Friday, December 2, 2011

अध्यात्म

सुखरूप चाली । हळूहळू उसंतिली ।।
बाळगोपाळांची वाट । सेव्यसेवकता नीट ।। धृ ।।
जरी झाला श्रम । तरी पडो नेदी भ्रम ।।
तुका म्हणे दासा । देव सारिसा सारिसा ।।

भक्तिमार्ग हा सुरवातीपासून शेवटपर्यंत सुखरूप असल्याची ग्वाही तुकोबांनी दिलेली आहेच, त्याचेच स्पष्टीकरण प्रस्तुत अभंगामधून दिसून येते. ""झडझडोनी वाहिला नीघ । इथे भक्तिचिया वाटे लाग ।'' असे ज्ञानेश्‍वरीही सांगतेच. त्याच वाटेचा व वाटचालीचा हा तपशील. भक्तीचा मार्ग हा सेव्यसेवकतेचा, सेवेचा मार्ग आहे. परमेश्‍वर हा सेव्य असून, जीव भक्त होऊन त्याची सेवा करणारा सेवक असल्याचे हा मार्ग मानतो. अशा सेवक सखे-सवंगडी गवळ्यांच्या घरातील ही मुले कृष्णाची अनन्य भक्त होती. ""कोण ती भक्ती केली गोपाळी । काय ती सोवळी वोवळी । त्याचे उच्छिष्ट कवळ मी गिळी । प्रेम सप्रेमेळी डुल्लत ।।'' असे या बाळगोपाळांच्या निर्व्याज भक्तीचे आश्‍चर्ययुक्त वर्णन एकनाथांनी केले आहे. योग, ज्ञान, कर्म यांच्या वाटा वाकड्या आहेत. त्यांच्यात विघ्नेही भरपूर येतात. मात्र, ही बाळगोपाळांची वाट सरळ आहे, तिच्यात अडथळा नाही. तुकोबा सांगतात, की आम्ही याच वाटेने चालले आहोत. आमचे चालणे सावकाश आणि सुखकारक आहे. सेवाभक्‍तीची ही वाट ज्यांना माहीत नाही ते अडचणीत सापडतात. ""तुका म्हणे सेव्य सेवकता ठावी । पडती तरी गोवी न पडती।।'' असे सखेद उद्‌गार तुकोबांनी अशा लोकांबद्दल काढले आहेत. विशेष म्हणजे ही वाट चालणारांची सोबत करून देव त्यांची पाठराखणही करीत असतो. तो आपल्या या दासांच्या सतत बरोबर असतो. स्वतः तुकोबांचाच हा अनुभव आहे. ""जेथे जातो तेथे तू माझा सांगाती । चालविली हाती धरूनिया ।। चालो वाटे आम्ही तुझाची आधार । चालविसी भार सर्व माझा''
भक्तीची ही वाट सरळ असल्यामुळे ती चुकायचा संभव नाहीच; पण समजा चुकलीच, तर ""चुकली ते वाट । पुढे सापडवी नीट ।।'' असे त्यांना सावरायला देव उभाच आहे. या वाटेने चालणारांना श्रम झाला, थकले तरी त्यांना विपरीत ज्ञानादी भ्रम मात्र होत नाही, कष्ट झाले तरी भोवळ येत नाही. तो त्यांना सतत जागे ठेवतो.
""तुका म्हणे दृष्टी । उघडितो नव्हे कष्टी ।।''
सेवाभक्तीच्या मार्गात अहंकाराचे पूर्ण विसर्जन, देवावर पूर्ण विश्‍वास आणि त्याच्यावर अवलंबिला त्याचा समावेश होतो.