आंत्रविषार :
हा प्रादुर्भावातून उद्भवणारा जिवाणूजन्य आजार आहे. मुसळधार पाऊस पडून गेल्यावर ऊबदार वातावरणात हे जिवाणू मातीमध्ये प्रचंड प्रमाणात वाढतात. प्रामुख्याने हा आजार चांगल्या पोषित, पौष्टिक चाऱ्यावर चरणाऱ्या, मांसाने भरीव असणाऱ्या मेंढ्यांना व शेळ्यांना बाधित करतो. कोकरांनी आजारास बळी पडण्याचे प्रमुख कारण म्हणजे जास्त प्रमाणात पिलेले दूध होय. प्रादुर्भाव झालेली नवजात कोकरे हवेमध्ये उडी घेऊन जमिनीवर कोसळतात, थरथर कापतात.
उपाय योजना -
मेंढ्यांना शिफारशीत लस द्यावी. तीन महिन्यांवरील वयोगटातील कोकरांनादेखील लस टोचून घ्यावी. कोकरांना लस दिल्यानंतर तीन आठवड्यांनी बूस्टर डोस द्यावा. लस टोचल्यानंतर रोगप्रतिकारक शक्ती तयार होण्याकरिता 21 दिवसांचा कालावधी लागतो. प्रादुर्भावादरम्यान दीर्घक्रियाशील प्रतिजैविके योग्य मात्रेत द्यावीत.
फाशी :
हवामानातील अचानक बदल, मुसळधार पाऊस व दुष्काळ परिस्थितीमुळे फाशीचा रोग पसरतो. यात खूप ताप येतो, जनावर थरथरते, तोल जातो, नाकातोंडातून काळपट रक्तस्राव होतो, श्वास घेण्यास त्रास होतो व शेळी-मेंढी ताबडतोब मरते.
उपाय योजना -
पशुतज्ज्ञांच्या सल्ल्याने प्रतिबंधक लसीकरण करावे. मेलेल्या शेळ्या-मेंढ्या वर-खाली चुनखडी (चुना) टाकून खोल खड्ड्यात पुराव्यात. त्यांची कातडी विकू नये. शवचिकित्सा करू नये.
जरबा :
हा आजार अतिसूक्ष्म विषाणूंपासून होतो. याचा प्रसार चावणाऱ्या चिलटांपासून म्हणजेच अप्रत्यक्षरीत्या होतो. जास्त पाऊस व ढगाळ वातावरणामध्ये चिलटांची उत्पत्ती डबक्यात पाणी साठल्यामुळे अधिक प्रमाणात होते.
लक्षणे -
तोंडातील आतील भाग लालसर पडतो, काही वेळा लाळ येते, शेळ्या-मेंढ्या कुचंबतात, डोळे लाल होतात, जनावर लंगडू लागते, छातीला व जबड्याखाली जखमा होतात. फुफ्फुसदाह होऊन मेंढ्या मरतात. यात मरतुकीचे प्रमाण पाच ते वीस टक्के आहे. या आजारातून बऱ्या झालेल्या मेंढ्यांना अशक्त, कमकुवत कोकरे निपजतात.
उपाय योजना -
पावसाळ्यात सायंकाळी वाडग्यात करंज, कडुनिंब, निरगुडीच्या पाल्याची धुरी करावी. असे केल्याने चिलटांचे प्रजनन कमी होऊन संख्या वाढत नाही. बाधित मेंढीस पशुवैद्यकाच्या सल्ल्यानुसार प्रतिजैविके योग्य मात्रेत द्यावीत. कोमट पाण्यात मीठ टाकून मेंढ्यांचे तोंड धुवावे.
बुळकांडी :
या आजारात शेळ्या-मेंढ्यांमध्ये ताप येणे, नाकातून पाणी येणे, चिकट व रक्तमिश्रित जुलाब होणे इत्यादी प्रमुख लक्षणे दिसून येतात.
उपाय योजना -
पशुतज्ज्ञांकडून नियमित पी.पी.आर. लस टोचून घेणे. वाडग्यात स्वच्छता पाळावी. आजारी मेंढ्यांना वेगळे ठेवावे.
पायलाग -
शेळ्या-मेंढ्या या पायलाग आजारास लवकर बळी पडतात. आर्द्र हवामान व ओलसर माती प्रसारास कारणीभूत ठरते. खुरे मऊ होणे, खुरांना सूज येणे, दुर्गंधी येणे, खुरांतून रक्त येणे, खुरांत खपल्या होणे, मेंढी लंगडणे, ताप येणे, वजन कमी होणे, खूर गळून पडणे, काळजी न घेतल्यास खुरांत अळ्या पडणे, भूक नाहीशी होणे, अशक्तपणा येणे ही या रोगाची लक्षणे आहेत.
उपाय योजना -
1) वाढलेली खुरे कापून योग्य निगा राखावी. 2) दररोज लेंडी लोटून वाडग्याची स्वच्छता राखावी. 3) 15 दिवसांतून एकदा वाडग्यात चुन्याचा सडा द्यावा. 4) मेंढ्यांना मूत्र व लेंड्या साठलेल्या जागी ठेवणे टाळावे. 5) लंगडणाऱ्या मेंढ्या कोरड्या जागेत इतर मेंढ्यांपासून वेगळ्या ठेवाव्यात. 6) मेंढ्यांना दररोज दहा टक्के झिंक सल्फेटच्या द्रावणातून चालत घेऊन जावे. 7) कायम लंगडणाऱ्या मेंढ्या विकून टाकाव्यात. 8) लंगडणाऱ्या मेंढ्या विक्रीनंतर, तीन आठवड्यांनंतर नवीन मेंढ्या कळपात समाविष्ट कराव्यात. 9) खुरे पोटॅशिअम परमॅंगनेटच्या पाण्याने स्वच्छ धुवावीत.
कोकरांचे व्यवस्थापन -
कोकरांना जन्माच्या पहिल्या पाच ते सहा तासांत दूध ओढण्यास मज्जाव केल्यास त्यांच्या शारीरिक वाढीवर प्रतिकूल परिणाम होतो. कोकरू उभे राहण्यास व आईचे दूध पिण्यास कोकरास 15 ते 30 मिनिटे लागतात. कोकराचा प्रतिकूल वातावरणात जन्म झाल्यास अतोनात हानी होते. पावसाळ्यात चिखलामुळे उठता येत नाही. रुक्ष, उन्हाळी हवामानात कोकरांच्या शरीरातील पाण्याचे बाष्पीभवन होते, निर्जलीकरणाने मृत्यू ओढवितात. थंडीमध्ये गारठून मृत्यू होतात. प्रथम तीन दिवसांत कोकरांना दूध पुरेशा मात्रेत न मिळाल्यास मृत्यू ओढवतात. प्रथम विणाऱ्या मेंढीत मातृत्वाचा अभाव आढळतो. व्यवस्थापन योग्य नसल्यास किंवा शारीरिक अस्वस्थता असल्यास प्रौढ मेंढ्यादेखील त्यांच्या कोकरांस सोडून देतात. विण्याची क्रिया अति जास्त लांबल्यास येणाऱ्या थकव्यामुळे मेंढ्या कोकरांकडे लक्ष पुरवीत नाहीत. गर्भारपणाच्या शेवटच्या टप्प्यात मेंढ्यांना एकसारखे हाताळल्यास उदा. -लोकर कातरताना, कोकरांचे शारीरिक आकारमान सरासरीपेक्षा कमी असल्यास, कॅल्शिअम क्षाराची आणि "अ' जीवनसत्त्वाची कमतरता असल्यास कोकरांच्या मरतुकीचे प्रमाण वाढलेले पाहावयास मिळते.
जन्मलेल्या कोकरांमध्ये लोह व तांबे आदी क्षारांची कमतरता असल्यास कोकरे माती खाऊ लागतात, जुलाब होतात, त्यांना नीट चालता येत नाही, ओव्यांतील दूध ओढता येत नाही, कोकरे भेंडाळतात व तोंडावर पडतात, वाढीवर प्रतिकूल परिणाम होतो; परिणामी भूक मंदावते, अशक्तपणा येतो व त्यामुळेदेखील मृत्यू ओढवू शकतो.
प्रतिबंधात्मक उपाय -
1) मेंढ्यांना गाभणकाळात शेवटचे सहा आठवडे आणि दुग्धोत्पादन काळातील प्रथम आठ आठवडे उत्तम प्रतीचा आहार पुरविणे आवश्यक असते. गाभण कालावधीतील शेवटच्या सहा आठवड्यांत 200 ते 450 ग्रॅम खुराक मिश्रण दररोज द्यावे. यामुळे कोकरे सशक्त, वजनदार निपजतात व माता मेंढीस दूधदेखील विपुल प्रमाणात फुटते.
2) कोकराचा विकासदर हा मेंढीचे दुधाचे प्रमाण व गुणवत्ता यावर अवलंबून असतो.
3) विण्यास आलेल्या मेंढ्यांचे दिवसातून दोन ते तीनदा लक्षपूर्वक निरीक्षण करून मेंढ्यांना कमीत कमी अस्वस्थ करावे.
4) परित्यागीत कोकरांना पालक माता उपलब्ध करून द्यावी.
5) गरज लागल्यास विणाऱ्या मेंढीस तत्काळ व कौशल्यपूर्ण मदत देणे अपरिहार्य असते, तसेच या वेळेस जंतुसंसर्ग होऊ नये याकरिता स्वच्छता बाळगावी.
6) मरण पावलेल्या कोकरास योग्य पद्धतीने मातीत पुरावे, जेणेकरून सांसर्गिक रोगास आळा घालणे सोपे होईल.
7) मेंढ्यांना स्वच्छ पिण्याचे पाणी व सावलीचा पुरवठा विपुल प्रमाणात उपलब्ध असावा.
8) आपल्याकडे आजतागायत लोकर कातरणी ही कात्रीच्या साह्याने केली जाते, त्यामुळे लोकर कातरणी करताना ओव्यांस इजा होणार नाही, याकडे लक्ष द्यावे. परभक्षींचा प्रतिबंध करावा.
9) उणीव सड असणाऱ्या मेंढ्या कळपातून काढून टाकल्यास मरणप्रमाण कमी करणे शक्य होते.
10) कोकरू जन्मल्यावर त्याची नाळ शरीरापासून पाच सें.मी. दुरून कापून काढावी, त्यास टिंक्चर आयोडीन लावावे.
11) कोकरू तीन ते चार महिन्यांचे झाल्यानंतर पशुवैद्याच्या सल्ल्यानुसार जंतनिर्मूलन करावे.
12) औषधोपचार आणि लसीकरणापूर्वी पशुवैद्याचा सल्ला घेणे आवश्यक आहे.