पदवीधर होऊन गावी आलो. आमची तेरा एकर शेती एकाच ठिकाणी आहे. मी एकुलता आहे. वडील मी सात वर्षांचा असताना एकाएकी वारले. माझे वडीलही एकटेच होते. आमच्या भावकीत सर्वांत जादा शेती माझीच आहे. चुलतभावांना एकर - दोन एकरच वाट्याला येते. वडील वारल्यानंतर आईचा भाऊ आमची शेती कसायचा. माझ्या मामाचा आम्हाला मोठा आधार होता. तो जर मदतीला नसता, तर एकट्या आईला शेती कसणं कठीण होतं. आईने कधीच कोणता व्यवहार केला नाही. ती एक साधी बाई आहे. अशा बाईला कोणीही फसवू शकला असता; पण आमच्या भावकीतील सगळ्यांचा तिला आधार होता. याचं कारण माझ्या वडिलांनी भावकीतील सगळ्यांना आधार दिला होता. आपल्या शेतातून जे काही येईल, त्यातील काही भाग ते भावकीतील प्रत्येक कुटुंबाला स्वतः नेऊन देत. आमच्या भावकीची सात घरं आहेत. आमचे खापरपणजोबा या गावात मजुरीसाठी आले होते. त्यांनी मजुरी करून गावात राहण्यापुरतं दोन खणांचं घर बांधलं. त्यांना तीन मुलं होती. त्यांनीही आयुष्यभर मजुरी केली. सर्वांत जो लहान होता, त्याने अंगावर काही काम घ्यायला सुरवात केली. त्यातून त्यांनी शेतीही विकत घेतली. एक पिढी केवळ राबण्यात गेली. दुसऱ्या पिढीत एक हुशार निघाला. त्याने शेतीवाडी कमवली. माझे ते आजोबा होते. माझ्या वडिलांनी आपल्या वडिलांचा आदर्श ठेवला; पण त्यांचं एकाएकी निधन झाले. त्याचं निदान काही झालं नाही. शेतावरून आले होते. हातपाय धुऊन धोतराने पुसत होते, तोच खाली कोसळले. मी सात वर्षांचा होतो. त्या वेळी मी हजर होतो. वडील अशा पद्धतीने गेल्यावर सगळ्यांचा आधार मिळाला. मला जसं कळू लागलं, तसा एक अनुभव मला नेहमी येत होता. गावातील लोक माझ्या वडिलांविषयी फार आपुलकीने बोलत. गावात असा एकही माणूस नसेल, ज्याला माझ्या वडिलांनी मदत केली नाही. मदत करताना त्यांची भावना चांगली असायची. गोरगरिबांचा फार मोठा दुवा त्यांना मिळाला होता. काही लोक म्हणायचे, "चांगली माणसं अशी लवकर देव कशासाठी नेतो?' तर काही म्हणायचे, "जो सर्वांना आवडतो, तो देवाला आवडतो.' खरं तर यामागील लोकांची भावनाही महत्त्वाची आहे.
पदवीधर होऊन गावी परत आलो. गावातील इतरांपेक्षा आमची परिस्थिती चांगली आहे. आईने काटकसर करून दोन पैसेही साठवले आहेत. आता सगळी शेती बागायती आहे. मामाने शेती इतकी वर्षे कसली; पण त्यांनी काही अपेक्षा ठेवली नाही. उलट ते म्हणायचे, "आमचं हे कर्तव्यच आहे. आम्ही आमचं कर्तव्य केलं आहे.' त्यांनाही काही कमतरता नाही. त्यांची चारही मुलं शिकून मोठ्या पदावर काम करीत आहेत. त्यांचीही बारा एकर शेती बागायती आहे. माझी इच्छा कोणतीही नोकरी न करता आपल्या शेतीत पूर्ण लक्ष घालायचं. त्यामागे माझा हेतू हाही आहे, की गावातील काहींना आपण मदतही करू शकू. आपण आपल्या वडिलांइतकं जरी कार्य करू शकलो नाही, तरी आपल्या वडिलांच्या नावाला कमीपणा येईल असं तरी आपल्या हातून काही घडू नये. कोणत्याही प्रसंगी माझ्या डोळ्यांसमोर माझ्या वडिलांची प्रतिमा उभी राहते. ते मार्ग दाखवीत आहेत असं वाटतं. याचं कारण माझ्या मनात सतत तोच विचार सुरू असतो. जर आपल्या मनात चांगले विचार सुरू असतील, तर आपल्याला स्वप्नंही चांगलीच पडणार! जे मनी वसे, तेच स्वप्नी दिसे.
माझे मामाही आता थकले आहेत. त्यांचीही शेती बागायती आहे. त्यांनाही कोणाची तरी मदत हवी आहे. मामांनी आमची शेती सांभाळली. आता मलाही त्यांना मदत करण्याची इच्छा आहे, कारण त्यांची मुलं नोकरीच्या निमित्ताने बाहेर असतात. एक मला जाणवतं आहे, आपण जर इतरांच्या उपयोगी पडलो, तर आपलंही काम कधी अडत नाही. खरं तर मी इतरांना मदत करीन असं म्हणत असलो, तरी इतरांचीही मला सर्वप्रकारे मदत होते. मला असं आयुष्य लाभलं. मी जसं वागतो आहे, तसं वागल्याने कुणालाही असं आयुष्य लाभू शकेल, असाच माझा अनुभव आहे.
Ref. LinK : http://www.agrowon.com/Agrowon/20111201/4989459279140643064.htm