Wednesday, July 18, 2012

शेतीला जोड पूरक व्यवसायाची यशकथा राशीनच्या मोढळे कुटुंबीयांची

राशीन (जि. नगर) येथील मोढळे बंधूंनी जनावरे संगोपनात चांगले यश मिळवले आहे. त्याबाबत अनुभव सांगताना रमेश म्हणाले, की कोऱ्हाळे (ता. बारामती) येथे गेलो असताना गणपत जगताप यांचा तीनशे गाईंचा गोठा पाहिला. त्यातूनच गोठा व्यवस्थापनाची प्रेरणा मिळाली. प्रथम पाच गाईंची खरेदी करून छपरात गोठा सुरू केला. सन 2007 मध्ये गोठा उभारणीसाठी राष्ट्रीय बॅंकेकडून पाच लाख रुपयांचे कर्ज घेतले. त्यामध्ये अडीच लाख रुपयांची रक्कम स्वतःजवळची गुंतवून सर्व सुविधांनी युक्त असा गोठा निर्माण केला. पाच गाईंपासून सुरू केलेल्या गोठ्यात आज 109 जनावरे असून, त्यात 80 टक्के होल्स्टिन फ्रिजन, दोन गावरान गाई, चार खोंड, एक गीर अशा विविध जातींचे संगोपन केले आहे. सुमारे वीस वर्षांपासूनचा पारंपरिक गोठा संगोपन व्यवसाय मोढळे कुटुंबीय चालवत आहेत. यात 125 जनावरांच्या क्षमतेचा गोठा "कामधेनू' नावाने उभा केला असून, त्यात 25 वासरांसाठी बंदिस्त गोठा केला आहे. या संपूर्ण गोठ्यात दोन गाईंच्या मध्ये कुंडी असून, त्याद्वारे पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे. स्प्रिंकलरद्वारे गोठ्यातील जनावरे आहे त्याच ठिकाणी धुण्याची सोय आहे. दिवसातून दोन वेळा गाईंना स्नान घातले जाते. घरच्या विहिरीवरून गोठ्यापर्यंत पाइपलाइन केल्याने दररोजच्या 10 ते 12 हजार लिटर पाण्याची सोय झाली आहे. 

चाऱ्याचे नियोजन : 
सुमारे वीस एकरवर चारापिकांची सोय आहे. सध्याच्या पाणीटंचाईच्या काळात चाऱ्याचे प्रमाण कमी झाले आहे; मात्र अजून तीन-चार महिने पुरेल इतका चारा आहे. वैरण, मका, ऊस, गोळी पेंड असा चारा प्रत्येकी आठ तासांच्या अंतराने तीन वेळा जनावरांना दिला जातो. एका वेळेस एका गाईस 15 किलो कुट्टी, तीन किलो गोळी पेंड, दोन वेळा आवश्‍यक व्हिटॅमिनसाठी मिनरल मिक्‍श्चर प्रत्येक गाईस 30 ते 35 ग्रॅम दिले जाते. खुराकासाठी 65 हजार रुपयांचे अत्याधुनिक कडबा कुट्टी यंत्र आणले असून, एक तासाला पाच टन चाऱ्याची कुट्टी तयार केली जाते, त्यामुळे जनावरांना वेळेवर चारा मिळतो. 

गोठ्याचे व्यवस्थापन : 
मोढळे यांनी कामधेनू गोठा स्वच्छ, दुर्गंधीमुक्त ठेवला असून, दररोज गोठा स्वच्छ धुतला जातो, त्यामुळे जनावरांना आजारांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. वेळच्या वेळी विविध प्रकारचे लसीकरण त्यांना केले जाते. लाळ्या खुरकूत, बुळकांडी आदी रोगांसाठी प्रतिबंधक इलाज केले जातात. गोठा व्यवस्थापनासाठी उत्तर प्रदेशहून पाच मजूर आणले आहेत. मोढळे देखील गोठ्यात स्वतः राबतात. प्रति कामगार प्रति महिना सहा हजार रुपये पगार दिला देतो. गावरान गाईला खोंड झाले, तर ते 35 हजार रुपयांपर्यंत विकले जाते. जर्सी खोंडापेक्षा गावरान खोंडांना जास्त किंमत मिळते. जातिवंत वळूपासूनची पैदास असेल तर बाजारात चांगली किंमत मिळते. 

दूध शीतकरण केंद्राची निर्मिती : 
मोढळे म्हणाले की गोठा सुरू केल्यावर पहिले सहा महिने एक हजार लिटर दुधाचे संकलन व्हायचे, त्यामुळे शीतकरण केंद्राची गरज भासू लागली. त्यातूनच 2007 मध्ये बारामतीच्या एका कंपनीच्या साह्याने दीर्घ करार करून शीतकरण यंत्र आणले. शीतकरण केंद्र उभे केले. त्यामुळे आमच्याबरोबर परिसरातील शेतकऱ्यांचे दूधही संकलित करता येऊ लागले. आज घरचे पाचशे आणि इतरांचे अडीच हजार लिटर दूध मिळून एकूण सुमारे तीन हजार लिटर दुधाचे संकलन होते. हे दूध बारामतीच्या संस्थेकडे विक्रीला पाठवले जाते. लिटरला 16 रु. दर मिळतो. आठ हजार रुपये दिवसाचे उत्पन्न मिळते. खर्च सव्वा हजार रुपये येतो. सुमारे दोनशे ट्रेलर शेणखत मिळते. साडेतीन हजारांना शेणखताचा एक ट्रेलर याप्रमाणे केवळ शेणखतातून सात लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. मात्र हे खत न विकता ते शेतातच डाळिंब, मका, कडवळ आदी पिकांना वापरल्याने त्यातून उत्कृष्ट चारा मिळतो. आज गोठ्यात 70 टक्के कालवडी व 30 टक्के गाई आहेत. 

डाळिंबातून मिळवले यश 
भगव्या डाळिंबाची शेती, 
कुटुंबाची संयुक्त सुमारे 90 एकर शेती आहे. त्यात केवळ डाळिंब पिकालाच प्राधान्य दिले आहे. अन्य क्षेत्रात मका, कडवळ, तसेच खाण्यापुरती ज्वारी आहे. आर्थिक परिस्थिती बदलवणारे पीक म्हणून 1999 मध्ये अडीच एकर क्षेत्रात भगवा डाळिंबाची लागवड केली. सन 2002 मध्ये पहिले उत्पादन घेतले. ते थेट दिल्ली बाजारपेठेत विक्रीला पाठविले. लागवड करताना शेणखत, सिंगल सुपर फॉस्फेट, बुरशीनाशक मातीत व्यवस्थित मिसळून खड्डे भरून घेतले व रोपांची लागवड केली. सन 2005 मध्ये आठ एकर नवी, तसेच 2009 मध्ये आणखी दहा एकर नवी लागवड केली. सन 2011 मध्ये पुन्हा पाच एकर अशी मिळून सुमारे 25 एकर क्षेत्राची डाळिंब बाग तयार केली. या बागेचे नियोजन मोहन या बंधूंसोबत सतीश मोढळे पाहतात. ते कृषी पदवीधर आहेत. राशीन येथे कृषी साहायकपदी कार्यरत असल्याने लागवडीचे नियोजन चांगल्या प्रकारे करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. फळधारणेसाठी छाटणीच्या आधी प्रत्येक झाडाला 40 ते 50 किलो शेणखत, अर्धा किलो पोटॅश तसेच झिंक, फेरस, मॅग्नेशिअम, सल्फर या सूक्ष्म मूलद्रव्यांची मात्रा दिली जाते. गरजेनुसार कीडनाशकांच्या फवारण्या, तसेच पीकपोषणासाठी विद्राव्य खतांचा वापर केला जातो. डाळिंबाचे एकरी सरासरी उत्पादन आठ ते दहा टन आहे. रासायनिक खतांच्या तुलनेत घरच्या शेणखतावर अधिक भर दिला आहे. त्यामुळे झाडांचे पोषण अधिक चांगले झाल्याचे मोढळे म्हणतात. सध्या फळांची काढणी सुरू असून, किलोला 72 रुपये दर मिळाला आहे. अलीकडील वर्षांत सरासरी दर 55 ते 60 रुपये राहिला आहे. काही वेळा तो 80 ते 90 रुपयेही मिळाला. सांगोला, पंढरपूर, नाशिक असे व्यापारी जागेवर माल खरेदी करतात, त्यामुळे आडत, हमाली व वाहतूक दरात बचत होते. विहीर, जवळून गेलेला कॅनॉल यामुळे पाण्याची सोय आहे. अजून 35 एकर क्षेत्र डाळिंबासाठी वाढवण्यात येणार आहे. मोढळे यांची डाळिंबाची रोपवाटिकाही आहे. 

महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि कृषी विभागाच्या प्रतिनिधींनी क्षेत्राची संयुक्त पाहणी करून रोपवाटिकेस मान्यता दिली. शासकीय दराप्रमाणे रोप विकले जाते. सध्या 25 रुपये प्रति रोप विक्री केली जाते. 


  • सन 1988 मध्ये रमेश मोढळे यांनी छपरात सुरू केलेला गाईंचा गोठा. 
  • याच गोठ्याचे आज "कामधेनू' नावाने आधुनिक रूपांतर केले आहे. 
  • मोढळे यांच्या कामधेनू गोठ्याला ऑस्ट्रियाच्या अभ्यासक व संशोधक प्रा. मारिया व रोमेला यांनी भेट दिली. 
  • भगव्या डाळिंबाने बहरलेले झाड दाखविताना सौ. मंदोदरी व सतीश मोढळे. 
  • डाळिंब बाजारपेठेत पाठविण्यापूर्वी प्रतवारी करताना मोढळे कुटुंबीय.
संपर्क - सतीश मोढळे - 9423389363 
रमेश मोढळे - 9975315405