Sunday, September 2, 2012

मोसंबीची फळगळ ...

फळगळीची कारणे आणि उपाययोजना - आंबेबहरातील फूल व फळगळ ही फुले लागल्यापासून सर्वसाधारण तीन टप्प्यांत होते. 
1) मोसंबीस जितकी फुले लागतात, त्याच्या एक ते दोन टक्केच फळांची काढणी होते. फुलापासून बाजरी ते ज्वारीच्या आकाराची फळे असताना फळांची पहिली गळ होते, कारण हा काळ फेब्रुवारी- मार्चचा असतो. या काळात उन्हामुळे तापमान 37 ते 38 अंश सेल्सिअसच्या वर जाते. अशा उष्णतेने फळांतील ऑक्‍झिनचे प्रमाण एकदम कमी होते, त्यामुळे फळांच्या देठात ऑब्सिशन झोन तयार होतो, त्यामुळे मोठ्या प्रमाणात फळगळ होते. हा झोन तयार होण्यास कोरडी हवा, उन्हाच्या झळा कारणीभूत ठरतात. यामुळे पुढे फळांची गळ होते. 
2) अन्नद्रव्यांची कमतरता - जमिनीतून नत्राचा पुरवठा कमी झाल्यास किंवा सर्वसाधारणतः अन्नद्रव्यांची जमिनीतून कमतरता भासल्यास अशी गळ होते. अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे काढणीपूर्वीची फळगळसुद्धा होऊ शकते. 
3) रोगामुळे होणारी फळगळ - लिंबूवर्गीय झाडावरील फळगळ प्रामुख्याने बोट्रिडीप्लोडिया थिओब्रोमी, कोलेट्रो ट्रिकम ग्लोईओस्पोरिऑइड्‌स व काही अंशी अल्टरनेरिया सिट्री या बुरशींमुळे होते. या बुरशी फळाच्या देठाद्वारे फळामध्ये प्रवेश करून पूर्ण वाढलेल्या फळाचे नुकसान करतात. या बुरशींचे जिवाणू झाडावरील जुन्या वाळलेल्या फांद्यांमुळे मोठ्या प्रमाणात पसरतात. तसेच काळीमाशी, मावा आदींच्या साखरयुक्त चिकट- गोड पदार्थावरील वाढलेल्या बुरशीमुळे पेशीक्षय लवकर होऊन फळगळ होते. फळ काढणी अगोदरची फळगळ ही मुख्यतः रोग, कीड तसेच जमिनीतील कमी- जास्त ओलाव्यामुळे आणि नत्राच्या अचानक भासलेल्या कमतरतेमुळे होते. 

उपाय योजना - 1) अशा परिस्थितीमध्ये फळगळ नियंत्रित करण्यासाठी अन्नद्रव्याचा योग्य पुरवठा ठेवावा. 
2) बागेत आर्द्रता तयार होण्यासाठी शक्‍य झाल्यास मोकळे पाणी द्यावे. बागेभोवती वाराप्रतिबंधक झाडांची लागवड करावी. 
3) झाडावर फळे बाजरी ते ज्वारीच्या आकाराची असताना एनएए, कार्बेन्डाझिम आणि युरियाच्या मिश्रणाची फवारणी करावी. हे मिश्रण तयार करण्यासाठी दीड ग्रॅम एनएए पावडर एक कपभर ऍसिटोनमध्ये चार ते पाच मिनिटे चांगली मिसळावी, त्यात पाणी टाकत द्रावण हलवत ठेवावे. हे द्रावण 100 लिटर या प्रमाणात तयार करावे. या 100 लिटर द्रावणात 100 ग्रॅम कार्बेन्डाझिम आणि दिड किलो युरिया मिसळावा. या द्रावणाच्या दोन फवारण्या 15 दिवसांच्या अंतराने कराव्यात. 
4) सध्याच्या फळगळ नियंत्रणासाठी पाऊस कमी असल्यास सिंचनाद्वारे योग्य तितके पाणी द्यावे. येत्या काळात पाऊस जास्त प्रमाणात झाल्यास बागेत पाणी साचणार नाही अशा प्रकारे निचरा करावा. पाऊस जास्त झाल्यास जमिनीतून थोडासा युरिया (100 ग्रॅम प्रति झाड) द्यावा, त्यामुळे झाडाला जोम येतो. त्यानंतर वरीलप्रमाणे एनएए, कार्बेन्डाझिम आणि युरियाच्या मिश्रणाच्या 15 दिवसांच्या अंतराने दोन फवारण्या कराव्यात. 

फळांतील रसाचे शोषण करणारा पतंग - 
आंबे बहराच्या फळांची वाढ झाल्यानंतर ऑगस्ट- सप्टेंबर महिन्यांत या पतंगांचा उपद्रव होतो. हे पतंग फळांतील रसाचे शोषण करतात, यामुळे फळे जमिनीवर गळून पडलेली दिसतात.
 
नियंत्रणाचे उपाय - 1) या किडींच्या नियंत्रणासाठी बागेत झाडाखाली पडलेली फळे गोळा करून नष्ट करावीत. रस शोषून घेणाऱ्या पतंगांसाठी विषारी आमिष करावे. त्याकरिता एक किलो गूळ + एक लिटर मोसंबी फळांचा रस + 200 मि.लि. मॅलॅथिऑन प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून मिश्रण तयार करावे. साधारणपणे 300 मि.लि. मिश्रण रुंद तोंडाच्या डब्यात ओतून हा डबा बागेतील झाडावर बांधावा. प्रति दहा झाडामध्ये एक डबा बांधावा.