Friday, January 13, 2012

तंत्र मधुमका लागवडीचे

मधुमक्‍यापासून आर्थिकदृष्ट्या चांगला नफा मिळावा, तसेच मागणीप्रमाणे सतत पुरवठा होण्यासाठी मधुमक्‍याच्या दोन पिकांमध्ये ठराविक अंतर ठेवून लागण करावी. स्वीटकॉर्नच्या शेतात सतत ओलावा असावा. विशेषतः कणसाला केसर येण्यापासून ते दाणे भरेपर्यंत पाण्याचा ताण पडू देऊ नये. काढणीनंतर प्रतवारी व पूर्वशीतकरणाचे योग्य प्रकारे नियोजन करावे. 

स्वीटकॉर्न म्हणजेच मधुमका, याचा उपयोग प्रामुख्याने हिरवी कणसे भाजून अथवा उकडून खाण्यासाठी आणि प्रक्रियायुक्त उत्पादनांसाठी केला जातो. साध्या मक्‍यामध्ये साखरेचे प्रमाण दोन ते तीन टक्के एवढे असते, तुलनेने स्वीटकॉर्नमध्ये साखरेचे प्रमाण पाच ते 11 टक्के असते. यातील साखरेचे हे प्रमाण एका विशिष्ट कालावधीसाठी राहते. हा कालावधी शेतामध्ये पीक असताना दोन दिवस असतो आणि जसजसे तापमान वाढत जाईल, तसे हे प्रमाण कमी होते. हळूहळू यातील साखरेचे रूपांतर स्टार्चमध्ये होते. स्वीटकॉर्नची कणसे पिवळी, पांढरी किंवा पिवळे व पांढरे दाणे एकत्र असलेली असतात. 

हवामान - 
मका हे उष्ण हंगामी पीक आहे. मक्‍याची चांगली उगवण आणि जोमदार वाढ होण्यासाठी उबदार हवामानाची गरज असते. म्हणून पेरणीच्या वेळी जमिनीचे तापमान 25 ते 27 अंश से. असणे अधिक चांगले. सर्वसाधारण प्रजातींच्या (स्टॅंडर्ड) स्वीटकॉर्नसाठी पेरणी वेळी जमिनीचे तापमान 10 अंश से.पेक्षा आणि सुपर स्वीटकॉर्नसाठी 16 अंश से.पेक्षा खाली नसावे. स्वीटकॉर्नच्या वाढीच्या कोणत्याही अवस्थेत धुक्‍याचा विपरीत परिणाम होतो. त्याचप्रमाणे जास्त काळ थंड हवामान किंवा सुरवातीलाच उष्ण हवामान असणे अपायकारक ठरते. अशा प्रकारच्या हवामानामुळे तुऱ्याच्या ठिकाणी कणसे, तसेच कणसांच्या ठिकाणी तुरे येऊ शकतात आणि नुकसान होते. स्वीटकॉर्नच्या शेतामध्ये सतत ओलावा असावा. विशेषतः कणसाला केसर येण्यापासून ते दाणे भरेपर्यंत पाण्याचा ताण पडू देऊ नये. कमी ओलाव्याचे लक्षण म्हणजे पाने गुंडाळली जातात. कणसे भरण्याच्या वेळेस पाणी कमी पडल्यास परागीभवन नीट होत नाही, त्यामुळे कणसांमध्ये दाणे कमी भरतात. अशा कणसांना बाजारात चांगला दर मिळत नाही. त्याचप्रमाणे ज्या वेळी तापमान कडक म्हणजे 35 अंश से.च्या वर असते आणि उष्ण वारे वाहतात, अशा वेळी स्वीटकॉर्नच्या कणसांच्या टोकाकडे दाणे भरत नाहीत, पर्यायाने बाजारभाव चांगला मिळत नाही. याशिवाय पावसाळ्यात किंवा दमट हवामानात परागकण तुऱ्यातच अडकून राहिल्यामुळे परागीभवन कमी होऊन दाणे भरण्याचे प्रमाण कमी राहते. मागणीप्रमाणे सतत पुरवठा होण्यासाठी मधुमक्‍याच्या दोन पिकांमध्ये ठराविक अंतर ठेवून लागण करावी. 

लागवड व्यवस्थापन - 
मधुमक्‍यासाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी, 5.5 ते 7.0 सामू असणारी जमीन निवडावी. मधुमक्‍याची उगवणक्षमता वर्षभरातच कमी होते म्हणून प्रत्येक वर्षी नवीन बियाणे वापरावे. स्वीटकॉर्नच्या लागवडीसाठी हैदराबाद येथील मका संशोधन प्रकल्पाने विकसित केलेल्या "माधुरी' आणि "प्रिया' या संमिश्र जाती निवडाव्यात. या व्यतिरिक्त बाजारामध्ये संकरित जाती उपलब्ध आहेत. बियाणे मोठे आणि जोमदार असावे, त्यामुळे एकाच वेळी पक्वता आणि कणसांमध्ये सारखेपणा येतो. रोगापासून संरक्षण होण्यासाठी पेरणीपूर्वी बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करावी. मका हे परपरागीभवन होणारे पीक आहे म्हणून त्याची पेरणी एका ठिकाणी करावी. मधुमक्‍याच्या आसपास 250 फुटांपर्यंत इतर जातींचा मका पेरू नये, नाहीतर त्यावरील परागकण मधुमक्‍यावर पडून त्याची गुणवत्ता बिघडते. लागवडीसाठी एकरी चार किलो बियाणे वापरावे. दोन ओळींत 60 आणि दोन रोपांत 25 सें.मी. अंतर ठेवून लागवड करावी. एका एकरामध्ये साधारणपणे 18 ते 22 हजार ताटे बसतील, याची काळजी घ्यावी. बी पेरताना दीड इंच खोलीवर पेरावे. प्रति एकरी 48 किलो नत्र, 24 किलो स्फुरद आणि 16 किलो पालाशची मात्रा द्यावी. 

काढणी करताना... 
- स्वीटकॉर्नचा गोडपणा आणि ताजेपणा काढणीनंतर झपाट्याने कमी होतो आणि जसजसे तापमान वाढेल, तशी ही प्रक्रिया जलद होते. कणसे काढून त्यांचा ढीग केल्यास त्याचे तापमान वाढते. अशा अवस्थेत कणसे जास्त वेळ ठेवल्यास उष्णतेमुळे कणसांतील साखरेचे रूपांतर स्टार्चमध्ये जलदरीत्या होते, त्यामुळे स्वीटकॉर्नची गुणवत्ता कमी होते. म्हणून काढणीनंतर ते ताबडतोब पॅकिंग शेडमध्ये हलवावे, पॅक करावे आणि थंड करावे. 
- स्वीटकॉर्नची कणसे एकाच वेळी हाताने किंवा यंत्राने काढावीत. प्रक्रिया उद्योगासाठी लागणारे स्वीटकॉर्न यांत्रिक पद्धतीनेच काढावे. ताज्या बाजारासाठी कणसांवरील आवरण आणि देठ काढणे महत्त्वाचे आहे. ताज्या मार्केटसाठी स्वीटकॉर्न वायरच्या क्रेटमध्ये किंवा कागदी खोक्‍यामध्ये पॅक करावे. 
- स्वीटकॉर्नची काढणी कणसांचे केसर वाळून तपकिरी रंगाचे झाल्यावर करावी. या वेळी कणसांतील दाणे मऊ, गोड, दुधाळ आणि टपोरे असतात. कणसांची काढणी जास्त लांबवू नये. काढणीचा कालावधी लांबल्यास जरी कणसाच्या पाल्यात (आवरणात) विशेष फरक दिसून आला नाही, तरी दाण्यांतील साखरेचे प्रमाण कमी होऊन स्टार्चचे प्रमाण वाढते आणि पर्यायाने गुणवत्ता कमी होऊन बाजारभाव कमी मिळतो. 

प्रतवारी -
स्वीटकॉर्न कणसे काढल्यानंतर त्यांची प्रतवारी (ग्रेडिंग) करून पॅकिंग करणे महत्त्वाचे असते. आंतरराष्ट्रीय मान्यतेप्रमाणे ताज्या मार्केटसाठी कणसांची लांबी कमीतकमी सहा इंच असावी आणि ती पूर्णपणे निरोगी आणि स्वच्छ असावीत. सर्व कणसे एकसारख्या लांबीची असावीत. पॅकिंग करताना प्रत्येक खोक्‍यामध्ये कणसांची संख्या सारखी असावी. 

उत्पन्न - 
योग्य व्यवस्थापन ठेवल्यास स्वीटकॉर्नची प्रति एकरी 12,500 कणसे मिळतात. जमिनीच्या मगदुराप्रमाणे एकरी ताटांची संख्या जास्त ठेवून कणसांची संख्या 24,000 प्रति एकरी मिळू शकते. कणसांना मिळणारा भाव पाहता एकरी कमीतकमी पंचवीस ते चाळीस हजार रुपयांचे आर्थिक उत्पन्न मिळू शकते आणि तेही 75 ते 85 दिवसांत. याशिवाय कणसे काढल्यानंतर जनावरांना हिरवा चारा मिळतो. 

पूर्वशीतकरण (प्रिकूलिंग) पद्धती ः 
स्वीटकॉर्नमधील साखरेचे प्रमाण टिकून राहण्यासाठी, तसेच त्याचा स्वाद आणि मऊपणा टिकून राहण्यासाठी जी कणसे बाहेर पाठवावयाची असतात, त्यांचे पूर्वशीतकरण म्हणजेच प्रिकूलिंग करावे. यासाठी अनेक पद्धतींचा वापर केला जातो.
1) पहिली पद्धत म्हणजे पाण्याचा वापर. या पद्धतीमध्ये कणसांचे शीतकरण थंड पाण्यामध्ये बुडवून किंवा थंड पाण्याचे फवारे मारून केले जाते. पाण्याचे तापमान सर्वसाधारण एक अंश सेल्सिअस असावे. अशा पाण्यामध्ये सुमारे 45 मिनिटे कणसे बुडवून ठेवावीत, यामुळे कणसांचे तापमान चार अंश से. या आवश्‍यक पातळीपर्यंत खाली आणता येते. 

2) दुसरी शीतकरणाची पद्धत म्हणजे बर्फाचा वापर. ही सर्वांत चांगली पद्धत आहे. स्थानिक बाजारासाठीसुद्धा ही पद्धत उपयुक्त आहे. जसे मासे बर्फामध्ये ठेवले जातात, त्याप्रमाणे खोल्यांमध्ये कणसांच्या भोवती बर्फ टाकावा. सर्वसाधारणपणे कणसे आणि बर्फाचे प्रमाण 5ः1 असे ठेवावे. 
प्रिकूलिंग केलेली कणसे शीतगृहामध्ये साठवून ठेवता येतात. शीतगृहाचे तापमान शून्य अंश से. आणि आर्द्रता 95 टक्के एवढी असावी. तथापि स्वीटकॉर्नची कणसे अधिक काळ शीतगृहामध्ये ठेवल्यास त्यांची गुणवत्ता कमी होते. म्हणून बाजाराच्या मागणीप्रमाणे विक्रीची व्यवस्था करणे महत्त्वाचे आहे. स्वीटकॉर्नच्या गुणवत्तेच्या दृष्टीने एकच गोष्ट लक्षात घ्यायला हवी, की स्वीटकॉर्नच्या काढणीनंतर ते ग्राहकांपर्यंत पोचेपर्यंत ते सतत थंड ठेवायला हवे. 

संपर्क ः डॉ. बेडीस, 9850778290 
(लेखक वनस्पतिशास्त्र विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे कार्यरत आहेत.) 


Ref.: http://www.agrowon.com/Agrowon/20120103/5621011031800854131.htm