Friday, June 8, 2012

आम्ल वर्षा

खाणीमधील तेल, कोळसा, नैसर्गिक वायू इत्यादींच्या ज्वलनातून तसेच अशुद्ध सल्फाईड धातूच्या दगडाचे शुद्धीकरण सुरू असते. अशावेळी खूप मोठ्या प्रमाणात सल्फर आणि नायट्रोजन ऑक्‍साईड वायू हवेमध्ये सोडला जातो. हे वायू जेव्हा वातावरणातील आर्द्रतेच्या संपर्कात येतात तेव्हा त्यांच्यामध्ये होणाऱ्या रासायनिक अभिक्रियेतून सल्फ्युरिक आम्ल आणि नायट्रिक आम्ल तयार होते. यानंतर ही आम्ले पावसाच्या रूपाने म्हणजे पाणी, बर्फ किंवा धुक्‍याच्या स्वरूपात जमिनीवर पडतात. असा पाऊस म्हणजेच आम्ल वर्षा किंवा ऍसिड रेन होय. उत्तम सहाणे 


आम्ल वर्षा ज्याला इंग्रजीमध्ये ऍसिड रेन म्हणतात. असा पाऊस आपण कदाचित अनुभवला नसेल तरी या पावसाबद्दल नक्कीच ऐकले असेल. हा ऍसिड रेन काय आहे ते आपण थोडक्‍यात जाणून घेऊ या. पावसाच्या पाण्याला आपण शुद्ध पाणी म्हणतो. या पावसाच्या पाण्यामध्ये काही प्रमाणात कार्बन-डाय-ऑक्‍साईड (Co2) अमोनिया (NH3) आणि NH4 असतो. तसेच अल्प प्रमाणात धनभारीत आयर्न (Cations) (Ca++, Mg++. K+, Na+) आणि ऋणभारीत आयर्न (Anaions) (Cl2,- SO1-) असतात. शुद्ध पाण्याचा सामू 7.0 असतो. पडणाऱ्या पावसाचे पाणी ज्याला आपण शुद्ध पाणी म्हणतो त्याचा सामू 5.6 इतकाच असतो. याचाच अर्थ पावसाचे पाणी हे आम्लधर्मी आहे. जेव्हा या पावसाच्या पाण्याचा सामू 5.6 पेक्षा कमी होतो. अशा पावसाला आपण आम्ल वर्षा किंवा "ऍसिड रेन' असे म्हणतो. 

प्रदूषणाचा परिणाम आम्ल वर्षा होण्यामागे प्रदूषण हा महत्त्वाचा घटक आहे. वेगवेगळ्या प्रकारचे औद्योगिक कारखाने आणि वाहने यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात इंधनाचा वापर होतो. खाणीमधील तेल, कोळसा, नैसर्गिक वायू इत्यादींच्या ज्वलनातून तसेच अशुद्ध सल्फाईड धातूचे शुद्धीकरण सुरू असते. अशावेळी खूप मोठ्या प्रमाणात सल्फर आणि नायट्रोजन ऑक्‍साईड वायू हवेमध्ये सोडला जातो. हे वायू जेव्हा वातावरणातील पाण्याच्या किंवा आर्द्रतेच्या संपर्कात येतात तेव्हा त्यांच्यामध्ये होणाऱ्या रासायनिक अभिक्रियेतून सल्फ्युरिक आम्ल आणि नायट्रिक आम्ल ही दोन जहाल आम्ले तयार होतात. यानंतर ही आम्ले पावसाच्या रूपाने म्हणजे पाणी, बर्फ किंवा धुक्‍याच्या स्वरूपात जमिनीवर पडता. हीच आम्ल वर्षा किंवा ऍसिड रेन होय. 
जगात जो पाऊस पडतो त्यातील मोठ्या भागात या पाण्याचा सामू 4.0 ते 4.5 इतका आढळतो. हा सामू पाहिला तर तो शुद्ध पाऊस पडणाऱ्या क्षेत्रामधील सामूच्या कितीतरी पटीने अधिक आम्लयुक्त आहे. आतापर्यंत आम्ल वर्षा झालेल्यांपैकी सर्वांत जास्त आम्लयुक्त पावसाचा सामू (स्क्वाटलंड सामू-2.4, पश्‍चिम व्हर्जिनिया सामू-1.5, लॉस एंजलिस सामू-1.7) हा व्हिनेगार (सामू-3.0) आणि लिंबाच्या रसापेक्षा (सामू-2.2) कमी आढळला आहे. म्हणजेच तो जास्त आम्लधर्मी आहे असे म्हणू शकतो. 

वनस्पतींवर होणारा परिणाम  
आतापर्यंतच्या काही संशोधनातील निष्कर्षामध्ये आढळून आले आहे, की जेव्हा कधी एखाद्या भागामध्ये आम्लाचा पाऊस पडतो त्यातील 70 टक्के भाग सल्फ्युरिक ऍसिडचा तर 30 टक्के भाग हा नायट्रिक ऍसिडचा असतो. या प्रयोगामध्ये इतरही काही निरीक्षणे महत्त्वाची आहेत. आम्ल वर्षा ज्या भागात होते तेथील सूक्ष्मजीव, प्राणी, वनस्पती आणि नदी-नाल्यांमधील मासे यांच्यावर विपरीत परिणाम झाल्याचे दिसून आले आहे. 
एखाद्या पिकांवर किंवा वनस्पतीवर जेव्हा आम्ल वर्षा होते अशा वेळी विशेषतः झाडाच्या पानांवर लक्षणे दिसतात. यामध्ये पानांवर डाग पडणे, पाने करपून जाणे, पाने वेडीवाकडी होतात. काही वेळा पाना-फळांचे वजन कमी होते अशा प्रकारची काही लक्षणे दिसून आली आहेत. काही प्रयोगाअंती असे निदर्शनास आले आहे, की आम्ल वर्षा पडलेल्या ठिकाणी काही वनस्पतीच्या बियांची उगवण अतिशय चांगल्या संख्येने झाली तर उलटपक्षी इतर वनस्पतीच्या बियांची उगवण अतिशय कमी झाली. 

वनस्पतींवरील रोग आणि सूत्रकृमी यामध्येही पावसाच्या आम्लतेच्या तीव्रतेनुसार विविधता आढळून आली आहे. उदा. ओक वृक्षावरील तांबेरा रोगाचे प्रमाण हे साध्या पावसात पडणाऱ्या रोगांपेक्षा 14 टक्‍क्‍यांनी कमी झाले. वाल पिकाच्या मुळावरील सूत्रकृमींचे निरीक्षण केले असता आढळून आले की साधारण पडणाऱ्या पावसाच्या तुलनेत ज्या ठिकाणी 3.2 सामूची आम्ल वर्षा झाली अशा भागामधील वालाच्या मुळावरील सूत्रकृमीची अंडी सुमारे 34 टक्‍क्‍याने जास्त आढळली. 

अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रयोगांच्या निरीक्षणावरून आपण म्हणू शकतो की आम्ल वर्षा वनस्पती किंवा पिकांच्या आरोग्यावर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम करत असते. या विषयामध्ये नवीन संशोAgriculture Informationधन होणे खूप गरजेचे आहे. कारण सध्या हवामान बदलाचे परिणाम सर्वच थरावर जाणवायला लागले आहेत. या आम्ल वर्षाचा वेगवेगळ्या पिकांवर कशा प्रकारे आणि किती परिणाम होतो. तसेच उत्पन्नामध्ये कशी घट येणे, त्यावर काय उपाय करता येतील का अशा बऱ्याच प्रश्‍नांची उत्तर शोधण्याची गरज आहे. 

(माहिती स्रोत "ऍग्रोवायस न्यूज-लेटर' डिसेंबर 2010 )
(लेखक कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड, हिल, ता. डहाणू, जि. ठाण येथे कार्यरत आहेत.)
 


Ref. Link: http://www.agrowon.com/Agrowon/20120609/5530162041805349924.htm