Sunday, March 18, 2012

बहुपयोगी कदंब

डॉ. दिगंबर मोकाट

कदंबाची फळे खाण्यायोग्य पौष्टिक असतात, याची पाने गुरे आवडीने खातात. घरबांधणीसाठी या वृक्षाच्या लाकडाचा वापर केला जातो. सावली आणि परिसर सुशोभीकरणाला उपयुक्त असा हा वृक्ष आहे. कळम वृक्षांच्या सालीचे तंतू दोरनिर्मितीसाठी, लाकूड फर्निचर, शेती अवजारे व कोरीव कामासाठी आणि पेपरनिर्मितीसाठी वापरली जातात. दोन्ही वृक्षांचे महत्त्व लक्षात घेता याची लागवड वाढवणे गरजेचे आहे.

कदंब हा मूळचा मलेशियातील वृक्ष आहे. आर्द्र, दमट प्रदेशातील पर्णझडी, सदाहरित जंगलात हा वृक्ष आढळतो. हा देखणा वृक्ष 15 ते 20 मीटरपर्यंत वाढतो. सरळ गोलाकार मुख्य बुंधा आणि काहीशा 90 अंशाच्या कोनात येणाऱ्या फांद्या, त्यांची विशिष्ट मांडणी, आकाराने मोठी असलेली पाने या वृक्षाची ओळख पटवून देतात. पिवळ्या चेंडूसारखे दिसणारे गोलाकार पुष्पगुच्छ, सुवासिक असतात, पुष्पगुच्छाचे रूपांतर फळात होऊन फळांचा आकार संत्र्याएवढा होतो. नोव्हेंबरपासून या वृक्षांस फुले येण्यास सुरवात होते. परिपक्वतेनंतर यात बारीक आकाराच्या बिया तयार होतात. मध्यम वाढणारा सुंदर वृक्ष, विशिष्ट पद्धतीने वाढणाऱ्या फांद्या, मोठी पाने यामुळे शोभेसाठी बागांमध्ये याची मुद्दामहून लागवड केली जाते. झटपट वाढणारा हा वृक्ष वर्षाला सरासरी दहा फूट वाढतो.

कदंबाची परिपक्व फळे जमा करून सावलीत वाळवावीत. फळे सुकल्यानंतर त्यातून लहान आकाराचे बियाणे मिळते. बियाणे पेरणीसाठी कापडी पिशव्यांत साठवले जाते. चांगले सुकलेले बियाणे सहा महिन्यांपर्यंत टिकते. बियाणे गादीवाफ्यावर किंवा प्लॅस्टिक बॅगमध्ये रोपे निर्मितीसाठी पेरले जाते. बियाणे पेरतेवेळी माती, वाळू आणि शेणखत याचे प्रमाण 2ः1ः1 असे ठेवावे. मातीत निंबोळी किंवा करंज पेंड मिसळावी, गादीवाफे किंवा पिशव्या झाडांच्या सावलीत अथवा शेडनेट 50 टक्के सावलीसाठी वापरल्यास रुजवा चांगला मिळतो व रोपे चांगली तयार होतात. दोन ते तीन फूट वाढलेली रोपे लागवडीयोग्य असतात. मध्यम, हलकी, भारी निचऱ्याची जमीन लागवडीसाठी योग्य असते, या झाडास पाणी भरपूर लागते. खते, पाणी यांचे नियोजन केल्यास वाढ झपाट्याने होते. लागवड 5 x 5 मी. अंतराने केली जाते.

उपयोग ः
जनावरे याची पाने आवडीने खातात. लाकूड पांढरट पिवळसर, मऊ असते. दार्जिलिंग परिसरात चहाची खोकी बनविण्यासाठी याचे लाकूड वापरले जाते. घरबांधणीसाठी या वृक्षाच्या लाकडाचा वापर केला जातो. सावली आणि परिसर सुशोभीकरणाला उपयुक्त असा हा वृक्ष आहे. आगपेट्या, बुटाचे तळवे, पॅकिंगचे बॉक्‍स, पेपर इत्यादी निर्मितीसाठी वापर केला जातो.

औषधी उपयोग ः
साल, पाने, फळे वापरली जातात. खोडाची साल कफ, दुर्बलता, हगवण, ताप, जळजळ, अल्सर, ओकारी आणण्यासाठी आणि जखमा भरून आणण्यासाठी वापरतात. फळे तापावर गुणकारी मानली जातात. परंपरागत औषधीमध्ये सर्पदंश, ताप, गर्भनिरोधक म्हणून वापरले जाते.

Ref. Link: http://www.agrowon.com/Agrowon/20120318/4762948773655244688.htm