Sunday, March 18, 2012

द्राक्षातील कमी साखरेची कारणे आणि उपाय

डॉ. एस. डी. रामटेके, आशिष राजूरकर, रवींद्र कोर

द्राक्षवेलींचे विस्तारामुळे बहुतांशी पाने उन्हात असतील तर द्राक्षाची पक्वता वेगाने होईल. पाने सावलीत राहून घडही सावलीत राहिले तर सावलीतील घडांची पक्वता उशिरा येते. साखर भरण्याच्या क्रियेत अडथळे येतात. उन्हातील घडांमध्ये साखर भरण्याची क्रिया वेगाने होते. पाने काढण्यानेसुद्धा गोडीवर परिणाम होतो. मण्यांच्या वाढीच्या कोणत्याही टप्प्यात मोठ्या प्रमाणात पाने काढली तर प्रत तसेच उत्पन्न मोठ्या प्रमाणावर घटते.

द्राक्ष उत्पादनात वाढत होत असताना या वर्षी बऱ्याच द्राक्ष बागायतदारांपुढे समस्या दिसून आली ती म्हणजे कमी गोडीची द्राक्षे तयार होणे. यामुळे द्राक्ष बागातदारांना द्राक्ष काढणीस विलंब करावा लागत आहे. तरीसुद्धा पाहिजे तेवढी साखर मण्यात उतरलेली दिसत नाही. द्राक्षाची गोडी कमी आहे म्हणजेच टी.एस.एस. (साखर) कमी आहे, असे म्हणता येईल. मण्यात कमी साखर असणे ही बाब खालील गोष्टींवर अवलंबून असते.

अ) हवामान ः 1) हवेतील तापमान, 2) मुळांच्या क्षेत्रातील तापमान, 3) मण्यांच्या वाढीतील तापमान
ब) व्यवस्थापनातील त्रुटी ः 1) जास्त उत्पादन, 2) वेलीचा विस्तार, 3) पानांची संख्या, 4) वेलीतील अन्नसाठा, 5) पाणी व अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन, 6) संजीवकांचा अतिरिक्त वापर.

अ) हवामान ः
1) हवेतील तापमान ः
हवामानातील तापमान हा घटक द्राक्षातील साखर भरण्याचे क्रियेत मोठा परिणाम करीत असतो.
सर्वसामान्यपणे आपला समज असा असतो की द्राक्षमण्याच्या वाढीचे एकूण तीन टप्प्यांपैकी पहिल्या दोन टप्प्यांमधील अवस्थांमध्ये जे तापमान द्राक्षास मिळाले असेल त्यांचाही परिणाम द्राक्षावरील टी.एस.एस.वर होत नसावा. पण ते खरे नाही त्याचाही परिणाम गोडीवर होतो. द्राक्षाची पक्वता सुरू झाल्यावर 15 अंश से. ते 30 अंश से.पर्यंत तापमान जसजसे वाढत जाते तसतसे साखरेचे प्रमाण हळूहळू वाढत जाते. 33 अंश से. किंवा त्यापेक्षा अधिक तापमान वाढत गेल्यास साखरेचे प्रमाण कमी होते. त्याचप्रमाणे मण्यांची वाढही कमी होते. तापमान जसजसे जास्त त्या प्रमाणात आम्लता कमी होत जाते, आम्लामध्ये प्रामुख्याने मॅलेट ऍसिड कमी होते, तापमान जसजसे जास्त त्या प्रमाणात आम्लता कमी होत जाते, आम्लामध्ये प्रामुख्याने मॅलेट ऍसिड कमी होते, टारटारेट ऍसिड विशेष परिणाम होत नाही. अमिनो आम्लांपैकी प्रामुख्याने प्रोलीन वाढत्या तापमानाबरोबर वाढत जाते. अर्जिनाईन हे अमिनो आम्लही गोडी वाढेल तसतसे वाढत जाते.

2) मुळांच्या सान्निध्यातील तापमान ः
द्राक्षमण्यांतील साखर भरण्याचे वेळेपासून पुढे द्राक्षवेलींचे मुळांचे सान्निध्यातील जमिनीच्या तापमानाचा साखर वाढण्यावर विशेष परिणाम होतो. जमिनीचे तापमान जर कमी असेल, द्राक्षमण्यांमध्ये साखर व पोटॅशिअम कमी झाले तर आम्लता वाढल्याचे निदर्शनास येते. पक्वता सुरू असताना जमिनीचे तापमान 30 अंश से. ते 32 अंश से.च्या दरम्यान असेल तर ब्रीक्‍स कमी झाले असल्याचे निदर्शनास येते.

3) वाढीच्या कालावधीतील एकूण तापमान ः
मण्यांच्या वाढीव कालावधीत एकूण तापमान जर थंड असेल तर द्राक्षे पिकण्याची क्रिया फार सावकाश चालते. याउलट तापमान उष्ण असेल तर द्राक्षे पिकण्याची क्रिया वेगाने वाढते.

4) प्रकाश ः
प्रकाशाचा प्रत्यक्षात द्राक्षाची गोडी वाढण्यावर काही परिणाम होत नसला तरी प्रकाशाचा तापमानाशी प्रत्यक्ष संबंध असतो. यामुळे प्रकाशात वाढ झाली तर द्राक्षातील गोडी वाढत जाते.

ब) व्यवस्थापनातील मुद्दे ः
1) उत्पादन ः
द्राक्षाचे उत्पादन जसजसे वेलींच्या क्षमतेपेक्षा जास्त वाढते तसतसे साखरेचे प्रमाण फार सावकाश वाढते. द्राक्षाच्या घडांची संख्या जास्त असेल तर फुटींची वाढ कमी होते. विस्तार मर्यादित राहतो त्यामुळे साखरेचे प्रमाण वाढण्यावर मर्यादा येतात.

2) विस्तार ः
द्राक्षवेलींचे विस्तारामुळे बहुतांशी पाने उन्हात असतील तर द्राक्षाची पक्वता वेगाने होईल. पाने सावलीत राहून घडही सावलीत राहिले तर सावलीतील घडांची पक्वता उशिरा येते. साखर भरण्याचे क्रियेत अडथळे येतात. उन्हातील घडांमध्ये साखर भरण्याची क्रिया वेगाने होते.

3) पाने काढणे ः
पाने काढण्यानेसुद्धा गोडीवर परिणाम होतो. मण्यांच्या वाढीच्या कोणत्याही टप्प्यात मोठ्या प्रमाणात पाने काढली तर प्रत तसेच उत्पन्न मोठ्या प्रमाणावर घटते. वाढीचे उशिराचे टप्प्यात (तिसरा टप्पा) घडांचे भोवतीची पाने काढली असता घडांचा रंग सुधारतो. साखरेचे प्रमाण वाढते आणि आम्लता कमी होते. फळकुजीचे प्रमाणही कमी होते. फुलोऱ्यापूर्वी पाने काढणे योग्य नाही. पक्वता सुरू झाल्यावर घडावर सूर्यप्रकाश पडला तर त्याच्यात साखरेचे प्रमाण वाढते आणि मॅलिक आम्लाचे प्रमाण घटते.

4) अन्नसाठा ः
वेलीतील अन्नसाठा आणि साखर भरण्याचे वेळेपासून पक्वता पुढे वाढत जाणे हे वेलीतील कर्बोदकांचे साठ्यावरही प्रामुख्याने अवलंबून असते. तोडणीचे वेळी घडांमध्ये असणाऱ्या एकूण साखरेपैकी 40 टक्के शर्करा वेलीचे साठवणीचे कर्बोदकांमधून आलेली असते. त्यामुळे खरड छाटणीनंतर शेवटच्या टप्प्यामध्ये वेलीमध्ये भरपूर अन्नसाठा होणे आवश्‍यक असते. या दृष्टीने पानांचे आरोग्य शेवटपर्यंत चांगले राहणे आवश्‍यक असते. सातत्याने उत्पादन जास्त घेणे, अयोग्य हवामान, रोगराई किंवा तत्सम कारणामुळे वेलींचा अन्नसाठा कमी होतो. हे लक्षात घेऊन त्यानुसार उत्पादन व्यवस्थापन केल्याने वेलीतील अन्नसाठा भरून निघेल. वेळेवर उपाययोजना केल्या नाहीत तर मात्र हा अन्नसाठा अधिकाधिक कमी होत जातो.पर्यायाने द्राक्षाची अपेक्षित गोडी (टी.एस.एस.) वाढत नाही.

5) पाणी व्यवस्थापन ः
पक्वतेचे काळात पाणी व्यवस्थापन आणि द्राक्षाच्या तोडणीच्या वेळेची गोडी यांचा जवळचा संबंध आहे. बाजारपेठेतील परिस्थितीनुरूप तोडणी जर लांबवावयाची असेल तर द्राक्ष बागाईतदार बागेस पाणी देतात किंवा वाढवितात. ठिबकने पाणी देणे पुरेसे झाले नाही तर पाट पाणी देतात. गोडी वाढण्याचा वेग मंदावून शेवटी तोडणी कालावधी लांबतो किंवा याउलट जर तोडणी लवकर करावयाची असेल तर पाण्याचा मोठा ताण देतात. हा ताण एवढा मोठा होतो की तोडणी नंतर छाटणीनंतरच्या फुटीवरही त्याचे दुष्परिणाम दिसतात. गोडी वाढविण्यासाठी अशा पद्धतीचे पाणी नियोजन योग्य नाही.
द्राक्ष बागेचे पाणी तोडल्यानंतर टी.एस.एस. वाढतो हे प्रामुख्याने कॅनॉपीतील तापमान वाढणे, घड उन्हात येणे या प्रत्यक्ष आणि काडीचे शेंड्या आणि घड यांच्यात स्पर्धा वाढणे आणि पाणी कमी झाल्याने सौम्य परिणाम तत्त्वाप्रमाणे टी.एस.एस.वर अप्रत्यक्ष परिणाम होतो. शिवाय हरितद्रव्यनिर्मिती आणि अन्न व पाण्याचे वहन यावरही अयोग्य परिणाम होतो.

पाण्यामुळे एकूण आम्लता वाढते. हे प्रामुख्याने मॅलीक आम्लात वाढ झाल्याने होते. टारटारिक आम्लावर फारसा परिणाम होत नाही.

अन्नद्रव्ये ः
द्राक्षाच्या टी.एस.एस.मध्ये वाढ व्हावी यासाठी पोटॅशचा वापर करणे आणि नत्रयुक्त खतांचा वापर कमी करणे असे प्रयत्न द्राक्ष बागाईतदार करीत असतात. प्रामुख्याने हे दोन्हीही उपाय हे ज्या वेळी टी.एस.एस. वाढत नाही त्या वेळी केले जातात. म्हणजे सुमारे 15 ते 16 ब्रिक्‍स असताना केले जातात. त्यापूर्वीच जर नत्र द्राक्षात (काड्या, देठ, ओलांडे) वाढला असेल तर कॅनॉपीवर त्याचे परिणाम होऊन विस्तार वाढून गेलेला असतो, त्यामुळे त्याचे पक्वतेवर परिणामही होऊन टी.एस.एस. वाढत नाही. शेवटी गोडी येत नाही. त्यासाठी सुरवातीचे काळापासून नत्राचे वापरावर नियंत्रण असणे आवश्‍यक आहे.

गोडी वाढावी यासाठी पाण्याचा ताण दिला तर घडातील पोटॅशचे प्रमाण आणखी कमी होते. जसे नत्र उशिरा देणे थांबविले तर त्याचा टी.एस.एस.च्या संदर्भात अपेक्षित परिणाम साधत नाही. त्याचप्रमाणे पोटॅशही उशिरा देऊन टी.एस.एस. वाढविण्याचे प्रयत्न बरेच द्राक्ष बागायतदार करीत असतात. त्याचाही अपेक्षित परिणाम साधत नाही. वस्तुतः जमिनीत उपलब्ध पोटॅशचे प्रमाण पुरेसे अथवा भरपूर असताना आणि पानाचे देठांमध्ये पोटॅशचे प्रमाण भरपूर असताना पक्वतेसाठी गोडी उतरावयास सुरवात झाल्यानंतर पोटॅश पुरविण्याची काही आवश्‍यकता नाही. वरील सर्व कारणे द्राक्षाची गोडी वाढविण्याचे दृष्टीने महत्त्वाची असली तरीसुद्धा मागील दोन- तीन वर्षांत द्राक्षाची गोडी पक्वतेपर्यंत अपेक्षित न येण्याची बागांमधून आढळून आलेली कारणे पुढीलप्रमाणे संभवतात.

1) नत्रयुक्त खतांचा अधिक वापर (विस्तार मिळविण्यासाठी शेंडे वाढ मिळावी म्हणून सुरवातीपासून नत्रयुक्त खते विशेषतः युरिया अधिक वापरण्याचा कल द्राक्ष बागायतदारांमध्ये रूढ होत आहे. घड सावलीत राहिल्यास पिंक बेरीजही कमी येतील या दृष्टीनेही विस्तार मिळविण्याचा प्रयत्न केला जातो)
2) युरिया अमोनिअम नायट्रेट अथवा युरिया फॉस्फेटसारख्या कृषी रसायनांचा फवारणीद्वारे कायम वापर (शेंडा)
2) युरिया, अमोनिअम नायट्रेट अथवा युरिया फॉस्फेटसारख्या कृषी रसायनांचा फवारणीद्वारे कायम वापर (शेंडा वाढ व विस्तार मिळविणे, उन्हाची इजा, गुलाबी मणी, स्कॉर्चिंग यांचा त्रास कमीत कमी व्हावा यासाठी कॅनॉपी मिळविण्याचा प्रयत्न असतो.
3) जीएसारख्या संजीवकांचे जास्तीचे फवारे घेतले जातात.
4) फवारणीद्वारे अथवा घड बुडविण्यासाठी जी.ए.चा अधिक प्रमाणात उशिरा वापर, तसेच अलीकडे ब्रेसिनोस्टिरोईड वर्गातील रसायनाचा अतिशय जास्त प्रमाणातील वापर.
5) सायटोकायनीन विभागातील संजीवकांचे फवारणीत अथवा घड बुडवणीत वापर विशेषतः उशिरा.
6) अधिक घनदाट विस्तार.
7) मुळांमध्ये तसेच खोड, ओलांडे या अवयवांमध्ये कमी अन्नसाठा.

याशिवाय सी.पी.पी.यू. आणि ब्रासीनोस्टेरॉईड सारख्या अतिशय शक्तिशाली संजीवकांचा अतिरेक वापर झाल्यास साखर न भरण्याबरोबरच इतर दुष्परिणाम दिसून येतात.

यामधील द्राक्षमण्यांवरचा परिणाम म्हणजे द्राक्षमणी खूप टणक होणे, गळ कमी होणे, द्राक्षात तुरटपणा येणे आणि पाठोपाठ कडवटपणा येणे, गर पाणीदार न तयार होता घट्ट तयार होणे, द्राक्षात आम्लतेचे प्रमाण कमी असले तरी मोडीचे प्रमाण मात्र अतिशय कमी असणे या प्रकारचे परिणाम सी.पी.पी.यू. व ब्रासीनोस्टोराईडच्या वापराने दिसून आले आहेत. वरील संजीवके वापरावयाचे असल्यास जी.ए.चा वापर कमी करावा लागतो. जी.ए. पुन्हा पुन्हा वापरावयास लागू नये, कमी प्रमाणात वापरून तोच परिणाम साधता यावा यासाठी वरील संजीवकांचा वापर सुरू झाला. परंतु जी.ए.चा वापरही तोच ठेवून वरील संजीवके अतिशय जास्त प्रमाणात वाढविल्याने दोन्हींच्या परिणामाने पक्वतेस खूपच उशीर होऊ लागला. कित्येकदा जी.ए.चा वापरही या संजीवकांबरोबर केला जातो. त्यामुळे काढणीचा कालावधी हा बराच पुढे ढकलला जातो.

कॅनॉपी खूप असेल, आर्द्रता खूप असेल आणि थंडी उशिरापर्यंत टिकून असेल तर मात्र पक्वता खूपच उशिरा येते. द्राक्ष तोडणीस खूपच म्हणजे तीन आठवड्यापासून ते दोन महिन्यांपर्यंत उशीर होतो. कमी गोडीची द्राक्ष तोडली तर त्याचे वाहतूक आणि साठवणीत खूपच नुकसान होत असते.
मागच काही वर्षांआधी कमी तापमान ही समस्या बऱ्याच वेळा व बऱ्याच काळासाठी मुख्यतः नाशिक विभागात होती, इतर विभागात त्यांची तीव्रता कमी होती. याचा परिणाम असा झाला की अन्न तयार करण्याची प्रक्रिया मंदावली, असे असले तरी वेलीचे श्‍वसन हे सुरूच असते. त्यामुळे मण्यात साखर साठण्याऐवजी वेलीला लागणाऱ्या इतर कार्यासाठी ही ऊर्जा वापरली जाते. त्यामुळे मण्यातील साखर फारशी वाढली नाही. ज्या वेळी साखर कमी असते अशावेळी आम्लाचे प्रमाण मण्यात जास्त असते. परंतु द्राक्षमण्यात आम्लाचे प्रमाण जास्त नसल्याचे दिसून येते. याचाच परिणाम असा होतोय की जरी साखरेचे प्रमाण मण्यात कमी आहे तरीसुद्धा मण्यातील साखर व आम्ल यांचे गुणोत्तर हे 21 पेक्षा जास्त आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत द्राक्ष पाठविण्यासाठी द्राक्षाची पक्वता निर्देशित करण्यासाठी हे गुणोत्तर 20 एवढे असावे अशी अट आहे. 20 पेक्षा जास्त गुणोत्तर असल्यामुळे जरी साखर मण्यात कमी होती तरी हे द्राक्ष एक्‍स्पोर्ट करण्यासाठी पात्र आहेत असे म्हणता येईल. यावर राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्रात काही विभागातून द्राक्ष आणण्यात आली त्यांच्यात साखरेचे वेगवेगळे प्रमाण होते यामुळे त्याचे तीन गट तयार करण्यात आले जसे साखरेचे प्रमाण 15-16 B, 17-18 B व 19-20 B (ब्रिक्‍स) असे वर्गीकरण करून ही द्राक्षे शीतगृहात ठेवण्यात आली. 30 दिवसांनंतर पाच दिवसांसाठी सामान्य तापमानात ठेवण्यात आली व नंतर साठवणुकीत काळाचा अभ्यास घेण्यात आला. यात असे दिसून आले, की कोणत्याही गटातील द्राक्षे ही खराब झालेली नव्हती. तसेच या तिन्ही गटामध्ये साठवणुकीत काळाचा अभ्यासाच्या दृष्टीने फारशी तफावत आढळली नाही. साठवणुकीत साखरेशिवाय आणखी कशावर अवलंबून असते हे तपासण्यासाठी त्यातील आम्लतेचे प्रमाण कशावर अवलंबून असते हे पाहण्यासाठी त्यातील आम्लतेचे प्रमाण काढण्यात आले. त्यावरून साखर / आम्ल हे गुणोत्तर काढले असता ते 20 पेक्षा जास्त असल्याचे आढळून आले. यावरून असे सिद्ध होते, की परिपक्वता ठरविण्यासाठी साखरेचे प्रमाण हेच अंतिम निकष न मानता त्यातील आम्लाचे प्रमाणसुद्धा तपासणे महत्त्वाचे ठरते. साखर/ आम्ल यांचे गुणोत्तर काढावे म्हणजेच द्राक्षनिर्यातीसाठी पात्र आहेत किंवा नाही हे ठरविता येईल.
वरील समस्या ही वातावरणातील बदलामुळे निर्माण झालेली आहे. परंतु प्रत्येक वर्षी असेच वातावरण असेल असे नाही, परंतु अलीकडे ही समस्या ही अधिकच गंभीर होऊ पाहत आहे. यासाठी संजीवकांच्या अतिरिक्त वापरासोबतच हवामानानुसार विस्तार नियोजन, पाणी व अन्नद्रव्यांचे नियोजन करावे लागणार आहे. त्यामुळे उशिरा काढणी करण्याचे टाळले जाऊ शकेल.

Ref, Link: http://www.agrowon.com/Agrowon/20120307/5680890219128035719.htm