Wednesday, July 18, 2012

सुधारित तंत्रज्ञानातून टोमॅटोचे एकरी 30 ते 35 क्विंटल उत्पादन

पुणे जिल्ह्यात धालेवाडी (ता. पुरंदर) गाव टोमॅटोच्या सुधारित शेतीसाठी ओळखले जाऊ लागले आहे. येथे विहीर बागायत क्षेत्र असले तरी नाझरे येथील तलाव जवळ असल्याने सिंचनासाठी पाण्याची तशी कमतरता नाही. गेल्या अनेक वर्षांपासून पारंपरिक पद्धतीने पाटाच्या पाण्यावर या भागात टोमॅटोचे उत्पादन घेतले जात होते. मात्र, या पिकात सुधारित तंत्रज्ञान आणून उत्पादन व फळांची गुणवत्ता वाढावी यादृष्टीने बारामती येथील कृषी विज्ञान केंद्राने (केव्हीके) पुढाकार घेतला. त्या दृष्टीने राष्ट्रीय कृषी नवनिर्मिती प्रकल्पांतर्गत (एनएआयपी) "टोमॅटो प्रोसेसिंग प्रायोरिटायझेशन फॉर ग्लोबल कॉम्पिटन्स' हा प्रकल्प 2008 पासून तीन वर्षे बारामती, इंदापूर, फलटण आणि पुरंदर तालुक्‍यातील 25 गावांमध्ये राबवण्यात आला. त्यात एकात्मिक पीक व्यवस्थापनाबरोबर पॉलिथिन मल्चिंगवर टोमॅटो लागवडीचे प्रात्यक्षिक धालेवाडीतील आठ शेतकऱ्यांच्या शेतावर राबवले. पाणी मुबलक असल्याने मल्चिंग आणि ठिबक सिंचनाची गरज नाही असे म्हणणाऱ्या शेतकऱ्यांना या प्रकल्पासाठी तयार करण्यात प्रकल्पाचे समन्वयक आणि केव्हीकेचे विषय विशेषज्ञ बाळासाहेब मोटे यांची कसोटी लागली. त्यांनी गावातील तरुण शेतकऱ्यांवर लक्ष केंद्रित केले. 

असा राबवला प्रकल्प प्रकल्पात रामदास बाबूराव काळाणे, अशोक विठ्‌ठल कदम, विष्णू धानु कदम, भाऊ बापूराव कदम, अजित मुरलीधर काळाणे, परशुराम रघुनाथ कदम, शशिकांत माणिक काळाणे, पोपट काशिनाथ काळाणे यांची निवड झाली. सुमारे एक एकर क्षेत्रावर लाल, काळा, चंदेरी (सिल्व्हर), निळा अशा चार रंगाचे पॉलिमल्चिंग पेपर प्रयोगासाठी वापरण्याचे ठरवले. 

तंत्रज्ञानाचा प्रसार 
जून-जुलैमध्ये लागवडीचे नियोजन करून निवडलेल्या शेतकऱ्यांना अर्ध्या एकरासाठी चार फूट रुंदीचे व 30 मायक्रॉन जाडीचे, वरील पृष्ठभाग चंदेरी व आतील पृष्ठभाग काळा अशा रंगाचे पॉलिमल्चिंग पेपर देण्यात आले. सर्वसाधारणपणे एक एकर क्षेत्रावर पॉलिथिन मल्चिंग करण्यासाठी सुमारे 13,300 रुपये खर्च येतो; मात्र आठ शेतकऱ्यांकडे मल्चिंगचा खर्च प्रकल्पांतर्गत करण्यात आला. पॉलिथिन आच्छादनाच्या वापरास लागवडीसाठी उंच गादीवाफा पद्धतीचा वापर केला. 

यातील काही ठळक नोंदी - 
  • प्रयोगात तुलनेसाठी (कंट्रोल प्लॉट) विना मल्चिंगचे पारंपरिक तत्त्वावरील गादीवाफ्यावरील अर्धा एकर क्षेत्र ठेवण्यात आले. 
  • जमिनीच्या योग्य मशागतीनंतर शिफारशीत खतमात्रेचा वापर करून लागवडीसाठी दोन ओळींतील अंतर 150 सें.मी. आणि दोन रोपांमधील अंतर 37.5 सें.मी. ठेवण्यात आले.
  • केव्हीकेच्या तज्ज्ञांनी जमीन व्यवस्थापनापासून ते काढणीपर्यंत वेळोवेळी मार्गदर्शन केले. मातीचे परीक्षण करून खतांचे नियोजन करण्यात आले. ठिबक सिंचन व विद्राव्य खतांचा वापर केला गेला. 

सीडलिंग ट्रेमधील रोपे तयार करण्यावर भर 
  • सीडलिंग ट्रेमधील रोपांची वाढ एकसमान होऊन मुळ्यांची वाढ जास्त मिळते, त्यामुळे सीडलिंग ट्रे आणि निर्जंतुक केलेले कोकोपिट वापरून टोमॅटोची रोपे तयार करण्यावर भर देण्यात आला. या पद्धतीने लावणीयोग्य रोपे 18 ते 21 दिवसांत मिळतात. तुलनेत गादीवाफ्यावर 26 ते 30 दिवस लागतात. सीडलिंग ट्रेमधील रोपांमध्ये 97 टक्‍क्‍यांपर्यंत उगवण मिळते. त्या तुलनेत पारंपरिक गादीवाफ्यावरील रोपांची उगवणक्षमता 60 टक्के मिळते. सीडलिंग ट्रेमधील रोपांची वाढ जलद होते, त्यामुळे सरासरी तीन तोडे गादीवाफ्यावरील रोपांपेक्षा जास्त मिळतात. याचा फायदा उत्पादन वाढीसाठी होतो. 
  • या परिसरातील शेतकरी स्वतः रोपे तयार करण्याऐवजी रोपवाटिकेत सीडलिंग ट्रेतील रोपांची नोंदणी करतात. टोमॅटोच्या जातीनुसार प्रति रोप 90 पैसे ते एक रुपया 20 पैसे दर राहतो. एकरी सुमारे दहा हजार रोपे लागतात. या वर्षी अनेक शेतकऱ्यांनी मशागत करून खताचा बेसल डोस देऊन गादी वाफे व मल्चिंग तयार करून ठेवले आहे. रोपवाटिकेत रोपे तयार असूनही पावसाअभावी लागवड झालेली नाही. 

पारंपरिक टोमॅटो लागवड उत्पादनातील अडचणी - 


  • बहुसंख्य शेतकरी माती परीक्षण करीत नाहीत, त्यामुळे खतांचा बेसुमार वापर केला जातो. त्यात खर्च वाढतो. 
  • पाटपाण्याचा वापर केल्याने योग्य वाफसा मिळत नाही. अधिक पाणी किंवा कोरडी अवस्था यामुळे पिकांच्या वाढीवर परिणाम होतो. 
  • तणांचा प्रादुर्भाव वाढतो. दिलेली खते तणे घेत असल्याने ती पिकांना उपलब्ध होण्यात अडचण येते. 
  • खुरपणी, तणनाशकांवरील खर्च वाढतो. 
  • सततच्या पावसात सरी - वरंब्यावरील लागवडीमध्ये निचरा योग्य प्रकारे होत नाही. शेतात पाणी साठून राहिल्यास रोगांचा प्रादुर्भाव वाढतो. 
  • फोकून खते दिली जातात. पाटपाण्यामुळे खते वाहण्याचे, उडून जाण्याचे प्रमाण अधिक असते. अनेक शेतकरी ठिबक सिंचनाचा वापर करत नाहीत. 

पॉलिमल्चिंगचे फायदे - 

  • शेतकऱ्यांच्या मते अपारदर्शक म्हणजेच सिल्व्हर किंवा काळ्या रंगाच्या पेपर आच्छादनाचा फायदा अधिक होतो. या रंगाच्या पेपरमध्ये तणांचे प्रभावी नियंत्रण होते. 
  • ठिबक सिंचनाबरोबर विद्राव्य खतांचा वापर झाला, त्यामुळे गरजेनुसार योग्य वेळी पिकाला खते उपलब्ध होतात. 
  • मल्चिंगमुळे अति थंडी किंवा उष्ण तापमान यापासून पिकाचे संरक्षण होते. मातीचे योग्य तापमान राखल्यामुळे लाभदायक जिवाणूंची चांगली वाढ होते, त्यामुळे अति थंडीतही अन्नद्रव्यांचे शोषण चांगले होते. 
  • उंच गादीवाफ्यावरील लागवडीमुळे अतिपावसात पाण्याचा निचरा होण्यास मदत होते. पाणी साठून वाढणाऱ्या रोगांपासून पिकाचे संरक्षण होते. 
  • आच्छादनामुळे फळांचा मातीशी संपर्क होत नाही. चांगल्या दर्जाची व प्रतीची फळे मिळून बाजारात दर चांगला मिळतो. 

लागवडीचा एकरी खर्च - (रु.) 
  • मशागत व बेड तयार करणे - 4000 
  • शेणखत - 7000, पोल्ट्रीखत - 4000, बेसल डोस - 12000, एकूण - 23,000
  • बांधणी - 10,000 
  • मल्चिंग पेपर व मजुरी - ( 13.5 किलोचे 35 मायक्रॉनचे चार बंडल ) - 13,300 
  • रोपे - (10,000 संख्या, रोप प्रति 90 पैसे प्रमाणे ) - 9000 
  • विद्राव्य खते - 10,000 
  • फवारणी - 8000 
  • तोडणी मजुरी - 15,000 
  • एकूण खर्च - 92,300 रुपये 

एकरी सरासरी उत्पादन - धालेवाडीच्या शेतकऱ्यांना पारंपरिक पद्धतीत एकरी 25 ते 30 टन उत्पादन मिळत होते. आता सुधारित तंत्राच्या वापरातून ते सरासरी 30 ते 35 टनांपर्यंत पोचले आहे. मल्चिंग पेपर व ट्रे पद्धतीसाठी उत्पादन खर्चात तीन हजारांपर्यंत वाढ होत असली उत्पादनवाढीचा फायदा होऊन उत्पन्नही वाढते. ए ग्रेडच्या टोमॅटोचे उत्पादन अधिक प्रमाणात असल्याने दर चांगला मिळतो. या भागातील माल मुंबई येथील वाशी मार्केटमध्ये पाठविण्यात येतो. मागील वर्षी अन्य टोमॅटोला दोन ते 2.5 रुपये या दरम्यान दर मिळाला होता. मात्र, मल्चिंगवरील टोमॅटोला सरासरी तीन रुपये दर मिळाला. 
  • 2011 मध्ये तीन रुपये प्रति किलो सरासरी दर व त्यातून 1,50,000 रु. मिळाले. खर्च वजा जाता 57,700 रुपये मिळाले. 
  • 2010 मध्ये नऊ रुपये प्रति किलो सरासरी दर मिळाला. त्यातून 4,50,000 रुपये मिळाले. खर्च वजा जाता 3,57,700 रुपये मिळाले. 

प्रयोगाच्या दुसऱ्या वर्षी प्रकल्पांतर्गत आर्थिक साह्य नसताना धालेवाडीतील आणखी 17 शेतकऱ्यांनी पॉलिमल्चिंगवर टोमॅटो घेतला. आता गावात सात शेतकरी ठिबकवर टोमॅटो घेत आहेत. 

अनुभवाचे बोल धालेवाडीच्या शेतकऱ्यांचे 
ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करणारे शेतकरी - 
संदीप विठ्‌ठल काळाणे - 50 गुंठे, संजय मल्हारी काळाणे - 15 गुंठे, जगन्नाथ मल्हारी काळाणे - 30 गुंठे, शशिकांत माणिक काळाणे - 20 गुंठे, सीताराम विष्णू गायकवाड - 40 गुंठे, बजरंग काळाणे - 20 गुंठे, विश्‍वास महादेव कुदळे - 24 गुंठे, रोहिदास कुदळे - 24 गुंठे 

रामदास दिनकर काळाणे - 50 गुंठे, 
  • आधी 12 वर्षे पारंपरिक पद्धतीने टोमॅटो करत होतो. गेल्या सहा वर्षांपासून ड्रीपवर टोमॅटो करत आहे. त्यामध्ये पाण्याची बचत आणि खुरपणीच्या खर्चात बचत होते. मात्र, या वेळी अन्य लोकांचे पाहून प्रथमच मल्चिंगवर टोमॅटो लागवड केली आहे. संपर्क - 9657048889 

शिवाजी रघुनाथ कुदळे - 50 गुंठे, 
  • गेल्या अनेक वर्षांपासून टोमॅटो करत असलो तरी यंदा प्रथमच मल्चिंगवर टोमॅटोची लागवड केली आहे. अन्य लोकांच्या टोमॅटोचा दर्जा मला कायम खुणावत असल्याने चांगल्या दर्जाचे उत्पादन घेण्यासाठी मल्चिंगकडे वळलो. - संपर्क - 9850452157 

बाबूराव रामदास काळाणे - 18 गुंठे, 
  • गेल्या दोन वर्षांपासून मल्चिंगवर टोमॅटो करत आहे. आधी पारंपरिक पद्धतीने टोमॅटोची लागवड करत असे, त्या तुलनेत मालाचा आकार चांगला मिळतो. तसेच, अ दर्जाची फळे अधिक प्रमाणात मिळतात, त्यामुळे दरही थोडा अधिक मिळतो. संपर्क - 9657074889 

अशोक विठ्‌ठल कदम - 22 गुंठे 
  • हे आमचे मल्चिंगवर टोमॅटो करण्याचे दुसरे वर्ष आहे. पहिल्या वर्षी प्रकल्पामध्ये मोफत मल्चिंग पेपर मिळाला होता; मात्र त्यात फायदा दिसून आल्याने या वर्षीही मल्चिंगचा वापर केला आहे. 

अजित मुरलीधर काळाणे - 50 गुंठे 
  • गेल्या तीन वर्षांपासून टोमॅटोमध्ये मल्चिंगचा वापर करत आहे. त्याचबरोबर खरबूज, कलिंगड, काकडी या पिकांतही मल्चिंगचा वापर करत आहे. संपर्क - 9922612618 

भारत रामदास काळाणे - 40 गुंठे 
  • पहिल्या वर्षी पाणी मुबलक असतानाही मल्चिंग करताना आधी घरातल्यांसह सर्वांनी वेड्यात काढले होते. सगळा खर्च विनाकारणच असल्याचे त्यांचे मत होते; पण केव्हीकेतील मोटे साहेबांवर विश्‍वास होता. म्हणून त्यांच्या मार्गदर्शनाखाली धाडस केले. या वर्षी पुन्हा मल्चिंग केले आहे. आता अन्य लोकांना रोपे मिळवून देण्यापासून बाजारपेठेपर्यंत साऱ्या गोष्टींसाठी मदत करत असतो. संपर्क - 9271528933 

अन्य शेतकरी - रामदास बाबूराव काळाणे - 40 गुंठे, मारुती माणिक काळाणे - 20 गुंठे, भाऊ बापूराव कदम - 20 गुंठे, विनोद सुदाम कदम - 15 गुंठे, भानुदास सावळाराम कदम - 20 गुंठे, बबन मारुती कदम - 40 गुंठे, रामदास बाबूराव काळाणे, विष्णू धानु कदम, भाऊ बापूराव कदम, परशुराम रघुनाथ कदम, पोपट काशिनाथ काळाणे 

पीक व्यवस्थापनातील महत्त्वाचे मुद्दे -

  • गादी वाफे बनविताना सेंद्रिय खताचा अधिक प्रमाणात वापर करण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. साधारणपणे एकरी 2.5 ब्रास शेणखत व एक ब्रास पोल्ट्री खताचा वापर केला जातो. 
  • बेसल डोस म्हणून एनपीके - 12.12.16 - चार बॅग, सूक्ष्म अन्नद्रव्ये - 40 किलो, मॅग्नेशिअम सल्फेट - 50 किलो, म्युरेट ऑफ पोटॅश - 50 किलो, निंबोळी पेंड - पाच बॅग, व्यवस्थितपणे मातीत मिसळून त्याचे दोन फूट रुंदीचे गादीवाफे बनवले जातात. दोन गादीवाफ्यांतील अंतर सात फूट ठेवले जाते. 
  • सीडलिंग ट्रे मधील रोपे रोपवाटिकेत बनवून त्यांचा वापर केला जातो. 
  • लागवडीनंतर वाफसा स्थिती ठेवण्याएवढेच पाणी पिकाच्या गरजेनुसार दिले जाते. 
  • कीड - रोगांसाठी गरजेनुसार फवारणी केली जाते; मात्र आच्छादित पिकामध्ये (10 ते 15 फवारण्या) पारंपरिक पद्धतीपेक्षा (20 ते 25) कमी फवारण्या लागतात. नागअळीचे प्रमाण दहा टक्के आढळले होते. तुलनेत पारंपरिक पिकात 30 ते 38 टक्के पर्यंत नागअळी दिसून येते. 
  • आच्छादित पिकात तणनाशकांची फवारणी केली जाते. त्याचा खर्च सरासरी एकरी 850 रुपये येतो. त्यामुळे खुरपणी वाचतात. त्या तुलनेत पारंपरिक पिकामध्ये तीन ते चार खुरपण्या कराव्या लागतात. त्यासाठी पाच ते आठ हजारांपर्यंत खर्च येतो. 
  • या प्रकल्पामध्ये झालेल्या अभ्यासात आच्छादित पिकामध्ये पारंपरिक पद्धतीच्या तुलनेत 24 टक्केने वाढ झाल्याचे आढळले आहे; तसेच अ दर्जाच्या फळांमध्येही 21 टक्केने वाढ मिळाली आहे.