Wednesday, July 18, 2012

मोसंबीमधील मूळकूज, डिंक्‍या आणि ग्रीनिंग

ट्रिस्टेझा 

ट्रिस्टेझा हा एक विषाणूजन्य रोग असून, तो जवळपास सर्व लिंबूवर्गीय फळपिकांवर आढळून येतो. सोर ऑरेंज खुंटावरील मोसंबी या संयोगात रोगाची लक्षणे सर्वांत तीव्र दिसतात. झाडाची नवीन फूट पूर्णपणे किंवा अपूर्ण अवस्थेत दबून राहते. पाने निस्तेज किंवा त्यावर विविध पिवळ्या रंगाच्या छटा दिसतात. पाने लांब दिशेने परंतु आतील बाजूने कुरळी होतात. पानातील शिरा पिवळ्या दिसतात. काही पानातील शिरा अधिक जाड किंवा फुगलेली दिसतात. नवीन पालवीचे पोषण नीट न झाल्यामुळे पानगळ होते. कलम जोड जवळील सालीच्या आतील भागात सुईने टोकरल्यासारखी खोल व्रण (स्टेम पिट्‌स) आढळतात. पानातील शर्करायुक्त पदार्थ झाडामध्ये साठवले जाऊन यामुळे नवीन पालवी व फुले भरपूर येतात; परंतु अन्नद्रव्यांचे अभिसरणात अडथळा आल्यामुळे फळे अपक्व स्थितीतच वाळतात किंवा गळतात. जमिनीतील ओल कमी झाल्यावर नवीन पाने चटकन वाळतात व काही झाडे एकाएकी कोसळतात. मावा कीटक व विषाणू या रोगाचा प्रसार करतात. रोगग्रस्त मोसंबी झाडातील डोळकाडी कलमे तयार करण्यासाठी वापरल्याने रोगाचा प्रसार होतो. 

व्यवस्थापन-
रोगमुक्त मोसंबी मातृवृक्षातून डोळकाडी कलमे तयार करण्यासाठी वापरावी. विषाणूग्रस्त झाडे बागेतून काढून टाकावीत. विशेषतः नवीन पालवी आल्यावर मावा किडींचे नियंत्रण करावे. रंगपूर लिंबू व सहनशील जातीचा खुंट मोसंबीची कलमे तयार करण्यासाठी वापरावा. कलमे तयार करण्याकरिता वापरण्यात आलेला चाकू, कात्री सोडिअम हायपोक्‍लोराइटच्या द्रावणात (15 मि.लि. प्रति लिटर पाणी) निर्जंतुक करावी. 

मूळकूज, पायकूज व डिंक्‍या-
सुरवातीस रोगग्रस्त झाडाची पाने निस्तेज होऊन नंतर पानगळ होते. झाडाची तंतुमय मुळे कुजतात, अशा मुळांची दुर्गंधी येते. कूज मोठ्या मुळापर्यंत जाऊन नंतर झाडाच्या बुंध्यावर पायकूज होतो. तेथे उभ्या चिरा पडतात आणि त्यातून पातळ डिंकाचा स्राव होतो. पायकूजग्रस्त सालीखालचा भाग गडद तपकिरी रंगाचा होतो. झाडाअंतर्गत अन्नद्रव्यांचे अभिसरण मंदावल्यामुळे अकाली बहर येऊन फळे अपक्व स्थितीत गळतात. नवीन फुटलेल्या फांद्या हळूहळू सुकतात. ही मर बुंध्याकडे सरकत जाते आणि झाडाचा ऱ्हास होतो. जास्त पावसाळी वातावरणात फळकूज आणि पानगळ होते. 

हा रोग फायटोप्थोरा बुरशीच्या प्रादुर्भावामुळे होतो. या बुरशीचा प्रसार पावसाच्या पाण्यामार्फत किंवा सिंचनाच्या पाण्यामार्फत होतो. जंतूग्रस्त रोपे लागवडीस वापरल्याने नवीन लागवडीत रोगाचा शिरकाव होतो. जमिनीत सतत ओल राहणे किंवा मातीचे तापमान 24-32 अंश सेल्सिअस रोगजंतूच्या वाढीस अनुकूल आहे. 

व्यवस्थापन-
अतिभारी व निचरा नसलेल्या जमिनीत लागवड करू नये. लागवड करतेवेळी कलम जोड जमिनीपासून 20-25 सें.मी. उंचीवर असावा. आवश्‍यकतेपेक्षा जास्त पाणी झाडास देऊ नये, खोडास पाणी लागू देऊ नये, झाडास दुहेरी आळे (बांगडी) पद्धतीने पाणी द्यावे. मूळकूजग्रस्त मुळे छाटून त्या ठिकाणी ताम्रयुक्त बुरशीनाशक 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून मुळांवर शिंपडावे. यानंतर मातीने मुळे झाकावीत. पावसाळ्यापूर्वी फोसेटील-एल (30 ग्रॅम/ 10 लिटर पाणी) एक फवारणी व पावसाळ्यानंतर जमिनीपासून 60 ते 90 सें.मी. उंचीपर्यंत झाडांच्या खोडावर बोर्डो पेस्ट(1 किलो मोरचूद + 1 किलो चुना + 100 लि. पाणी) लावावी. पायकूजग्रस्त भाग चाकूने खरडून त्या ठिकाणी बोर्डो पेस्ट जमिनीपासून 60 ते 90 सें.मी. उंचीपर्यंत पावसाळ्यापूर्वी व नंतर लावावे. 20 ग्रॅम मॅन्कोझेब अधिक मेटॅलॅक्‍झिल हे संयुक्त बुरशीनाशक 10 लिटर पाण्यात मिसळून प्रत्येक झाडास आवश्‍यकतेप्रमाणे (20-30 लिटर) द्रावण खोडाशेजारी ओतावे. फळकूज किंवा पानगळ नियंत्रणासाठी एक टक्का बोर्डो मिश्रणाची (मोरचूद 1 किलो + चुना 1 किलो + पाणी 100 लिटर) फवारणी करावी. आंतरमशागत करताना झाडाच्या खोडास, फांद्यांना आणि मुळांना जखम होऊ देऊ नये. सहनशील खुंटाचा कलम तयार करण्यासाठी वापर करावा. उदा. रंगपूर लाइम. 

ग्रीनिंग-
ग्रीनिंग हा एक अणुजिवाणूजन्य रोग आहे. लिंबूवर्गीय फळझाडांपैकी मोसंबी फळपिकावर त्याचा सर्वाधिक प्रादुर्भाव होतो. सुरवातीस झाडातील एखाद्या मोठ्या फांदीतील पाने निस्तेज व गर्द पिवळी दिसतात. पक्व पानातील शिरा पिवळ्या होतात किंवा पक्व पानात हिरवे-पिवळे चट्टे दिसतात. काही पानांच्या शिरेच्या दोन्ही बाजू पिवळ्या होऊन कडा फिक्कट पिवळ्या दिसतात (सूक्ष्म अन्नद्रव्य जस्ताच्या कमतरतेसारखी लक्षणे दिसतात.) नवीन फुटीमधील पाने लहान आकाराची, जाड आणि खरबरीत असतात. तसेच पाने सरळ दिशेने वाढतात. काही पाने पिवळी होऊन त्यामध्ये गडद हिरवे ठिपके (बेटे) दिसतात. अशा फांद्या खुरट्या राहतात. झाडांना अवेळी बहर येतो, फळे लहान व विकृत आकाराची, रंगाने एकसारखी नसलेली, संख्येने कमी, चवीला कडवट आणि त्यातील बी अनेकदा अपक्व राहतात. सूर्यप्रकाशात उघडी असलेली फळे पिवळी होतात आणि सावलीतील फळे हिरवी राहतात. "सिट्रस सिला' या रस शोषणाऱ्या किडीमार्फत या रोगाचा बागेत प्रसार होतो. रोगग्रस्त झाडातील डोळकाडी मोसंबी रोपवाटिकेत कलम तयार करण्यासाठी वापरल्यास या स्रोतांतून रोगाचा प्रसार होतो. रोपवाटिकेतून रोगग्रस्त कलमे नवीन लागवडीकरिता वापरल्यास अशा भागात रोगाचा शिरकाव होतो. 

व्यवस्थापन-
मोसंबीचे कलम तयार करण्यासाठी रोगमुक्त मातृवृक्षातून डोळकाडी वापरावी. रोगग्रस्त झाडे बागेतून काढून टाकावी. सिट्रस सिला कीटकांचा नवीन पालवी आल्यावर बंदोबस्त करावा. संसर्गदूषित भागातून डोळकाडी किंवा कलमे नवीन भागात लागवडीसाठी वापरू नये. मोसंबी कलम तयार करण्याकरिता वापरण्यात आलेले चाकू, कात्री सोडिअम हायपोक्‍लोराईटच्या द्रावणात (15 मि.लि. प्रति लिटर पाणी) निर्जंतुक करावी.