Wednesday, July 18, 2012

स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाची पूर्वतयारी

1) पुस्तकांची निवड - 
बाजारात पुस्तकांच्या दुकानात अनेक प्रकाशनांची आणि लेखकांची पुस्तके उपलब्ध आहेत. जेव्हा आपण निवडक पुस्तकांची खरेदी करण्याचे ठरवतो तेव्हा आपणास अनेक पुस्तकांपैकी ठराविक निवडक पुस्तकांची खरेदी करणे अत्यंत गरजेचे ठरते. भारंभार लिखाण, पुस्तकात विषयास अनुसरून लिखाण, लिखाण केलेले साहित्य वाचताना समजणे या सर्व बाबी ध्यानात घ्याव्याच लागतात. परीक्षेचा अभ्यासक्रम आणि त्यानुसार तयार केलेली अनेक पुस्तके आपणास पाहावयास मिळतात. त्यातील कोणत्या प्रकाशनाची आणि लेखकांची पुस्तके आपण निवडावीत हा खरा मनात घोळणारा प्रश्‍न असतो. आपल्याजवळ तयारी करण्यासाठी असलेला उपलब्ध वेळ आणि त्या वेळेत आपणाकडून कमीत कमी दोन ते तीन रिव्हिजन होण्यासाठी थोडक्‍यात मुद्देसूद लिखाण असलेले शिवाय वाचताना आपल्या ध्यानात राहील त्याचप्रमाणे त्याचे नीट आकलन होईल, असे लेखन साहित्य कोणते आहे याची पारख उमेदवारांनाच करावी लागते. त्यामुळे याबाबतीत उमेदवार चोखंदळ असलेच पाहिजेत. तसे उमेदवारांनी आपले मत बनवणे अत्यंत आवश्‍यक आहे. अन्यथा, बाजारात उपलब्ध साहित्य आहे म्हणून मोठ्या प्रमाणात खरेदी होते; मात्र जमवलेल्या साहित्यातील पुस्तकांचे वाचन एकदाही होत नाही. बऱ्याचशा उमेदवारांच्या बाबत असेच घडते. त्यामुळे परीक्षेस बसणाऱ्या उमेदवारांच्या संख्येच्या तुलनेने अशा प्रकारचा दृष्टिकोन ठेवलेले उमेदवार कमी असतात. त्यामुळेच अशा प्रकारचे निवडीची दृष्टी ठेवूनच हे काम व्यवस्थित प्रकारे करावे लागते. वाजवीपेक्षा अधिक पुस्तकांची जमवाजमव शक्‍यतो करू नये, अन्यथा त्या सर्व साहित्याचे वाचन झाले नाही म्हणून उमेदवारांच्या मनात शंका निर्माण होऊन उमेदवाराची उमेद कमी होते. त्यासाठी पुस्तकांची निवड ही बाब अतिशय महत्त्वाची असते. 

2) लेख - 
बऱ्याचदा वर्तमानपत्रात, नियतकालिकात अनेक विषयांवर विपुल लिखाण सुरू असते. जेव्हा आपण योजना किंवा लोकराज्य यासारखी नियतकालिके वाचतो तेव्हा एखाद्या विषयावरील लेखात मुद्दे फार थोडे असतात आणि त्या लेखकाने त्या मुद्यांचे विश्‍लेषण करण्यासाठी इतर मजकूर भरपूर लिहिलेला असतो. योजना आणि लोकराज्य ही मासिके खूप चांगली आहेत. मात्र त्यांचे वाचन करताना त्या लेखावरील आपली स्वतंत्र टिपणे आपणच करणे अधिक फायद्याचे ठरते. वर्तमानपत्रामध्येही बरेच लेख येतात. त्या लेखावरील आपली टिपणे वेगळी काढणे हे आपले काम असते. एखाद्या लेखाचे वाचन केल्यानंतर ही बाब प्रकर्षाने आपल्या लक्षात येते, की तीन किंवा चार मुद्यांच्या भोवतीच सर्व लिखाण केलेले असते. त्या लेखातील तीन किंवा चार मुद्दे अत्यंत महत्त्वाचे असे नीट समजून घेऊन त्यांची टिप्पणी आपण वेगळी केल्यास त्या मुद्यांच्या वाचनाने आपणास त्या विषयाबाबतच्या वस्तुनिष्ठ प्रश्‍नांची उत्तरे अचूक देणे शक्‍य होते. 

3) वाचनाची सवय - 
दररोजच्या वाचनाची आणि अभ्यासाची वेळ ठरवून त्या संदर्भातील पुस्तके आणि त्या त्या विषयावरील लिखाण वाचून उपयुक्त पुस्तकांच्या वाचण्यावर अधिक भर देणे गरजेचे ठरते. पहिल्या फेरीचे वाचन आपण करीत असताना योग्य त्या वेगाने ते आत्मसात करण्याचा प्रयत्न करावा लागतो. न समजलेल्या भागासाठी योग्य त्या व्यक्तींचे मार्गदर्शन घेण्याचा प्रयत्न जरूर करावा. ते शक्‍य नसल्यास आपल्या अशाच गटातील विद्यार्थी मित्रांशी चर्चा करून विषय समजून घेण्याचा प्रयत्न केल्यास आपणास त्या त्या विषयाचे चांगले आकलन होते. त्यासाठी वेळ मिळेल तेव्हा अशा चर्चांवर भर देणे फायद्याचे ठरते. एखाद्या पुस्तकातून वाचलेला एखाद्या टॉपिकबद्दल शंका येत असल्यास त्याच विषयातील दुसऱ्या पुस्तकातून त्यांचे निराकरण होत असल्यास तसेही करण्याचे जरूर प्रयत्न करावेत. एकूणच लेखक एखादा विषय हलक्‍याफुलक्‍या भाषेत समजेल या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्यातील आशय आपणास नीट समजणे गरजेचे असते. त्यामुळे वस्तुनिष्ठ प्रश्‍न असो की सविस्तर उत्तरे लिहिणे असो, ही बाब उमेदवारांना सहज येऊ शकते. वाचण्यासाठी स्वतंत्र दिवसभराचे वेळापत्रक बनविणे गरजेचे असते. त्यानुसार आपला किती अभ्यास झाला आणि किती अद्याप बाकी आहे, याचा नीटपणे रोजच्या रोज अंदाज येतो. उरलेल्या अभ्यासासाठी कशाप्रकारे वेळ वापरावयाचा याचेही नियोजन दररोज करून वेळ वाया जाणार नाही, याची दक्षता घेणे गरजेचे असते. वाचनाबद्दल आवड आणि ते वाचन व्यवस्थितपणे करणे हेही महत्त्वाचे आहे. 

4) चुका टाळणे गरजेचे - आपण ज्या स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करीत असाल तेव्हा आपल्याकडून त्याच त्याच चुका पुन्हा पुन्हा होताना आपल्या लक्षात येईल. तेव्हा सतर्क राहून चुका टाळण्याचा प्रयत्न करणे फार गरजेचे असते. एखाद्या पुस्तकाची निवड करण्यात येणारी चूक. एखाद्या लेखातील आशय चुकीचा असल्यास त्याबाबत इतरत्र माहिती घेतल्यानंतर आपण केलेल्या टिपणामध्ये करावयाची दुरुस्ती तत्परतेने करणे गरजेचे असते. एखाद्या विषयासाठी असलेले गुण आणि ते साहित्य वाचनासाठी द्यावयाचा वेळ या सर्व बाबी आपल्या आपणास तपासून पाहणे गरजेचे असते. बऱ्याचदा एखाद्या विषयाला अभ्यासक्रमात अत्यंत कमी वेटेज दिलेले असल्यास त्या विषयावरील वाचनासाठी त्यानुसारच वेळेचे बंधन ठेवले पाहिजे. अन्यथा, बराच वेळ अशा विषयांच्या वाचनासाठी दिला जातो आणि अधिक गुण असणारे विषय मागे पडतात. या सर्व परिस्थितीमुळे आपला आत्मविश्‍वास कमी होण्यास सुरवात होते. मात्र अशावेळी आपण योग्य वेळी त्यात बदल करून चुका टाळण्याने सुधारणा होऊ शकते. 

आपले प्रगती पुस्तक आपणच तपासावे - 
अभ्यासाच्या साहित्याची जमवाजमव झाल्यानंतर जेव्हा आपण अभ्यासाला वेग घेतो त्या वेळी आपली त्याबाबतची कामाची प्रगती आपणच तपासून त्यानुसार त्यात काही बदल करणे गरजेचे वाटल्यास योग्य ते बदल करून प्रगतीचा टप्पा गाठणे शक्‍य होते. मात्र आपली प्रगती आपणच तपासली नाही तर आपणास योग्य ते बदल करता येत नाहीत. जेव्हा आपल्या दररोजच्या वेळापत्रकानुसार आपला अभ्यासक्रम उरकत नसेल तेव्हा फेरविचार करून त्याचा मेळ घालण्याचे काम करावे लागते. 

भाषा विषयांसाठी खास तयारी गरजेची - 
मराठी आणि इंग्रजी हे अनिवार्य विषय असल्याने या भाषा विषयांचे व्याकरण आणि शुद्धलेखन यासाठी भरपूर पुस्तके बाजारात आहेत. त्यातील योग्य त्याच पुस्तकांची निवड होणे गरजेचे असून वेळ पडल्यास त्यासाठी खास मार्गदर्शन घेणेही आवश्‍यक ठरते. मातृभाषा मराठी असूनही आपण असंख्य चुका करतो. तसेच इंग्रजी भाषा इंग्रजांची असली तरी ती जगभर मोठ्या प्रमाणात वापरली जाणारी भाषा आहे. भाषाशैली उत्तम असणे ही बाब प्रत्येक उमेदवाराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असते. त्यामुळेच भाषा विषयांच्या तयारीसाठी दुय्यम स्थान देऊ नये. निबंध लेखन, पत्र लेखन, एखाद्या उताऱ्यावरील (पॅरेग्राफ) उत्तरे अशा अनेक प्रकारांना सामोरे जात असताना उत्तम शैली तयार होण्यासाठी योग्य मार्गाने प्रयत्न होणे गरजेचे असते. बऱ्याचदा उमेदवार या दोन्ही विषयांना दुय्यम स्थान देतात. मात्र त्यामुळे त्या विषयातील गुण कमी होते आणि पर्यायाने मेरिट यादीत आपला क्रमांक खाली जातो. त्या वेळी ही बाब लक्षात आल्यानंतर पुढच्या परीक्षेच्या वेळी उमेदवार त्या विषयाचे तयारीस लागतात. तोपर्यंत आपला बराच वेळ गेलेला असतो. तसेच आपला आत्मविश्‍वास कमी होतो. या सर्व बाबी टाळण्यासाठी परीक्षांचे पूर्वतयारीच्या दृष्टीने या दोन्ही विषयांना योग्य ते महत्त्व देऊन हे विषय उत्तम करण्याकडे उमेदवारांनी भर देणे गरजेचे ठरते. दर्जेदार लिखाण आणि त्याची मांडणी या बाबीही महत्त्वाच्या ठरतात. त्याशिवाय भाषेवरील प्रभुत्वही महत्त्वाचे ठरते. त्यासाठी भाषा विषयांची खास तयारी करावी. 

मुलाखतीसाठी उत्तम पूर्वतयारी - मुलाखतीसाठी ऐनवेळी तयारी होणे कठीण जाते. त्यासाठी बोलण्याचा सराव ठेवणे. इतरांशी बोलताना आपले मुद्दे सोप्या सुटसुटीत शब्दांत प्रभावीपणे मांडणे. त्यासाठी अवांतर वाचनाची आवड बाळगून त्यासाठी आपल्या वेळापत्रकात त्यास महत्त्व देणे गरजेचे ठरते. दररोजच्या वर्तमानपत्रातील जगभरातील, देशपातळीवरील, प्रादेशिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांचा मागोवा घेणे गरजेचे असते. वर्तमानपत्रातील बातम्या पाहताना थोडक्‍यात मुद्देसूद, परंतु जलद गतीने वाचनाची सवय अंगी बाळगावी. एखाद्या दुःखद घटनेबद्दल ती घटना घडूच नये यासाठी काय उपाय योजावयास हवे होते, अशा प्रकारे पॉझिटिव्ह थिंकिंगने त्या घटनेकडे पाहणे आणि मुलाखतीत तशा प्रकारे उत्तरे देणे गरजेचे असते. 

चिंतन - 
चिंतन हा खरे तर वास्तविक अत्यंत महत्त्वाचा भाग असून आजूबाजूला आणि आपल्याबाबतही काही घटना घडत असतात. त्यात नेहमीच चिंतनाने अनेक प्रश्‍नांच्या उत्तरांचा मागोवा आपण घेऊ शकतो. त्यासाठी रात्री झोपताना आपण आज दिवसभरात कोणती उत्तम कामगिरी केली आणि कोणत्या बाबतीत आपल्या चुका झाल्या, याबाबत थोडा वेळ दिल्यास बऱ्याच बाबतीत आपली वेगाने प्रगती होते. काही विषय आपल्याबद्दल असतील, काही विषय समाजाबद्दल असतील अथवा काही विषय इतरांच्या बद्दल असतील, या सर्व विषयांमध्ये अत्यंत थोड्या वेळात आपण त्यांचा परामर्श घेण्याची सवय अंगी बाळगलीच पाहिजे. त्यातूनच आपल्या स्वतःचा आणि इतरांचाही विकास साधणे सहज शक्‍य होत असते.