Monday, June 11, 2012

उत्पादनाचे लक्ष्य गाठून जयवंत झाले शेतीत यशवंत


सांगली जिल्ह्यातील रेठरे हरणाक्ष (ता. वाळवा) येथील जयवंत मोरे यांनी पीक बदल करून त्यातून सोनेरी प्रगती साधली आहे. सोयाबीनऐवजी बटाटा, उसात कांदा, त्यानंतर कलिंगड वा ढोबळी मिरची आदी विविध पिकांच्या प्रयोगांतून मोरे यांनी प्रयोगशील वृत्ती जोपासली आहे. कष्टाला अभ्यास, नियोजनाची जोड देत मोरे यांनी बदलत्या शेतीचा वेध घेत व पीक उत्पादनाचे लक्ष्य ठेवीत उल्लेखनीय प्रगती साधली आहे. 

श्‍यामराव गावडे 

नोकरीच्या मागे लागलेली तरुणाई असे चित्र दिसणाऱ्या सध्याच्या काळात शेती क्षेत्र निवडून त्यात करिअर करणे विशेष बाब आहे. रेठरे हरणाक्ष येथील जयवंत मोरे यांनी इचलकरंजी येथून टेक्‍स्टाईल इंजिनिअरची पदवी घेतली. चांगल्या पगाराची नोकरी मिळाली असती. परंतु घरच्या शेतीतच राबण्याचा त्यांनी निर्णय घेतला. 

साखराळे येथील राजारामबापू सहकारी साखर कारखान्याच्या एकरी शंभर टन ऊस उत्पादन योजनेत सहभागी होऊन त्यांनी उसाचे उत्पादन वाढवले आहे. त्यातून एकरी सरासरी 40 टन उत्पादन त्यांनी 75, 80, 90 अशा टप्प्याने दहा वर्षांच्या प्रयत्नांतून शंभर टनांवर नेले. उत्पादन वाढवताना जमिनीचा पोत चांगला राहावा व आर्थिक उत्पन्नही वाढावे यासाठी पीक पद्धतीत त्यांनी सतत बदल केला. 

...असा करतात पीकबदल 
मोरे पूर्वहंगामी उसाची (को-86032, फुले-265) लागवड करतात. त्याआधी ताग, धैंचा ही हिरवळीची पिके घेतात. गेल्या वर्षी त्यांनी सोयाबीनसाठी शेत तयार केले. मात्र सोयाबीनच्या दराचा विचार केला. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (मांजरी-पुणे) येथील माजी शास्त्रज्ञ ए. एन. साळुंखे यांच्या सल्ल्यानुसार त्यांनी सोयाबीनच्या ऐवजी बटाटा लागवडीचा निर्धार केला. बटाटा हे पीक या भागात प्रथमच केले जाणार होते. निमसोड येथून खासगी कंपनीकडून बियाणे खरेदी केले. कंपनीच्या नियमानुसार करारपत्र भरून दिले. त्यामध्ये उत्पादित केलेला बटाटा प्रति किलो दहा रुपये दराने कंपनी विकत घेणार होती. (बाजारात त्या वेळी सात ते आठ रुपये दर बटाट्याला होता) बटाटा लागवड करताना साडेचार फुटाची सरी सोडून गादीवाफे तयार केले. त्यावर सहा इंच अंतरावर बेणेप्रक्रिया करून बटाटा टोकला. या शेतात आधी सबसरफेस पद्धतीचे ठिबक केले होते. बटाट्यासाठी बेसल डोस म्हणून 10-26-26 च्या तीन बॅग, तसेच सूक्ष्म अन्नद्रव्ये, सेंद्रिय खत पाच बॅगा यांचा वापर केला. ठिबक सिंचनातून 12:61:0, 0:52:34, 0:0:50 ही खते गरजेप्रमाणे दिली. चांगल्या वातावरणामुळे बटाट्याचे पीक चांगले फोफावले. बटाटा पिकात करपा रोगाचा मुख्य प्रादुर्भाव असतो. त्याच्या नियंत्रणासाठी अधिक भर दिला. बटाटा पीक परिसरात प्रथमच असल्याने त्याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी झाली होती. बटाटा काढणीयोग्य झाल्यानंतर बैलांच्या अवजाराने काढणी केली. एकरी सुमारे आठ टन उत्पादन झाले. कंपनी कराराप्रमाणे 10 रुपये प्रति किलो दराने विक्री झाली. त्यावर प्रति किलो अडीच रुपये बोनस मिळाला. सुमारे एक लाख रुपयांचे उत्पन्न सुमारे 80 दिवसांत मिळाले. खर्च वजा जाता 59 हजार रुपये निव्वळ नफा मिळाला. शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या बटाट्यावर कंपनी प्रक्रिया करून चीप्ससारखे उत्पादन तयार करते. बटाट्याच्या तुलनेत सोयाबीन खर्च एकूण 13,100 रुपयांपर्यंत येतो. प्रति एकर सरासरी 12 क्विंटल उत्पादन मिळते. गेल्या तीन वर्षांमधील दर पाहिला तर तो दोन हजार रुपये प्रति क्विंटल आहे. उत्पन्न 24 हजार रुपये धरल्यास खर्च वजा जाता 11,900 रुपये इतके उत्पन्न मिळते. त्या तुलनेत बटाट्याचे आंतरपीक फायदेशीर ठरल्याचे मोरे यांनी सांगितले. 

ऊस व कांद्याचे आंतरपीक मोरे यांनी त्यानंतर उसात कांदा ही आंतरपीक पद्धती वापरली. बटाटा पिकानंतर उसाची रोपवाटिका केली. एक डोळ्याच्या उसाची रोपे लावली. बटाट्याच्या जागी गादीवाफ्यावर कांदा लावला. आंतरपीक कांद्याचे पाच एकरात 35 टन उत्पादन मिळाले. सहा ते आठ रुपये किलोला दर मिळाला. ऊस लागवडीचा बहुतांश खर्च त्यातून निघाला. पिकाचे उर्वरित अवशेष उसाच्या मुळाशी बुजवून टाकले. त्याचा उसाला चांगला फायदा झाला. 

यांत्रिकीकरण व ठिबक मोरे यांनी काळाची गरज ओळखून 40 एकर शेतीवर पूर्णपणे ठिबक केले आहे. त्यातील 15 एकर क्षेत्रावर सबसरफेस पद्धतीचे ठिबक आहे. यांत्रिकीकरणाला प्राधान्य देताना पालाकुट्टी करण्याचे यंत्र तयार केले आहे. त्याचबरोबर खोडकी तासणे, बगला फोडणे आदी कामे करणारे यंत्र त्यांच्या भावाने विकसित केले आहे. त्याच्या साहाय्याने कामे केली जातात. 

पीक पद्धतीतील बदल ठरला महत्त्वाचा मोरे यांनी सतत नवनवीन पिके घेण्याचा प्रयोग केला. त्यातून पूर्वी हळद, आले घेतले. खोडवा गेल्यानंतर नगदी पिके करण्याचे त्यांचे नियोजन असते. थोडक्‍यात, ही पिके बोनस म्हणून घेतात. त्यांनी अशाच पद्धतीने तीन एकरात कलिंगड घेतले. त्यातून एकरी किमान 20 टन उत्पादन घेतले. सध्या पावणेतीन एकरावर ढोबळी मिरची आहे. अडीच एकरात दीडशे टन उत्पादनाचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत 15 टन विक्री झाली असून किलोला 22 रुपये दर मिळत आहे. कोलकत्याचे व्यापारी जागेवरून माल नेत आहेत. पुणे, सातारा, मुंबई या ठिकाणी मालाची विक्री केली. मॉलसाठीही मालाला मागणी आहे. उन्हाळ्यात मिरचीचे पीक सुकून जाऊ नये म्हणून साडीचे शेड उभारून त्यात मिरची जगवली. ऐनवेळचा गरजेनुसार घेतलेला हा निर्णय महत्त्वाचा ठरला. अन्य शेतकऱ्यांचे प्लॉट वाळून गेले तेथे मोरे यांचा प्लॉट चांगल्या अवस्थेत होता. 

मोरे यांच्या शेतीची वैशिष्ट्ये 
* चांगल्या पगाराची नोकरी सोडून शेतीकडे वळले. 
* गेली दहा वर्षे पालाकुट्टी व पाचट कुजवून त्याचा शेतात वापर करतात. 
* संपूर्ण क्षेत्राला ठिबक सिंचनाने पाणी देतात. 
* यांत्रिकीकरणावर भर. गरजेनुसार विविध यंत्रे भावाच्या साह्याने बनवली. 
* एकरी शंभर टन ऊस उत्पादनासाठी नेहमी धडपड. त्यात यशही मिळाले. 
खोडव्याचेही एकरी 70 ते 80 टनांपर्यंत उत्पादन 
- नेहमी शिकण्याची वृत्ती. शास्त्रज्ञांचे सतत मार्गदर्शन घेतात. 
- पिकांचा सविस्तर अभ्यास करून दर्जेदार, कमाल आणि लक्ष्य ठरवून उत्पादनाचे प्रयत्न 
- परिसरात जी पिके होत नाहीत ती घेण्यावर अधिक भर 
परिसरातील शेतकऱ्यांचे मार्गदर्शक झाले आहेत. कृषी मंडळाची स्थापना. 


Ref. Link : http://www.agrowon.com/Agrowon/20120611/5578082911636012112.htmAgriculture Information