Wednesday, July 18, 2012

मधमाश्‍यांनाही होतात रोग

इतर सजीव प्राणी, पक्षी व कीटकांप्रमाणेच मधमाश्‍यांनाही रोगांची लागण होते, त्यामुळे मधमाश्‍या सुस्त होतात, मधाचे उत्पादन कमी होते, रोगाची लागण झालेली राणीमाशी अंडी घालू शकत नाही. हे धोके लक्षात घेऊन मधमाश्‍यांच्या वसाहतींची सातत्याने तपासणी करावी. रोगाची लक्षणे दिसताच ताबडतोब उपाययोजना करावी. मधमाश्‍यांना दोन प्रकारे रोग होतात. 

 1. पूर्ण वाढ झालेल्या वयस्कर मधमाश्‍यांचे रोग - या प्रकारचे रोग फक्त वयस्क मधमाश्‍यांनाच होतात. उदा. अकेराइन व नोसेमा 
 2. पोळ्यातील मधमाश्‍यांच्या पिलाव्यास होणारे रोग - अशा अपरिपक्व परिस्थितीत मधमाश्‍यांच्या पिलाव्यांवर रोगांची लागण दिसते. उदा. युरोपियन फाऊल ब्रूड (EFB) व सॅक ब्रूड. 

वयस्क मधमाश्‍यांचे रोग - 
1) ऍकेराइन रोग - या रोगाची लागण ऍकेरीपस वुडी या माइटमुळे होते. यांचे वास्तव्य कामकरी माशी व राणीमाशीच्या श्‍वसन नलिकेत असते. यांचा प्रसार वयस्क मधमाश्‍यांत झपाट्याने होतो. 
रोगाची लक्षणे - 
 • अनेक मधमाश्‍या पेटीसमोर सरपटताना दिसतात. 
 • पुढचे व मागचे पंख वेगळे होतात व इंग्रजी "K' प्रमाणे दिसतात. त्यांना उडता येत नाही. 
 • मधमाश्‍यांना आव झाल्यामुळे पेटीसमोर अनेक पिवळे ठिपके दिसतात. 
 • मधमाश्‍या फार सुस्त व बधिर झालेल्या दिसतात. 
 • मधमाश्‍यांचे अनेक लहान लहान पुंजके पसरलेले दिसतात. 
उपाय - काही ऍकेरिसाईट उदा. फॉलबेक्‍स किंवा मेन्थोलच्या पट्ट्या आणि मिथिल सॅलिसिलेट वापरावे. 
डोस - 
 • एका वेळेस एकच पट्टी वापरावी. साधारण सहा ते सात दिवसांच्या अंतराने सहा - सात वेळा वाफाऱ्यासाठी वापरावे. मिथिल सॅलिसिलेट 15 मि.लि. एका छोट्या बाटलीत ब्रूडफ्रेमच्या वर ठेवतात, त्याच्या वाफेचा परिणाम होतो. 
 • लागण झालेल्या वसाहतींचे व्यवस्थापन योग्य रीतीने करून स्वार्मचे जाणे रोखावे, तसेच रॉबिंग, ड्रिफ्टिंग व वसाहतींचे स्थलांतर मर्यादित करावे व काळजी घ्यावी. 

2) नोसेमा रोग - हा रोग मधमाश्‍यांना नोसेमा एपिसमुळे होतो. याचे स्पोर्स त्यांच्या अन्ननलिकेतून जातात व शरीरातून मैल्याद्वारे बाहेर पडतात व वसाहतीत पसरतात, त्यामुळे रोगाचा प्रसार होतो. 
रोगाची लक्षणे - 
 • मधमाश्‍यांना उडता येत नाही. त्यांच्या पातळ मैल्याचे थेंब पोळ्यावर, पेटीच्या तळपाटावर, प्रवेशद्वारासमोर विखुरलेले दिसतात.
 • मेलेल्या किंवा मरायला टेकलेल्या मधमाश्‍या पेटीजवळ दिसतात.
 • वसाहतीतील कामकरी माश्‍यांची संख्या लक्षणीय कमी झालेली दिसते. 
 • मध उत्पादन कमी होते. 
 • रोगाची लागण झाल्यामुळे राणीमाशी अंडी घालू शकत नाही, त्यामुळे अंडी घालणे बंद करते. 
उपाय - 
 • ऍन्टिबायोटिकचे उपचार जसे फ्युमॅगिलिन किंवा फ्युमिडिल बी वापरावे. 
 • प्रमाण - 100 मिलिग्रॅम फ्युमॅगिलिन प्रति वसाहत या प्रमाणात ................250 मिलि थंड साखरेच्या फिडिंगबरोबर दहा दिवस रोज द्यावे, तसेच मधमाश्‍यांच्या अंगावर त्याचा शिडकावा केल्यास परिणामकारक होतो. 
 • दोन मि.लि. ऍसिटिक ऍसिड (98 टक्के) ...............प्रति 100 मि.लि. जागेवर अंतर ठेवून वाफारा दिल्यास रोगाची लागण रोखण्यास मदत होते. 

ब्रूड डिसीज किंवा पिलावळांचे रोग - 
1) युरोपियन फाऊल ब्रूड (EFB) - मधमाश्‍यांना होणारा हा प्रमुख रोग आहे. या रोगाची लागण मेलिसोकॉकस प्लुटॉन या जिवाणूंमुळे होते. मधमाश्‍यांच्या तिन्ही अवस्थांमध्ये म्हणजे अंडी, अळी व प्युपा या अवस्थेत या रोगाची लागण होते, त्यामुळे याचा प्रसार वसाहतीतील नर्स व स्वच्छता करणाऱ्या कामकरी माश्‍यांमुळे होतो; तसेच वसाहतीचे ड्रिफ्टिंग, रॉबिंग, युनायटिंग व फिडिंगमुळे रोगाची लागण दुसऱ्या वसाहतीत पसरते. 
रोगाची लक्षणे - 
 • सभोवताली चांगला बहर असला तरी वसाहतीतील मधमाश्‍यांची संख्या रोडावते, ती अशक्त होते. 
 • ब्रूड विरळ झालेला दिसतो. 
 • अळ्या मेलेल्या दिसतात. 
 • लागण झालेले लार्व्हा किंवा अळ्या पारदर्शक दिसतात व मग मरतात. 
 • असे कुजलेले लार्व्हा चिकट होतात व नंतर वाळून पापुद्रे होतात आणि दुर्गंधीयुक्त वास येतो. 
उपाय - 
 • अँटिबायोटिक टेरामायसीनचा वापर करावा. 
प्रमाण - 
 • 250 मि.ग्रॅ. टेरामायसीन 150 - 300 मि.लि. साखरेच्या फिडिंगमधून तीन वेळा सात दिवसांच्या अंतराने द्यावे. 

मधमाश्‍यांचे व्यवस्थापन - 
 1. अशक्त वसाहतींचे एकत्रीकरण.
 2. फुलोरा नसेल त्यावेळेस योग्य उपाय - फिडिंग किंवा स्थलांतर करणे. 
 3. रोगाची लागण झालेल्या वसाहतीला वेगळे करून इतर वसाहतींपेक्षा लांब व स्वतंत्र ठेवणे. 
 4. पोळ्यांची अदलाबदली, संपर्कात आलेले बी टूल्स इ. काळजी घेणे. 
 5. रोगांची लागण न झालेल्या वसाहतींची निवड करून त्यापासून नव्या वसाहती करणे. 

थाई सॅक ब्रूड डिसीज (TSB) - 
या रोगाच्या विषाणूंची अळीच्या सुरवातीच्या अवस्थेतच लागण होते व थोड्याच दिवसांत मरतात. वसाहतीत या रोगाची लागण मधमाश्‍यांच्या आपसांतील संपर्कामुळे पसरते. लागण झालेले "स्वार्म', ड्रिफ्टिंग, रॉबरी, ब्रूड कोंबचे बदली करताना व फिडिंगमधूनही एका वसाहतीतून दुसऱ्या वसाहतीत झपाट्याने लागण पसरते. 

रोगाची लक्षणे - 
 • ब्रूड/ अळ्या मोठ्या प्रमाणात मरतात. 
 • वसाहतीतील मधमाश्‍यांची संख्या झपाट्याने कमी होऊन खूप अशक्त होते. 
 • सॅक म्हणजे मेलेल्या प्युपी व लार्व्हाचे (अळ्या) पिशवीसारखे आकार दिसतात व त्यात पिवळसर हिरवट घट्ट चिकट पदार्थ दिसतो. 
 • यापुढच्या अवस्थेत मधमाश्‍यांना ते सॅक काढून टाकतासुद्धा येत नाही व ते खाली तळपाटावर पडतात किंवा पोळ्याच्या कोषातच राहतात, कुजतात व काळे पडतात. सुरवातीस लक्षणांवरून थाई सॅक ब्रूड हा युरोपियन फाऊल ब्रूड सारखाच वाटतो, त्यामुळे तसा भ्रम होतो. पिशवीसारखे आकार व सील्ड प्युपीचे अवस्थेतपण मेलेले दिसतात. हे थाई सॅक ब्रूड डिसीजचे वैशिष्ट्य आहे.