Wednesday, July 18, 2012

माळरानावरील डाळिंब शेतीतून उंचावली आर्थिक स्थिती

 
पारंपरिक शेतीतून फार समाधानकारक उत्पन्न हाती लागत नाही. नगदी आणि त्यातही फळपिकांचा पर्याय निवडला तर चार पैसे हाती जास्त पडतील ही मानसिकता बुलडाणा जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने ठेवली. त्याप्रमाणे नियोजन केले. डाळिंब हे पीक आर्थिकदृष्टीने योग्य वाटून त्याची लागवड केली. आज या पिकातून चांगला आत्मविश्‍वास येऊ लागला आहे. 

अलीकडील वर्षात तेलकट डाग किंवा मर रोग अशा कारणांमुळे महाराष्ट्रातील डाळिंब बागांचे क्षेत्र कमी होत चालले आहेत. बाजारात मालाची समाधानकारक आवक नसल्याने दर चांगले आहेत. काही शेतकरी या पिकातील आव्हाने पेलीत ही शेती यशस्वी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. शेतीत काम करण्याची तयारी आणि सातत्यपूर्ण कष्ट घेतले तर एक दिवस फळ नक्कीच पदरात पडते या गोष्टीवर त्यांचा विश्‍वास आहे. चिखली तालुक्‍यातील वाघापूर हे त्यांचे गाव. आज जिल्ह्यात नियोजनबद्धरीत्या डाळिंबाची शेती करणारे शेतकरी म्हणून त्यांची ओळख होऊ लागली आहे. विलास श्रीकृष्ण ठेंग आपले बंधू अंकुश यांच्यासह 20 एकर शेती कसतात. वाघापूर शिवारात त्यांची तशी माळरानावरचीच शेती आहे. 

या शेतीत ते 2005 पर्यंत पारंपरिक पिके घेत होते. त्यामध्ये सोयाबीन, तूर, ज्वारी, उडीद आदींचा समावेश आहे. अनेकदा नैसर्गिक आघात, कीड वा अन्य कारणांनी उत्पादन कमी व खर्च अधिक असे व्हायचे. यामुळे त्यांनी पुढे काही वर्ष या जमिनीचा नाद सोडून दिला. जमीन पडीक राहिली. सन 2005 मध्ये अंकुश अमडापूर येथे तलाठी म्हणून रुजू झाले. तेथे त्यांनी ठिकठिकाणी बहरलेल्या फळबागा पाहिल्या. परिसरातील प्रयोगशील शेतकऱ्यांशी चर्चा केली. आपणही अशी शेती का करू शकत नाही असा प्रश्‍न त्यांच्या मनाला पडला. फळबागांचे प्रयोग पाहून त्यांना प्रेरणा मिळाली. त्यातूनच वाघापूर येथील शेतात दोन एकरांवर द्राक्ष व तेवढ्याच क्षेत्रात डाळिंब लावले. ही लागवड अमडापूर येथील शेतकरी व चांधई येथील रतन कतोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केली. परंतु द्राक्षाने पाहिजे तितका चांगला अनुभव दिला नाही. द्राक्ष पिकात सतत नापिकी आल्याने नाइलाजाने बाग काढून टाकली. पुढे सर्व लक्ष डाळिंब बागेकडे केंद्रित केले. द्राक्ष पीक काढल्याने रिकाम्या झालेल्या जागेतही 2009 मध्ये नवीन डाळिंब लावले. येथून खऱ्या अर्थाने डाळिंबाचे नियोजन करण्यास त्यांनी सुरवात केली. ठेंग यांची एकूण पाच एकर क्षेत्रात भगवा वाणाच्या डाळिंबाची बाग आहे. त्यातील दोन एकर क्षेत्र उत्पादनक्षम असून उर्वरित तीन एकर बाग नवी आहे. रोपे परिसरातील जाणकार शेतकऱ्यांच्या शेतातून आणली आहेत. सुरवातीच्या काळात डाळिंबाचे समाधानकारक उत्पादन मिळाले नाही. 2010 मध्ये उत्पादन वाढवताना दोन एकर क्षेत्रात त्यांना केवळ चार टन उत्पादन मिळाले. सुमारे 50 हजार रुपयांचा खर्च वजा जाता दीड लाख रुपयांचे निव्वळ उत्पन्न मिळाले. खर्च व उत्पन्नाचा ताळमेळ यांचा अभ्यास करताना अद्याप चांगल्या उत्पादनवाढीची अपेक्षा होती. पीक व्यवस्थापनात आपले काय चुकते आहे याबाबत ठेंग यांनी आत्मपरीक्षण केले. पुन्हा नव्या उमेदीने या फळबागेकडे लक्ष दिले. राज्यात बारामती, सांगोला परिसरातील डाळिंब बागांना भेटी दिल्या. तेथील शेतकऱ्यांचे अनुभव ऐकले. त्यांनी केलेल्या सूचनांचे पालन केले. याच काळात खानजोडवाडी (ता. आटपाडी, जि. सांगली) येथील प्रगतिशील शेतकरी प्रकाश भानुदास सूर्यवंशी यांची भेट झाली. त्यांनीही सखोल मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली बागेची आंतरमशागत करून जानेवारी 2011 मध्ये पानगळ करून पुढील नियोजनाला सुरवात केली. गरजेनुसार बागेला कीडनाशकांच्या फवारण्या केल्या. खतांची मात्रा संतुलित प्रमाणात दिली. दोन एकर बागेतून सुमारे 20 टन उत्पादन मिळाले. हा माल जागेवरच 50 रुपये किलो दराने विकला. त्यापासून दोन एकरांत 12 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. या पिकातील आत्मविश्‍वास हळूहळू वाढू लागला. सुधारित तंत्राने ही शेती कशी करायची त्याची माहिती होऊ लागली. पुढील हस्त बहर घेण्यासाठी बागेची आंतरमशागत केली. सुमारे 15 सप्टेंबरला छाटणी केली. 

नियोजनात झाडाच्या अवतीभवतीचे पूर्ण बेड खोदून बाजूला केले. त्यानंतर प्रत्येक झाडास 50 किलो शेणखत, 20 किलो कोंबडी खत, एक किलो निंबोळी पेंड, एक किलो डीएपी आदींचा वापर केला. सिलिकाचाही वापर केला. त्याचबरोबर मुख्य अन्नद्रव्यांसोबत गंधक, झिंक, फेरस, बोरॉन, मॅग्नेशिअम, मॅंगेनीज यांचा वापरही गरजेनुसार केला. 13-0-45, 0-52-34, 12-61-0 आदी विद्राव्य खते पिकाला दिली. 

अंकुश म्हणाले, की पूर्वी डाळिंब पिकातील तांत्रिक माहिती फार नव्हती. प्रयोगशील शेतकऱ्यांकडून ती शिकून घेतली. सूक्ष्म अन्नद्रव्ये देण्याचे महत्त्व, त्यांच्या झाडांवर दिसणाऱ्या कमतरता माहीत नव्हत्या. 

प्रगतिशील शेतकऱ्यांकडून त्या शिकून घेतल्या. फुलकिडींचा प्रादुर्भावही कसा असतो, त्याचे नियंत्रण कसे करायचे याची माहिती घेतली. निंबोळी पावडरीचा वापरही वाढवला आहे. आटपाडी येथील सूर्यवंशी यांनी आमच्या भागातील एका शेतकऱ्याची बाग कसण्यासाठी घेतली आहे. आठवड्यातून एक दिवस त्यांचीही बागेला चक्कर व्हायची. आमच्या भागात तेलकट डाग किंवा मर आदींचा प्रादुर्भाव आढळला नाही. मात्र वर्षात अन्य किडी-रोगांच्या नियंत्रणासाठी सुमारे 12 फवारण्या घेतल्या. सटाणा (जि.नाशिक) भागातील शेतकऱ्यांचा डाळिंब शेतीतील अनुभव चांगला असल्याने त्यांच्याकडूनही काही गोष्टी आत्मसात केल्या. छाटणी तंत्रज्ञान त्यातून समजले. हस्त बहर घेण्यासाठी प्रति झाडास अंदाजे पाचशे रुपयांचा खर्च केला. यात खते, कीडनाशके, मजुरी आदींचा समावेश होता. बागेतून एकरी 15 टनांपर्यंत उत्पादन मिळाले. या मालाला किमान 40 रुपयांपासून कमाल 84 रुपयांपर्यंत दर मिळाला. एकूण क्षेत्रातून सुमारे 19 लाख रुपये उत्पन्न मिळाले. उत्पादन खर्च साडेपाच लाख रुपये आला. मालाची विक्री स्थानिक बाजारपेठ, अकोला, पुणे मार्केट आदी ठिकाणी केली. सांगोल्याच्या व्यापाऱ्यांकडूनही माल खरेदी करण्यात आला. स्थानिक बाजारपेठेतच सर्वाधिक म्हणजे 84 रुपये दर मिळाला होता. 

अंकुश म्हणाले, की आमच्या भागात मजुरीची समस्या आहे. मात्र त्यांना जास्त पैसे देऊन शेतीची कामे करवून घेतली जातात. तसेच आम्ही दोन्ही बंधू व आमचे सारे कुटुंबीय शेतीत राबत असल्याने मजुरांवरील अवलंबत्व कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. संपूर्ण बागेला ठिबक सिंचनाची सोय केली असून विहीर व बोअर हे पाण्याचे स्रोत आहेत. अन्य पारंपरिक पिकांमधून जेथे 25 ते 30 हजार रुपयांचे उत्पन्नही मिळत नाही तेथे त्या तुलनेत डाळिंब पिकातून काही लाखांचे उत्पन्न मिळू लागले आहे ही समाधानाची बाब आहे. या पिकात अधिक ज्ञान मिळवून सुधारित तंत्र वापरणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

संपर्क- अंकुश श्रीकृष्ण ठेंग- 9011044842 
रा. वाघापूर, ता. चिखली, जि. बुलडाणा