आवळा लागवडीसाठी हलकी ते मध्यम जमीन निवडावी. लागवडीसाठी कृष्णा, कांचन, चकय्या, नीलम या जातींची निवड करावी. लागवडीसाठी एप्रिल महिन्यात 7 x 7 मीटर अंतरावर 1 x 1 x 1 मीटर अंतराचे खड्डे करून 20 किलो शेणखत, दीड किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि शिफारशीत कीडनाशक भुकटी आणि मातीच्या मिश्रणाने भरून घ्यावेत. चांगला पाऊस झाल्यावर कलमांची लागवड करावी. लागवड करताना एकाच जातीची कलमे न लावता दोन ते तीन जातींची निवड करावी. त्यामुळे फळधारणा वाढण्यास मदत होते. चिकू लागवडीसाठी चांगल्या निचऱ्याची जमीन निवडावी. लागवडीसाठी खिरणीचा खुंट वापरून तयार केलेले कलम निवडावे. लागवडीसाठी 10 X 10 मीटर अंतरावर 1 X 1 X 1 मीटर अंतरावर खड्डे खणून त्यामध्ये माती, तीन घमेली शेणखत, दोन किलो सिंगल सुपर फॉस्फेट, 100 ग्रॅम कार्बारिल भुकटी यांच्या मिश्रणाने भरावेत. लागवडीसाठी कालीपत्ती, क्रिकेटबॉल जातींची निवड करवी.
http://www.agriplaza.in/agri-guide.htm
मत्स्यशेतीसाठी लागणारे मत्स्यबीज विविध जातींचे म्हणजेच कटला, रोहू, मृगल हे भारतीय प्रमुख कार्प असून, चंदेरा, गवत्या, सायप्रिनस या चिनी माशांचा वापर करतात. मत्स्यबीज संचयनाचे प्रमाण 5000 ते 10,000 नग प्रति हेक्टरी एवढे असावे. या मत्स्यबीजांचा आकार कमीत कमी दोन इंचापेक्षा लांब असला पाहिजे. मत्स्यबीज शक्यतोवर नजीकच्या केंद्रावरून आणावे म्हणजे त्यांची मरतुक होणार नाही. मत्स्यबीज घेताना ते चांगल्या प्रतीचे व योग्य प्रमाणात आहेत याची खात्री करून घ्यावी. यावरच मत्स्यशेतीचे उत्पादन अवलंबून असते. लांबच्या ठिकाणावरून मत्स्यबीज आणावयाचे असल्यास ते ऑक्सिजन पॅक केलेल्या डब्यामध्ये आणावेत; मत्स्यबीजांची वाहतूक आणि संचयन थंड वेळेस करणे केव्हाही चांगले असते. मत्स्यबीज तलावापर्यंत आणल्यानंतर त्या प्लॅस्टिक पिशव्या तलावांमधील पाण्यामध्ये 15 ते 20 मिनिटे तरंगत ठेवावे. त्यानंतर तलावातील थोडे पाणी पिशवीमध्ये घेऊन नंतर हळुवारपणे मत्स्यबीज तलावात सोडावे. अशा पद्धतीने मत्स्यशेतीची पूर्वतयारी केल्यास निश्चितच फायदेशीर ठरते. माशांचे प्रमुख खाद्य प्लवंग असून, प्लवंग वाढीकरिता तलावामध्ये सेंद्रिय आणि रासायनिक खतांचा वापर करतात. सेंद्रिय खतामध्ये प्रामुख्याने शेणखत, पोल्ट्रीखत व गांडूळखत यांचा वापर करतात. प्रति हेक्टरी शेणखताची मात्रा 10,000 किलो एवढी वापरावी. ही मात्रा सुरवातीला 2000 किलो प्रति हेक्टरी द्यावी. त्यानंतर उर्वरित टप्प्याटप्प्याने वर्षभरात दिली जाते. यासोबत सिंगल सुपर फॉस्फेटची मात्रा 300 किलो प्रति हेक्टरी एवढी द्यावी. ही सर्व खते तलावामध्ये टाकण्यापूर्वी चुन्याची मात्रा 250 किलो प्रति हेक्टरी एवढी द्यावी. त्यामुळे तलावाच्या गाळामधील जीवजंतूंचा नायनाट होतो आणि पाण्याचा सामू स्थिर राहण्यास मदत होते. तलावामध्ये पाणी कमीत कमी पाच ते सहा फूट एवढे असावे. एक आठवड्यानंतर पाण्याचा रंग फिकट हिरवा होण्यास होण्यास सुरवात होते. याचाच अर्थ तलावामध्ये प्लवंगनिर्मिती सुरू झाली आहे. म्हणजेच माशांना आवश्यक असलेले नैसर्गिक खाद्य (वनस्पती व प्राणी प्लवंग) उपलब्ध आहेत. आता आपल्याला तलावामध्ये मत्स्यबीज संचयन करता येते.
http://www.agriplaza.in/agri-guide.htm
बंदिस्त शेळीपालन करताना शेळ्यांची संख्या हळूहळू वाढवावी, त्याप्रमाणे विस्ताराच्या दृष्टीने गोठा बांधताना जागेची सोय ठेवावी. गोठा बांधणी ही शेतातील उपलब्ध साधन सामग्रीचा वापर करून करता येते. गोठा बांधताना शक्यतो गोठ्याची लांबी पूर्व-पश्चिम ठेवावी, जेणेकरून अति ऊन, पाऊस आणि वारा यांच्यापासून शेळ्यांचे संरक्षण होईल. गोठ्याच्या जमिनीवर शक्यतो माती, मुरूम, लाकडाचा भुस्सा, विटा यांच्या साह्याने चांगले दाबून धुम्मस तयार करावे. अशी जमीन हिवाळ्यात उबदार राहते व करडांचे व शेळ्यांचे थंडीपासून संरक्षण होण्यास मदत होते. शेतातील बाभळीच्या झाडांपासून खांब; तर तुराट्या, भाताचा पेंढा, गव्हाच्या पेंढ्या, तसेच बाजरीचे सरमाड यांचा वापर करून गोठ्याचे छत शाकारता येते. कुंपण तसेच गोठ्यातील कप्पे, भिंती तुराट्या, बांबूच्या पट्ट्यांचा वापर करून तयार करता येतात. गोठ्याचे छत हे नेहमीपेक्षा थोड्या जास्त उंचीवर शाकारावे, जेणेकरून हवा खेळती राहील, तसेच दुर्गंधी राहणार नाही. गोठ्याच्या छताला प्लॅस्टिक, पॉलिथिन अथवा खताच्या रिकाम्या पिशव्या शिवून केलेले आवरण / आच्छादन बसवल्यास पावसापासून जास्त संरक्षण मिळते. थंडीच्या दिवसांत गोणपाटाच्या साह्याने शेळ्यांसाठी, मुख्यत्वेकरून करडांसाठी ऊब राखता येते. एकेरी गोठ्यासाठी पूर्व व पश्चिमेकडून पत्र्यापर्यंत भिंतीचे बांधकाम व मोकळ्या पटांगणाच्या विरुद्ध बाजूकडून तीन ते चार फूट भिंत व त्यावर छतापर्यंत चेनलिंक जाळी बसवावी, तर मोकळ्या पटांगणाकडून जमिनीपासून चेनलिंक जाळी व त्याचेच दार बसवावे. दुहेरी गोठ्यासाठी (100 पेक्षा जास्त शेळ्यांसाठी) पूर्व-पश्चिम छतापर्यंत भिंती, त्यामध्ये लाकडाचे दार व दोन्ही बाजूंस आवार करून चेनलिंक जाळीचे कुंपण घालावे. छताला सिमेंटचे पत्रे लोखंडी अँगलचा वापर करून बसवावे. सिमेंटच्या अर्ध्या पाइपाच्या साह्याने एकेरी गोठ्यात पूर्व-पश्चिम लांबी असलेल्या भिंतीच्या बाजूने, तर दुहेरी गोठ्यात मधल्या जागेच्या दोन्ही बाजूंस जाळीच्या बाहेर जमिनीपासून साधारण एक ते दीड फूट उंचीवर गव्हाण बसवावी. या गव्हाणीची रुंदी एक फूट, साधारण तेवढीच खोली असावी. गव्हाणीच्या बाजूची जाळी ही लोखंडी पट्ट्यांच्या साह्याने मोठे कप्पे असलेली करावी, जेणेकरून शेळ्यांना त्या कप्प्यातून चारा खाणे शक्य होईल. पिण्याच्या पाण्यासाठी सिमेंटची एक टाकी गोठ्याबाहेर एका कोपऱ्यात ठेवावी.
http://www.agriplaza.in/agri-guide.htm
कोकणामध्ये उपलब्ध असलेल्या पाण्याचा ठिबक सिंचनाने कार्यक्षम वापर करून नारळ - मसाला मिश्र पिकांची लागवड करता येते. या बागेमध्ये नारळाच्या पिकाचा मुख्य पीक म्हणून अंतर्भाव असून, त्याची लागवड 7.5 x 7.5 मीटर अंतरावर करण्याची शिफारस केली आहे. या चार नारळांच्या मध्यबिंदूवर जायफळ, नारळ लागवडीच्या रेषेतील दोन नारळांच्या मध्य अंतरावर दालचिनी कलम आणि नारळाच्या बुंध्याजवळ प्रत्येकी दोन मिरी वेल लागवड करावी. नारळ, जायफळ यांच्या लागवडीसाठी 1 x 1 x 1 मीटर आकाराचे, तर दालचिनी आणि काळी मिरी लागवडीसाठी 0.60 x 0.60 x 0.60 मीटर व 0.30 x 0.30 x 0.30 मीटर आकाराचे खड्डे घेऊन त्यांच्या तळाशी वाळवी व हुमणी प्रतिबंधक कीटकनाशके वापरावीत. खड्ड्याच्या तळाशी कुजलेला पालापाचोळा अथवा गिरिपुष्पाचा पाला, दोन ते तीन घमेली चांगले कुजलेले शेणखत आणि शिफारशीनुसार सिंगल सुपर फॉस्फेट आणि चांगली माती यांच्या मिश्रणाने खड्डा भरून घ्यावा. खड्डा भरताना माती जमिनीच्या पृष्ठभागाच्या थोडी वर ठेवावी, जेणेकरून पाणी झाडाच्या बुंध्याशी साठणार नाही. खड्ड्याच्या चारही कोपऱ्यांवर किंवा मध्यभागी खुणेसाठी खुंट ठेवावे. नारळ व मसाल्याची पिके एकाच वेळी लावता येणार नाहीत. पहिल्या वर्षी विद्यापीठाने शिफारस केलेल्या प्रताप, टी x डी यांसारख्या नारळ जातींच्या जोमदार रोपांची निवड करून जून किंवा जुलैमध्ये लागवड करावी. त्याचबरोबर दालचिनीची लागवडही करावी. पहिली दोन वर्षे दालचिनीला सावली करावी. पाचव्या वर्षी जायफळ लागवड करावी. जायफळाला पहिली तीन वर्षे सावली करावी. त्याचप्रमाणे ऑक्टोबर व पहिल्या उन्हाळ्यात नारळाच्या झाडासही सावली करावी. बागेमध्ये सुरवातीच्या काळात केळी किंवा पपईची मिश्र पीक म्हणून लागवड केल्यास मसाला पिकांना सावली तर मिळतेच, शिवाय केळी, पपईच्या उत्पादनामधून बागेच्या व्यवस्थापनावर होणारा खर्चही काही प्रमाणात भागविता येतो. मिश्र पीक म्हणून सुरवातीच्या काळात अननसाचीही लागवड करणे शक्य आहे. सातव्या वर्षी नारळाच्या झाडाच्या बुंध्याजवळ मिरीच्या वेलांची लागवड करावी. तिसऱ्या वर्षाच्या सुरवातीला प्रथमतः दालचिनीच्या झाडांपासून उत्पन्न मिळण्यास सुरवात होईल. जायफळाचे झाड जरी तिसऱ्या वर्षी फुलोऱ्यावर येत असले, तरी उत्पादन हे अतिशय मर्यादित असते. सर्वसाधारणतः पाचव्या वर्षापासून नारळ (टी x डी) आणि दालचिनी यांचे उत्पन्न मिळू शकते. जायफळाची लागवड पाचव्या वर्षी असल्याने जायफळाचे उत्पन्न आठव्या वर्षापासून मिळू लागते, तसेच मिरीचे वेल सातव्या वर्षी लावल्यामुळे त्याच्या वेलीचा विस्तार झाल्यावर किफायतशीर उत्पादन मात्र लागवडीपासून तिसऱ्या वर्षी मिळते. बागेतील सर्व झाडे ही निरोगी आणि उत्पादनक्षम राहण्यासाठी योग्य खतांच्या मात्रा, पाणीपुरवठा, तसेच पीक संरक्षण या तीन मूलभूत बाबी आहेत. त्यापैकी झाडास लागणारी मूलद्रव्ये एकाच माध्यमातून न देता ती रासायनिक, तसेच सेंद्रिय खतांच्या माध्यमातून द्यावीत. लाखी बागेसाठी मूलभूत अन्नद्रव्ये योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात देणे आवश्यक आहे. कोकणातील जमिनीचा प्रकार व त्यांची अल्प जलधारणशक्ती पाहता बागेतील झाडांना आवश्यकतेनुसार दररोज सूक्ष्म अथवा ठिबक सिंचन पद्धतीने पाणी द्यावे.
http://www.agriplaza.in/agri-guide.htm