Sunday, September 2, 2012

व्यवस्थापन नवीन कलमांचे...


नवीन फळबाग लागवडीसाठी पाण्याचे व्यवस्थापन करणे महत्त्वाचे आहे. जमिनीतील उपलब्ध पाणी आणि तीव्र उन्हापासून रोपांची काळजी घेण्यासाठी पाणी देण्याच्या योग्य पद्धतीचा वापर, नवीन फळझाडांना सावली, आच्छादनाचा वापर, बाष्परोधकांचा वापर करावा. 

नवीन फळझाडांना सावली - 
नवीन लागवड झाल्यानंतर कलमे - रोपांना वाऱ्यापासून संरक्षणासाठी काठीचा आधार द्यावा, त्यावर झाडाचे खोड सैलसर बांधावे. कलम चांगले वाढू लागल्यावर कलमावरची बांधलेली प्लॅस्टिकची पट्टी सोडून घ्यावी. पुढील वाढीच्या काळात सोसाट्याच्या वाऱ्यापासून फळांचे व झाडाचे नुकसान टाळण्यासाठी बागेभोवती वाराप्रतिबंधक झाडे लावावीत. रोपांच्या कोवळ्या शेंड्यांचे प्रखर उन्हापासून संरक्षण करण्यासाठी कलमाच्या चारही बाजूंनी बांबू रोवून त्यावर मांडव करावा. सावलीसाठी तुराट्याचा, पाचटाचा, भाताचे तणीस किंवा वाळलेल्या गवताचा वापर करावा. दक्षिण व पश्‍चिम बाजूंनी उन्हापासून संरक्षण करण्यासाठी तुराट्याचा कूड करावा. 

आच्छादनाचा वापर - 
उन्हाळ्यात बाष्पीभवनाचा वेग जास्त असतो, त्यामुळे बरेच पाणी वाया जाते. ते रोखण्यासाठी फळझाडांच्या बुंध्यांभोवती आळ्यामध्ये पाचट, तणीस, गव्हांडा, वाळलेले गवत, भुसकट किंवा पॉलिथिन शीट यांसारखे आच्छादन पसरून टाकावे, त्यामुळे बाष्पीभवन कमी होते.
 
पाणी देण्यासाठी योग्य पद्धतीचा वापर - 
रोपांच्या किंवा झाडांच्या मुळांपाशी पिकांच्या गरजेनुसार ठिबक सिंचनाने पाणी द्यावे. या पद्धतीमुळे रोपांच्या मुळ्यांच्या परिसरातील भाग नेहमी ओलसर राहतो. पाण्याद्वारे खते देता येतात. कमी क्षेत्रातील जास्त अंतरावरील फळझाडांच्या लागवडीत मटका सिंचन पद्धत आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरते. याकरिता झाडांच्या वाढीनुसार साधारण पाच ते सात लिटर पाणी बसेल एवढी लहान लहान मडकी पहिल्या दोन ते तीन वर्षांकरिता वापरावीत. या पुढील जास्त वयाच्या झाडांकरिता 10 ते 15 लिटरची मडकी निवडावीत. ती शक्‍यतो जादा छिद्रांकित किंवा आडीत कमी भाजलेली असावीत. म्हणजे ती आपोआप झिरपत राहतात. पक्‍क्‍या भाजलेल्या मडक्‍याच्या खालील बुडाकडील बाजूस लहानसे छिद्र पाडावे व त्यामध्ये कापडाची चिंधी किंवा नारळाची शेंडी (केसर) बसवावी, जेणेकरून पाणी लवकर गळून जाणार नाही. प्रत्येक झाडास दोन मडकी बसवावीत. ती बसविताना प्रथमतः मडक्‍याच्या आकाराचा खड्डा खोदून तेथे मडके गळ्याबरोबर जमिनीत पुरावे आणि त्यामध्ये संध्याकाळी पाणी भरून ठेवावे. हे पाणी मडक्‍यावाटे झिरपत राहते. ही पद्धत मोठ्या बागेत वापरता येत नाही. कारण मडके भरण्यासाठी मजुरांचा खर्च वाढत राहतो. ही पद्धत कमी क्षेत्रात फायदेशीर आहे. सीताफळ, आंबा, आवळा, पेरू यांसाठी चांगली आहे. मडके पाण्याने भरल्यानंतर त्यावर झाकणी, लाकडी फळी, जाड कागद किंवा खपट याचा वापर करून झाकण करावे, त्यामुळे मडक्‍यातील पाणी बाष्पीभवनाने वाया जाणार नाही.