Friday, January 13, 2012

मक्‍यातील प्रतिकारकतेला मदत करणारी जैवरसायने ओळखली

प्रत्येक पिकाची किडी-रोगांशी लढण्यासाठी स्वतंत्र अशी प्रतिकारशक्ती असते. किडी-रोगांचा प्रादुर्भाव झाल्यानंतर वनस्पतीच्या अंतर्गत जैवरासायनिक बदल घडून येतात. मक्‍यामधील किडी-रोगांची ओळख पटवणाऱ्या जैवरासायनिक प्रतिक्रियेची ओळख पटवण्यात गेनसव्हिले येथील अमेरिकी कृषी विभागाच्या संशोधकांना यश आले आहे. तसेच, मक्‍यावर झालेल्या बुरशीच्या हल्ल्याची माहिती प्रतिकारक संस्थांना पुरवणारे प्रथिन ZmPep1 सुद्धा ओळखण्यात आले आहे. वेळेवर मिळालेल्या माहितीमुळे या किडी-रोगांचा प्रतिकार करणे शक्‍य होते. 

अमेरिकेतील फ्लोरिडातील कृषी संशोधन संस्थेतील संशोधक फात्मा कॅपलान आणि वनस्पती शास्त्रज्ञ एरिक शेमेल्झ यांनी मक्‍यातील प्रतिकारशक्तीसंबंधी संशोधन केले आहे. या संशोधनामुळे कीड-रोगाच्या प्रतिकारकतेबरोबरच ताण सहनशीलतेच्या मक्‍यातील यंत्रणेच्या कार्यप्रणाली समजणे शक्‍य होणार आहे. शेमेल्झ यांनी सांगितले, की वनस्पतीमध्ये सेंद्रिय घटकांत आढळणारे झीलेक्‍सिन आणि कौरालेक्‍सिन हे रासायनिक घटक वेगळे करण्यात आले आहेत. यापूर्वी कापूस, टोमॅटो यासारख्या पिकांमध्ये टरपेन या घटकावर अधिक संशोधन झाले आहे. टरपेनचे वनस्पतीमधील प्रमाण वाढवण्यासाठी संशोधक प्रयत्न करत होते. मात्र, टरपेन हे रोगासंदर्भात प्रतिक्रिया देण्यापेक्षा पाने खाणाऱ्या किडींसाठी चांगली प्रतिक्रिया देऊ शकते. 

एआरएसच्या संशोधकांनी रसायन तज्ज्ञ जेम्स रोक्का यांच्यासह मक्‍यातील न्युक्‍लिअर चुंबकीय रेझोनन्स इमेजिंग तंत्रज्ञानाचा वापर करून ही दोन मूलद्रव्ये वेगळी केली आहेत. 

प्रयोगामध्ये फायटोलेक्‍सिनच्या कुळातील कौरालेक्‍सिनचे ऍन्थ्रक्‍नोज स्टॉक रॉट (Colletotrichum graminicola) या रोगाच्या वाढीला प्रतिकार करण्यामध्ये 90 टक्के मदत केल्याचे आढळले आहे, तसेच झोलेक्‍सिन या मूलद्रव्याने अफ्लाटॉक्‍सिनमुळे वाढणाऱ्या ऍस्परगिलस फ्लाउस या बुरशीची वाढ रोखण्यामध्ये 80 टक्के मदत केली आहे. मक्‍यामध्ये या दोन्ही रोगांमुळे मोठ्या प्रमाणात उत्पादनात घट येत असते. तसेच, प्रयोगशाळेतील प्रयोगामध्ये युरोपियन मका पोखरणाऱ्या अळीच्या खाण्यावरही कौरालेक्‍सिनच्या वाढीमुळे अटकाव करणे शक्‍य झाले आहे. 
हे संशोधन ऍग्रिकल्चरल रिसर्च मॅगझीनमध्ये जानेवारीच्या अंकात प्रकाशित करण्यात आले आहे. 


http://www.agrowon.com/Agrowon/20120111/5111187827865094317.htm