Friday, January 13, 2012

उसावरील लोकरी माव्याचे नियंत्रण कसे करावे?

- भरत तुकाराम पाटील, गुडे, ता. भडगाव, जि. जळगाव 
ढगाळ हवामान, किमान व कमाल तापमान 12 ते 35 अंश सेल्सिअस, 70 ते 95 टक्के सापेक्ष आर्द्रता व पावसाचे प्रमाण जास्त लोकरी मावा किडीस अनुकूल असते. जास्त काळ कोरडे हवामान किडीच्या वाढीसाठी प्रतिकूल ठरते. ही कीड उसाच्या पानांच्या खालील बाजूस मध्य शिरेलगत पांढऱ्या लोकरीसारखे मेणतंतूधारी पंखी व बिनपंखी मावा पिल्लांसह आढळतात. मुखांग सुईसारखे असतात. पंख असलेल्या माव्याची मादी काळसर तांबूस व पिल्ले फिकट हिरवट दिसतात, तर बिनपंखी माव्याची मादी पांढरट व पिल्ले फिकट पिवळी असतात. एक आठवड्यानंतर पांढऱ्या लोकरीसारखे मेणतंतू येऊन शरीर पांढरे दिसते. म्हणून त्यास “पांढरा लोकरी मावा’ असे म्हणतात. उसाचे पूर्ण पान पांढरे झाल्याचे दिसून येते. या किडीचा प्रादुर्भाव बांधाकडेने दिसून येतो, नंतर तो ऊस क्षेत्रात वाढत जातो. 

नियंत्रणाचे मशागतीय उपाय ः 
1) ऊस लावण पट्टा किंवा रुंद सरी पद्धतीने करावी. 2) मोठ्या बांधणीनंतर उसाची वाढ चांगली झाल्यावर भांगे पाडून किंवा ऊस सरीत रेलून घ्यावेत म्हणजे फवारणी अथवा धुरळणी व्यवस्थित करता येते. 3) प्रादुर्भाव कमी असल्यास प्रादुर्भित पाने काढून नष्ट करावीत. 4) तणनियंत्रण करून शेत व बांध स्वच्छ ठेवावेत. 5) मावाग्रस्त पानांची एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी वाहतूक करू नये. 6) कीडग्रस्त बेणेमळ्यातील बियाणे वापरू नये. तसे वापरावयाचे असल्यास मॅलॅथिऑनची (तीन मि.लि. प्रति लिटर पाणी) बेणेप्रक्रिया करावी. 7) मावाबाधित क्षेत्रातील उसाची वाळलेली पाने काढून एकत्रित गोळा करून नष्ट करावीत. 8) नत्रयुक्त खतांचा संतुलित वापर करावा. भरणीनंतर नत्रयुक्त खते वापरू नयेत व ऊस लोळू देऊ नये. 9) गरजेइतकेच पाणी लांब सरी पद्धतीने द्यावे. 10) मका, चवळी यांसारखी पिके उसाच्या भोवताली घ्यावीत. 

जैविक उपाय ः 
1) क्रायसोपर्ला कारनी या परभक्षक कीटकाची अंडी अथवा अळ्या प्रति एकरी 1000 या प्रमाणात सोडाव्यात. 2) डिफा ऍफिडिव्होरा आणि मायक्रोमस इगोरोट्‌स या परभक्षक मित्रकीटकांच्या अळ्या कोषावस्थेसह पानांचे पाच ते सहा सें.मी. तुकडे कीडग्रस्त पानांवर जोडावेत. 3) व्हर्टिसिलियम लेकानी बुरशी दोन ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. 
रासायनिक उपाय ः 1) लावणीपूर्वी बेणेप्रक्रिया करावी. 2) प्रादुर्भावानुसार मॅलॅथिऑन दोन मि.लि. + ऑक्‍सिडिमेटॉन मिथाईल दोन मि.लि. किंवा डायमेथोएट दोन मि.लि. + एक मि.लि. स्टिकर प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी किंवा दाणेदार फोरेट (दहा टक्के) सहा महिन्यांपेक्षा लहान पिकात एकरी सहा किलो आणि सहा ते नऊ महिन्यांपर्यंतच्या पिकात एकरी आठ किलो जमिनीत मुळांच्या सान्निध्यात वाफसा असताना द्यावे. दुसऱ्या दिवशी हलके पाणी द्यावे म्हणजे पिकाकडून कीटकनाशकाचे शोषण लवकर होते. फवारणीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला द्यावा. 

संपर्क ः 0231 - 2651445 
प्रा. डी. एम. वीर, प्रादेशिक ऊस आणि गूळ संशोधन केंद्र, कोल्हापूर
 

Ref.: http://www.agrowon.com/Agrowon/20111005/4680155234481353656.htm