Sunday, March 18, 2012

कुक्कुटपालनातील व्यवस्थापन

डॉ. व्ही. डी. लोणकर, डॉ. ए. एस. कदम

ब्रॉयलर ब्रुडिंगमधील व्यवस्थापन

सुरवातीच्या काळामध्ये पिलांच्या पंखांची वाढ होण्यासाठी, तसेच त्यांच्या शरीराचे तापमान संतुलित ठेवण्यासाठी कृत्रिम उष्णतेची आवश्‍यकता असते. त्यालाच आपण ब्रुडिंग म्हणतो. पक्ष्यांचे व्यवस्थापन करताना कुक्कुटपालकांनी सुरवातीच्या काळामध्ये पिल्लांची योग्य काळजी घेणे अत्यंत आवश्‍यक आहे.

एक दिवसीय ब्रॉयलर पक्ष्यांची पिल्ले फार्मवर आणल्यापासून ते साधारणत: उन्हाळ्यात वयाच्या दोन आठवड्यांमध्ये व वयाच्या तीन आठवड्यांपर्यंत थंडीमध्ये त्यांना कृत्रिमरीत्या उष्णता देणे गरजेचे असते. सुरवातीच्या काळामध्ये पिलांच्या पंखांची वाढ होण्यासाठी व त्यांच्या शरीराचे तापमान संतुलित ठेवण्यासाठी कृत्रिम उष्णतेची आवश्‍यकता असते. त्यालाच आपण ब्रुडिंग असे संबोधितो. ही कृत्रिम उष्णता ज्या उपकरणाच्या साह्याने पिलांना दिली जाते. त्यास ब्रुडर किंवा कृत्रिमदायी असे म्हणतात.

सर्व कुक्कुटपालकांनी सुरवातीच्या काळामध्ये ब्रुडिंगची काळजी घेणे अत्यंत आवश्‍यक आहे.

ब्रॉयलर पक्षी जोपासनेसाठी गादी (डीप लिटर) पद्धत सर्वांत जास्त लोकप्रिय सर्वत्र प्रचलित व सर्वसाधारण कुक्कुटपालकांना सहज करता येण्याजोगी आणि परवडणारी पद्धती आहे. ब्रुडिंग व्यवस्थापन करण्यासाठी आपल्याकडे खालील साधने उपलब्ध असणे आवश्‍यक आहे.

1) गादीसाठी वापरण्यात येणारे तूस (साळीचा भुसा किंवा लाकडाचा भुसा किंवा सोयाबीनचे बारीक काड इ.).
2) 1.0 ते 1.5 फूट उंचीचे प्लॅस्टिकचे अथवा पत्र्याचे अथवा जाड पुठ्ठ्यांचे चीक गार्डस.
3) पिलांना कृत्रिम उष्णता देण्यासाठी ब्रुडर (कृत्रिमदायी)
4) इलेक्‍ट्रिक बल्ब (साधारणत: 250 पिलांसाठी 60 वॉटचे चार बल्ब)
5) प्रत्येकी 250 पिलांच्या ब्रुडिंग युनिटसाठी एक बांबूची टोपली.
साधारणत: 250 ते 300 पिलांसाठी एक ब्रुडिंग युनिट याप्रमाणे कुक्कुटपालकांनी तयारी करावी. कारण त्यामुळे ब्रुडिंग व्यवस्थापन सहज व सोपे जाते.

ब्रुडिंगची तयारी :
पक्षीगृहाची स्वच्छता व निर्जंतुकीकरण करणे अत्यावश्‍यक आहे. पक्षीगृहाच्या मध्यभागी 250 ते 300 पिलांच्या युनिटसाठी 1.2 मीटर त्रिज्येचे वर्तुळ तयार होईल, अशा पद्धतीने चीक गार्डस उभे करून घ्यावेत. त्यांना स्टॅंडच्या साह्याने आधार द्यावा. चीक गार्डसचा वापर केल्यामुळे पिल्ले ब्रुडरपासून फार लांब जात नाहीत. त्यांना थंडीची बाधा होणार नाही किंवा एकमेकांवर पडून गुदमरणार नाहीत. चीक गार्डस उभे केल्यानंतर वर्तुळाकार जागेमध्ये पाच ते सहा इंच थर येईल अशा पद्धतीने स्वच्छ व कोरडे तूस पसरून घ्यावे. त्यानंतर तुसापासून साधारणत: आठ ते नऊ इंच उंचीवर बांबूची टोपली (ब्रुडर) उलटी टांगावी. टोपलीच्या आतील भागामध्ये चार होल्डर बसवून 60 वॉटचे बल्ब लावण्याची सुविधा करावी. अशा प्रकारचे ब्रुडर्स अथवा कृत्रिमदायी घरच्या घरी सहज बनवता येते. अथवा बाजारातून उपलब्ध करता येते. पसरलेल्या तुसावरती वर्तमानपत्राचे तीन ते चार थर अंथरून द्यावेत. जेणेकरून पिलांना पहिले दोन ते तीन दिवस खाद्य पेपरवरती पसरून देता येईल.

दोन लिटर क्षमतेची भांडी प्रत्येकी 100 पिलांना एक याप्रमाणे औषधी टाकलेल्या पाण्याने भरून ठेवावीत. कृत्रिमदायी चालू स्थितीत आहे का, याची खात्री करावी. पिल्ले फार्मवर येण्याअगोदर साधारणत: चार ते पाच तास कृत्रिमदायी चालू करून ठेवावी.
पहिल्या दिवशी ब्रॉयलर पिलांना देण्याचे औषधीयुक्त पाणी खालीलप्रमाणे तयार करावे.

1) पाणी निर्जंतुक करून वापरावे.
2) पक्ष्यांवरील ताण कमी करणाऱ्यासाठी जीवनसत्त्व अ, ड, इ, आणि क अशी असणारी औषधे शिफारशीत मात्रेमध्ये पाण्यातून द्यावीत.
3) आठ ग्रॅम ग्लुकोज प्रति लिटर पिण्याच्या पाण्यामधून पिल्लांना द्यावे.
4) इलेक्‍ट्रोलाईट पावडर 14 ग्रॅम प्रति लिटर पाण्यातून द्यावी.

वर नमूद केल्याप्रमाणे पिलांना औषधीयुक्त पाणी द्यावे. पिण्याच्या पाण्याची भांडी पेपरवरती ठेवताना भांड्यातील पाणी सांडून तूस व पेपर ओले होणार नाहीत, याची काळजीपूर्वक दखल घ्यावी.

पिल्ले फार्मवर येण्यापूर्वीची तयारी :
अ) ब्रुडर सुरू करावेत.
ब) औषधीयुक्त पाण्याची भांडी भरून ठेवलेली असावीत.
क) पेपरवरती खाद्य पसरवून ठेवलेले असावे.
ड) विजेची गैरसोय होत असल्यास त्याला पर्यायी व्यवस्था करून ठेवलेली असावी.

संपर्क : डॉ. व्ही. डी. लोणकर : 9420243895
(लेखक कुक्कुटपालन शास्त्र विभाग, क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, जि. सातारा येथे कार्यरत आहेत.)

Ref. Link: http://www.agrowon.com/Agrowon/20120313/5372708838033488895.htm