ब जमिनीत मिसळले जाते. खोडवा पिकाची जोपासना सुधारित तंत्राने केल्यास खोडव्याचे उत्पादन लागणीच्या उसाएवढे, किंबहुना त्यापेक्षा जास्त येऊ शकते.

सर्वसाधारणपणे 15 फेब्रुवारीपर्यंत तुटलेल्या उसाचा खोडवा घेतल्यास खोड किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होतो. त्यासाठी खोडव्याचे सुधारित तंत्राने व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. ज्या ऊस लागवडीच्या उसाचे उत्पादन हेक्‍टरी 100 टन आणि ऊस संख्या एक लाखापेक्षा जास्त आहे असा उसाचा खोडवा ठेवावा. ऊस पीक विरळ झाल्यास नांग्या भराव्यात. नांग्या भरण्यासाठी प्लॅस्टिकच्या पिशवी तयार केलेले रोपे वापरावीत. खोडव्यासाठी शिफारशीत केलेल्या को. 86032, कोएम. 0265, कोएम. 88121, को. 740 आणि को. 8014 या जातींचा खोडवा चांगला येतो.

खोडवा राखण्याची योग्य वेळ ः
उसाची तोडणी ऑक्‍टोबरपासून एप्रिल, मेपर्यंत केले जाते. याच उसाचा खोडवा ठेवला जातो. जसजसा खोडवा राखण्यास उशीर होतो, त्या प्रमाणात खोडव्याचे उत्पादन खोडकिडीचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे कमी होत जाते. साधारणपणे 15 फेब्रुवारीनंतर तुटलेल्या उसाचा खोडवा ठेवू नये. खोडवा ठेवायचाच असेल तर त्यासाठी खोडव्याचे सुधारित तंत्राने व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.

खोडवा उसात पाचटाचा वापर ः
ऊस तोडणीच्या वेळी पाचट जागच्या जागी ठेवावी. शेतात एखाद्या ठिकाणी पाचटाचा ढीग राहिल्यास तो पसरून द्यावा. त्यानंतर उसाच्या बुडख्यावर असलेले पाचट बाजूला करून उसाचे बुडखे मोकळे करावेत. जेणेकरून, त्यावर सूर्यप्रकाश पडून येणारे नवीन कोंब जोमदार येतील. उसाचे बुडखे मोठे राहिल्यास ते जमिनीलगत धारदार कोयत्याने छाटून घ्यावेत. त्यामुळे जमिनीखालील कोंब फुटण्यास वाव मिळतो व फुटव्यांची एकूण संख्या वाढते. जमिनी खालून येणारे कोंब जोमदार असतात. बुडख्यांची छाटणी न केल्यास जमिनीच्या वरील कांडीपासून डोळे फुटतात. असे येणारे फुटवे कमजोर असतात. क्वचितच त्यांचे उसात रूपांतर होते. बुडख्यांच्या छाटणीनंतर लगेचच 0.1 टक्का कार्बेन्डाझिमची (100 लिटर पाण्यात 100 ग्रॅम कार्बेन्डाझिम) फवारणी करावी. त्यामुळे मातीतून होणाऱ्या बुरशीजन्य रोगांचा प्रतिबंध होतो. शेतात पसरलेल्या पाचटावर प्रति हेक्‍टरी 80 किलो युरिया, 100 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि दहा किलो पाचट कुजविणारे जिवाणू संवर्धक टाकावेत. पाचट हळूहळू कुजविण्यासाठी नत्र, स्फुरद आणि पाचट कुजविणाऱ्या जिवाणूंची गरज असते. त्यानंतर उसास पाणी द्यावे. पाचटामुळे सुरवातीस पाणी पोचण्यास वेळ लागतो. तरी पाचटाचा मातीशी संबंध येऊन हळूहळू कुजण्याची क्रिया सुरू होते. पाचट वापराचे तंत्र योग्य प्रकारे अमलात आणण्यासाठी त्याची तयारी ऊस लागणीपासूनच करायला हवी. यासाठी उसाच्या दोन सऱ्यांमधील अंतर कमीत कमी 1.20 मीटर (चार फूट) असावेत. त्यामुळे सरीत पाचट चांगले बसते, फूट चांगली होते. ऊस तोडणी यंत्राने उसाची तोडणी केली असल्यास बुडख्यांवरील पाचट बाजूला करणे किंवा बुडखे छाटणे ही कामे करण्याची गरज नाही. कारण यंत्राने पाचटाचे आपोआपच लहान तुकडे होतात. जमिनीवर सारख्या प्रमाणात हलकासा पाचटाचा थर तयार होतो. तोडणी जमिनीलगतच होत असल्याने पुन्हा बुडखे छाटण्याची गरज नाही. यंत्राने ऊस तोडणी केल्यास खोडव्याची फूट चांगली होत असल्याचे दिसून आली आहे.

खत व्यवस्थापन ः
खोडव्याला पाणी दिल्यानंतर तीन ते चार दिवसांनी वाफसा आल्यावर रासायनिक खतांची पहिली मात्रा द्यावे. खते देण्यासाठी पाडेगाव येथे विकसित केलेल्या पहारीच्या केलेल्या पहारीच्या तंत्राचा अवलंब करावा. सदर पद्धतीनुसार रासायनिक खतांची मात्रा (तक्ता-1) दोन समान हप्त्यांत जमिनीत वाफसा असताना द्यावी. पहारीने बुडख्यापासून 10 ते 15 सें.मी. अंतरावर, 10 ते 15 सें.मी. खोल छिद्रे घेऊन सरीच्या एका बाजूला पहिली खत मात्रा द्यावी. दोन छिद्रांमधील अंतर 30 सें.मी. ठेवावे. दुसरी खत मात्रा विरुद्ध बाजूस त्याच पद्धतीने 135 दिवसांनी द्यावी आणि नेहमीप्रमाणे पाणी द्यावे.

सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर ः
माती परीक्षणानुसार खोडवा पिकात ज्या सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता असेल तर प्रति हेक्‍टरी 1) झिंक सल्फेट 20 किलो, 2) फेरस सल्फेट - 25 किलो, 3) मॅंगेनीज सल्फेट - दहा किलो 4) बोरॅक्‍स - पाच किलो वापरावे. कमतरता असलेल्या सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर दोन हप्त्यांमध्ये करावा.

जैविक खतांचा वापर ः
रासायनिक खतांना पूरक म्हणून जैविक खतांचा वापर केल्यास रासायनिक खतात बचत करून फायदा मिळविता येतो.
ऍझोटोबॅक्‍टर, ऍझोस्पिरीलम, ऍसीटोबॅक्‍टर आणि स्फुरद विरघळविणारे जिवाणू यांचा प्रत्येकी 1.25 किलो प्रति हेक्‍टरी या प्रमाणात एकूण पाच किलो जिवाणू खतांचा वापर करावा. त्यासाठी ही जिवाणू खते 25 किलो चांगल्या कुजलेल्या शेणखतात एकत्र करून उसाच्या ओळीच्या बाजूने टाकावीत किंवा पाण्यामध्ये किंवा शेणाच्या स्लरीमध्ये एकत्र करून वापरावीत.

पाणी नियोजन ः
खोडवा व्यवस्थापनासाठी नेहमीच्या पद्धतीने पाण्याच्या 26 ते 48 पाळ्या लागतात; परंतु नवीन तंत्रामध्ये पाण्याच्या फक्त 13 ते 14 पाळ्या असल्या तरी उत्पादन चांगले मिळते. उन्हाळ्यामध्ये पारंपरिक पद्धतीमध्ये पाण्याचा तुटवडा भासल्यास उत्पादनात फार मोठी घट येते; परंतु नवीन पद्धतीत पाचटाचा आच्छादनासाठी वापर केल्यामुळे 40 ते 45 दिवस पाणी नसले तरी पीक तग धरू शकते. पाचटाच्या पूर्ण आच्छादनामुळे जमिनीच्या पृष्ठभागावरून होणाऱ्या बाष्पीभवनाचा वेग कमी होतो. त्यामुळे शेतात ओलाव्याचे प्रमाण जास्त काळ टिकून राहते. त्यामुळे पाण्याच्या पाळ्यांतील अंतर वाढले तरी उसाची वाढ चांगली होते. शेतात गांडुळांची नैसर्गिकरीत्या मोठ्या प्रमाणात वाढ होते. त्यांच्याकडून जमीन भुसभुशीत केली जाते. खते पहारीच्या अवजाराच्या साह्याने दिली जात असल्याने गांडुळांवर त्याचा विपरीत परिणाम होत नाही. जमिनीचे तापमान थंड राहिल्यामुळे मुळांची वाढ भरपूर प्रमाणात होते. उन्हाळ्यातही पिकास जास्त उन्हाचा त्रास होत नाही.

कीड, रोगनियंत्रण ः
खोडवा पिकात काणी, गवताळ वाढ यांचे प्रमाण जास्त असते. त्यासाठी काणीग्रस्त बेटे व गवताळ वाढीचे बेटे उपटून नांग्या भराव्यात. उशिरा तुटलेल्या (मार्च/ एप्रिल) उसाचा खोडवा ठेवल्यास खोड किडीचा प्रादुर्भाव जास्त होतो. खोड कीडनियंत्रणासाठी फोरेट दहा टक्के दाणेदार 15 ते 20 किलो प्रति हेक्‍टर वापरावे. काणी व गवताळ वाढ या रोगाचे प्रमाण कमी करण्यासाठी उसाची लागण करताना ऊस बेण्यास उष्ण बाष्प प्रक्रिया करावी किंवा बेणे 0.1 टक्का कार्बेन्डाझिम (100 लिटर पाण्यात 100 ग्रॅम कार्बेन्डाझिम) द्रावणात दहा मिनिटे बुडवावीत.

ऊस खोडवा व्यवस्थापनातील महत्त्वाचे मुद्दे ः
पूर्वीच्या पिकाची जमिनीलगत तोडणी करावी. पाचट सरीत लोटावे, बुडखे मोकळे करावेत. छाटलेल्या बुडख्यांवर 0.1 टक्का कार्बेन्डाझिमची फवारणी करावी. पाचट कुजण्यासाठी जिवाणू खतांचा वापर करावा. तोडणीनंतर 15 दिवसांच्या आत पाणी द्यावे. पहारीच्या साह्याने मुख्य व सूक्ष्म अन्नद्रव्यांची अर्धी मात्रा सरीच्या एका बाजूने द्यावी. सेंद्रिय खतांचा वापर करावा. रासायनिक खतांची अर्धी मात्रा 135 दिवसांनी पहारीच्या साह्याने द्यावी. पाण्याचा योग्य प्रमाणातच वापर करावा.
या गोष्टी कटाक्षाने टाळा
* पाचट जाळणे. बुडख्यांवर पाचट ठेवणे.
* पाण्याचा अतिवापर करणे. रासायनिक खतांचा फोकून वापर करणे.

संपर्क ः 02169-265333
(लेखक मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव, ता. फलटण, जि. सातारा येथे कार्यरत आहेत.)

Ref. link: http://www.agrowon.com/Agrowon/20120305/4978796511203394160.htm