Friday, January 13, 2012

स्वयंचलित सापळे "आयमेटोज ट्रॅप' विकसित

पिकामध्ये किडींचा प्रादुर्भाव किती प्रमाणात झालेला आहे, हे पाहण्यासाठी विविध प्रकारच्या सापळ्यांचा वापर केला जातो. या सापळ्यांमध्ये अडकलेल्या किडींची ओळख पटवली जाते. पिकांच्या दृष्टीने हानिकारक पातळीपेक्षा अधिक संख्या असल्यास किडींच्या नियंत्रणासाठी निर्णय घ्यावा लागतो; मात्र सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी सापळ्यांची निगा, त्यात अडकलेल्या किडींची ओळख पटवण्यामध्ये अनेक अडचणी येतात. विशेषतः शेतीचे क्षेत्र मोठे असल्यास सापळ्यांचे निरीक्षण करण्यामध्येही अडचणी येतात. या अडचणींचा विचार करून ऑस्ट्रियन कंपनी मेटोजने स्वयंचलित सापळे विकसित केले आहेत. हे सापळे त्यात अडकलेल्या किडींची ओळख पटवून त्यांची संख्या व अन्य माहिती शेतकऱ्यांपर्यंत इंटरनेट अथवा मोबाईलवर सूचनेच्या स्वरूपात दिली जाते, त्यामुळे किडींच्या नियंत्रणाचे निर्णय योग्य वेळी घेणे शक्‍य होते. 

नुकतेच इटलीमध्ये भाजीपाला व औषधी वनस्पतीसाठी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये ऑस्ट्रियन कंपनीने पेसल इन्स्ट्रूमेंट्‌स या इटालियन कंपनीच्या साह्याने विकसित केलेल्या "आयमेटोज ट्रॅप' या स्वयंचलित सापळ्याचे प्रथम संशोधकांसमोर प्रदर्शन केले. या सापळ्यामध्ये स्वयंचलित तंत्रज्ञान वापरले असून, किडींच्या ओळखीसाठी योग्य ते सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरचा समावेश केला आहे. 

...अशी आहे स्वयंचलित सापळ्याची कार्यपद्धती 
डेल्टा सापळ्यामध्ये असलेल्या चिकट सापळ्याबरोबरच फ्लॅश असलेले, उच्च क्षमतेचे; पण लहान सहा कॅमेरे बसवलेले असतात. या चिकट सापळ्यात येऊन एखादा कीटक किंवा कीड चिकटली असता, त्याचे छायाचित्र घेऊन ते सर्व्हरकडे पाठवले जाते. सर्व्हरमध्ये उपलब्ध असलेल्या किडीच्या छायाचित्रांशी ते ताडून पाहिले जाते. त्याची ओळख पटवून त्याची सूचना व्यवस्थापकाला दिली जाते. ही सूचना इंटरनेटच्या साह्याने किंवा मोबाईल फोनवर दिली जाते, त्यासाठी जीपीआरएस तंत्रज्ञानाधारित सेवेचे सिमकार्ड सापळ्यामध्ये बसवलेले असते. त्यासोबतच त्या वेळी असलेल्या हवामानाच्या नोंदी घेतल्या जातात, त्याही इंटरनेटवर पुरवल्या जातात. शेतावर हे उपकरण चालण्यासाठी आवश्‍यक असलेली ऊर्जा सौर पॅनेलच्या साह्याने मिळवून ती बॅटरीमध्ये साठवली जाते. 

दररोज उपलब्ध होणाऱ्या छायाचित्रांमुळे किडींची संख्या, त्यांची टक्केवारी, त्यांनी व्यापलेले क्षेत्र आणि मागील माहितीपेक्षा त्यात झालेली वाढ यांची माहिती सातत्याने साठवली जाते. त्याचे अधिक विश्‍लेषण केले असता निर्णय घेण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो. सध्या यामध्ये पतंगाच्या Cydia pomonella आणि Eupoecilia ambiguella या जातींसाठी सूचना देण्याची व्यवस्था केली आहे. मात्र, अन्य किडींसाठी आवश्‍यक त्या प्रकारच्या गंधाची सोय केल्यास त्यांच्याकरिता देखील हा सापळा वापरता येऊ शकतो. 

सापळ्याचे फायदे 
- या निरीक्षणामधून दैनंदिन आढळणाऱ्या किडींच्या जैविक अवस्थेविषयी माहिती मिळते. 
- ही सर्व माहिती स्वयंचलित पद्धतीने गोळा केली जात असल्याने त्याचे माणसांच्या साह्याने निरीक्षण करण्याची आवश्‍यकता राहत नाही. 
- किडीची ओळख स्वयंचलित पद्धतीने पटवली जाते. 
- किडीच्या प्रमाणात नुकसान पातळीपेक्षा अधिक वाढ झाल्यास व आतील प्लेट बदलण्याची गरज असल्यास सूचना दिली जाते. 
- सोबत हवामानाची माहिती मिळत असल्याने किडीच्या प्रादुर्भावाच्या वेळी असलेल्या स्थितीची माहिती मिळते. 
-- या सर्व सूचना इंटरनेटवर किंवा मोबाईलवर दिल्या जातात. शेतापासून दूर असतानाही ही सर्व माहिती उपलब्ध होत राहते.

Ref.: http://www.agrowon.com/Agrowon/20120104/5567580700351807120.htm