Wednesday, July 18, 2012

स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाची पूर्वतयारी

1) पुस्तकांची निवड - 
बाजारात पुस्तकांच्या दुकानात अनेक प्रकाशनांची आणि लेखकांची पुस्तके उपलब्ध आहेत. जेव्हा आपण निवडक पुस्तकांची खरेदी करण्याचे ठरवतो तेव्हा आपणास अनेक पुस्तकांपैकी ठराविक निवडक पुस्तकांची खरेदी करणे अत्यंत गरजेचे ठरते. भारंभार लिखाण, पुस्तकात विषयास अनुसरून लिखाण, लिखाण केलेले साहित्य वाचताना समजणे या सर्व बाबी ध्यानात घ्याव्याच लागतात. परीक्षेचा अभ्यासक्रम आणि त्यानुसार तयार केलेली अनेक पुस्तके आपणास पाहावयास मिळतात. त्यातील कोणत्या प्रकाशनाची आणि लेखकांची पुस्तके आपण निवडावीत हा खरा मनात घोळणारा प्रश्‍न असतो. आपल्याजवळ तयारी करण्यासाठी असलेला उपलब्ध वेळ आणि त्या वेळेत आपणाकडून कमीत कमी दोन ते तीन रिव्हिजन होण्यासाठी थोडक्‍यात मुद्देसूद लिखाण असलेले शिवाय वाचताना आपल्या ध्यानात राहील त्याचप्रमाणे त्याचे नीट आकलन होईल, असे लेखन साहित्य कोणते आहे याची पारख उमेदवारांनाच करावी लागते. त्यामुळे याबाबतीत उमेदवार चोखंदळ असलेच पाहिजेत. तसे उमेदवारांनी आपले मत बनवणे अत्यंत आवश्‍यक आहे. अन्यथा, बाजारात उपलब्ध साहित्य आहे म्हणून मोठ्या प्रमाणात खरेदी होते; मात्र जमवलेल्या साहित्यातील पुस्तकांचे वाचन एकदाही होत नाही. बऱ्याचशा उमेदवारांच्या बाबत असेच घडते. त्यामुळे परीक्षेस बसणाऱ्या उमेदवारांच्या संख्येच्या तुलनेने अशा प्रकारचा दृष्टिकोन ठेवलेले उमेदवार कमी असतात. त्यामुळेच अशा प्रकारचे निवडीची दृष्टी ठेवूनच हे काम व्यवस्थित प्रकारे करावे लागते. वाजवीपेक्षा अधिक पुस्तकांची जमवाजमव शक्‍यतो करू नये, अन्यथा त्या सर्व साहित्याचे वाचन झाले नाही म्हणून उमेदवारांच्या मनात शंका निर्माण होऊन उमेदवाराची उमेद कमी होते. त्यासाठी पुस्तकांची निवड ही बाब अतिशय महत्त्वाची असते. 

2) लेख - 
बऱ्याचदा वर्तमानपत्रात, नियतकालिकात अनेक विषयांवर विपुल लिखाण सुरू असते. जेव्हा आपण योजना किंवा लोकराज्य यासारखी नियतकालिके वाचतो तेव्हा एखाद्या विषयावरील लेखात मुद्दे फार थोडे असतात आणि त्या लेखकाने त्या मुद्यांचे विश्‍लेषण करण्यासाठी इतर मजकूर भरपूर लिहिलेला असतो. योजना आणि लोकराज्य ही मासिके खूप चांगली आहेत. मात्र त्यांचे वाचन करताना त्या लेखावरील आपली स्वतंत्र टिपणे आपणच करणे अधिक फायद्याचे ठरते. वर्तमानपत्रामध्येही बरेच लेख येतात. त्या लेखावरील आपली टिपणे वेगळी काढणे हे आपले काम असते. एखाद्या लेखाचे वाचन केल्यानंतर ही बाब प्रकर्षाने आपल्या लक्षात येते, की तीन किंवा चार मुद्यांच्या भोवतीच सर्व लिखाण केलेले असते. त्या लेखातील तीन किंवा चार मुद्दे अत्यंत महत्त्वाचे असे नीट समजून घेऊन त्यांची टिप्पणी आपण वेगळी केल्यास त्या मुद्यांच्या वाचनाने आपणास त्या विषयाबाबतच्या वस्तुनिष्ठ प्रश्‍नांची उत्तरे अचूक देणे शक्‍य होते. 

3) वाचनाची सवय - 
दररोजच्या वाचनाची आणि अभ्यासाची वेळ ठरवून त्या संदर्भातील पुस्तके आणि त्या त्या विषयावरील लिखाण वाचून उपयुक्त पुस्तकांच्या वाचण्यावर अधिक भर देणे गरजेचे ठरते. पहिल्या फेरीचे वाचन आपण करीत असताना योग्य त्या वेगाने ते आत्मसात करण्याचा प्रयत्न करावा लागतो. न समजलेल्या भागासाठी योग्य त्या व्यक्तींचे मार्गदर्शन घेण्याचा प्रयत्न जरूर करावा. ते शक्‍य नसल्यास आपल्या अशाच गटातील विद्यार्थी मित्रांशी चर्चा करून विषय समजून घेण्याचा प्रयत्न केल्यास आपणास त्या त्या विषयाचे चांगले आकलन होते. त्यासाठी वेळ मिळेल तेव्हा अशा चर्चांवर भर देणे फायद्याचे ठरते. एखाद्या पुस्तकातून वाचलेला एखाद्या टॉपिकबद्दल शंका येत असल्यास त्याच विषयातील दुसऱ्या पुस्तकातून त्यांचे निराकरण होत असल्यास तसेही करण्याचे जरूर प्रयत्न करावेत. एकूणच लेखक एखादा विषय हलक्‍याफुलक्‍या भाषेत समजेल या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्यातील आशय आपणास नीट समजणे गरजेचे असते. त्यामुळे वस्तुनिष्ठ प्रश्‍न असो की सविस्तर उत्तरे लिहिणे असो, ही बाब उमेदवारांना सहज येऊ शकते. वाचण्यासाठी स्वतंत्र दिवसभराचे वेळापत्रक बनविणे गरजेचे असते. त्यानुसार आपला किती अभ्यास झाला आणि किती अद्याप बाकी आहे, याचा नीटपणे रोजच्या रोज अंदाज येतो. उरलेल्या अभ्यासासाठी कशाप्रकारे वेळ वापरावयाचा याचेही नियोजन दररोज करून वेळ वाया जाणार नाही, याची दक्षता घेणे गरजेचे असते. वाचनाबद्दल आवड आणि ते वाचन व्यवस्थितपणे करणे हेही महत्त्वाचे आहे. 

4) चुका टाळणे गरजेचे - आपण ज्या स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करीत असाल तेव्हा आपल्याकडून त्याच त्याच चुका पुन्हा पुन्हा होताना आपल्या लक्षात येईल. तेव्हा सतर्क राहून चुका टाळण्याचा प्रयत्न करणे फार गरजेचे असते. एखाद्या पुस्तकाची निवड करण्यात येणारी चूक. एखाद्या लेखातील आशय चुकीचा असल्यास त्याबाबत इतरत्र माहिती घेतल्यानंतर आपण केलेल्या टिपणामध्ये करावयाची दुरुस्ती तत्परतेने करणे गरजेचे असते. एखाद्या विषयासाठी असलेले गुण आणि ते साहित्य वाचनासाठी द्यावयाचा वेळ या सर्व बाबी आपल्या आपणास तपासून पाहणे गरजेचे असते. बऱ्याचदा एखाद्या विषयाला अभ्यासक्रमात अत्यंत कमी वेटेज दिलेले असल्यास त्या विषयावरील वाचनासाठी त्यानुसारच वेळेचे बंधन ठेवले पाहिजे. अन्यथा, बराच वेळ अशा विषयांच्या वाचनासाठी दिला जातो आणि अधिक गुण असणारे विषय मागे पडतात. या सर्व परिस्थितीमुळे आपला आत्मविश्‍वास कमी होण्यास सुरवात होते. मात्र अशावेळी आपण योग्य वेळी त्यात बदल करून चुका टाळण्याने सुधारणा होऊ शकते. 

आपले प्रगती पुस्तक आपणच तपासावे - 
अभ्यासाच्या साहित्याची जमवाजमव झाल्यानंतर जेव्हा आपण अभ्यासाला वेग घेतो त्या वेळी आपली त्याबाबतची कामाची प्रगती आपणच तपासून त्यानुसार त्यात काही बदल करणे गरजेचे वाटल्यास योग्य ते बदल करून प्रगतीचा टप्पा गाठणे शक्‍य होते. मात्र आपली प्रगती आपणच तपासली नाही तर आपणास योग्य ते बदल करता येत नाहीत. जेव्हा आपल्या दररोजच्या वेळापत्रकानुसार आपला अभ्यासक्रम उरकत नसेल तेव्हा फेरविचार करून त्याचा मेळ घालण्याचे काम करावे लागते. 

भाषा विषयांसाठी खास तयारी गरजेची - 
मराठी आणि इंग्रजी हे अनिवार्य विषय असल्याने या भाषा विषयांचे व्याकरण आणि शुद्धलेखन यासाठी भरपूर पुस्तके बाजारात आहेत. त्यातील योग्य त्याच पुस्तकांची निवड होणे गरजेचे असून वेळ पडल्यास त्यासाठी खास मार्गदर्शन घेणेही आवश्‍यक ठरते. मातृभाषा मराठी असूनही आपण असंख्य चुका करतो. तसेच इंग्रजी भाषा इंग्रजांची असली तरी ती जगभर मोठ्या प्रमाणात वापरली जाणारी भाषा आहे. भाषाशैली उत्तम असणे ही बाब प्रत्येक उमेदवाराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असते. त्यामुळेच भाषा विषयांच्या तयारीसाठी दुय्यम स्थान देऊ नये. निबंध लेखन, पत्र लेखन, एखाद्या उताऱ्यावरील (पॅरेग्राफ) उत्तरे अशा अनेक प्रकारांना सामोरे जात असताना उत्तम शैली तयार होण्यासाठी योग्य मार्गाने प्रयत्न होणे गरजेचे असते. बऱ्याचदा उमेदवार या दोन्ही विषयांना दुय्यम स्थान देतात. मात्र त्यामुळे त्या विषयातील गुण कमी होते आणि पर्यायाने मेरिट यादीत आपला क्रमांक खाली जातो. त्या वेळी ही बाब लक्षात आल्यानंतर पुढच्या परीक्षेच्या वेळी उमेदवार त्या विषयाचे तयारीस लागतात. तोपर्यंत आपला बराच वेळ गेलेला असतो. तसेच आपला आत्मविश्‍वास कमी होतो. या सर्व बाबी टाळण्यासाठी परीक्षांचे पूर्वतयारीच्या दृष्टीने या दोन्ही विषयांना योग्य ते महत्त्व देऊन हे विषय उत्तम करण्याकडे उमेदवारांनी भर देणे गरजेचे ठरते. दर्जेदार लिखाण आणि त्याची मांडणी या बाबीही महत्त्वाच्या ठरतात. त्याशिवाय भाषेवरील प्रभुत्वही महत्त्वाचे ठरते. त्यासाठी भाषा विषयांची खास तयारी करावी. 

मुलाखतीसाठी उत्तम पूर्वतयारी - मुलाखतीसाठी ऐनवेळी तयारी होणे कठीण जाते. त्यासाठी बोलण्याचा सराव ठेवणे. इतरांशी बोलताना आपले मुद्दे सोप्या सुटसुटीत शब्दांत प्रभावीपणे मांडणे. त्यासाठी अवांतर वाचनाची आवड बाळगून त्यासाठी आपल्या वेळापत्रकात त्यास महत्त्व देणे गरजेचे ठरते. दररोजच्या वर्तमानपत्रातील जगभरातील, देशपातळीवरील, प्रादेशिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांचा मागोवा घेणे गरजेचे असते. वर्तमानपत्रातील बातम्या पाहताना थोडक्‍यात मुद्देसूद, परंतु जलद गतीने वाचनाची सवय अंगी बाळगावी. एखाद्या दुःखद घटनेबद्दल ती घटना घडूच नये यासाठी काय उपाय योजावयास हवे होते, अशा प्रकारे पॉझिटिव्ह थिंकिंगने त्या घटनेकडे पाहणे आणि मुलाखतीत तशा प्रकारे उत्तरे देणे गरजेचे असते. 

चिंतन - 
चिंतन हा खरे तर वास्तविक अत्यंत महत्त्वाचा भाग असून आजूबाजूला आणि आपल्याबाबतही काही घटना घडत असतात. त्यात नेहमीच चिंतनाने अनेक प्रश्‍नांच्या उत्तरांचा मागोवा आपण घेऊ शकतो. त्यासाठी रात्री झोपताना आपण आज दिवसभरात कोणती उत्तम कामगिरी केली आणि कोणत्या बाबतीत आपल्या चुका झाल्या, याबाबत थोडा वेळ दिल्यास बऱ्याच बाबतीत आपली वेगाने प्रगती होते. काही विषय आपल्याबद्दल असतील, काही विषय समाजाबद्दल असतील अथवा काही विषय इतरांच्या बद्दल असतील, या सर्व विषयांमध्ये अत्यंत थोड्या वेळात आपण त्यांचा परामर्श घेण्याची सवय अंगी बाळगलीच पाहिजे. त्यातूनच आपल्या स्वतःचा आणि इतरांचाही विकास साधणे सहज शक्‍य होत असते.

फुलधारणेसाठी मॅग्नेशिअम महत्त्वाचे

मॅग्नेशिअम पिकांना चस++ या विद्राव्य स्वरूपात उपलब्ध होतो. तसेच पिकांमध्ये मॅग्नेशिअमचे प्रमाण 0.1 ते 0.5 टक्का एवढे असते. नत्र, स्फुरद व पालाश या प्रमुख अन्नद्रव्यांचा असंतुलित वापर, सेंद्रिय खतांचा कमी वापर व मॅग्नेशिअम खतांचा कमी वापर यामुळे उत्पादनांत मोठी घट जाणवत आहे. म्हणून या अन्नद्रव्याचे पीक पोषणात योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. 

जमिनीमध्ये मॅग्नेशिअमची उपलब्धता - 
जमिनीच्या वरच्या भागात मॅग्नेशिअमचे सर्वसाधारण प्रमाण 0.03 ते 0.84 टक्का असते. तर रेताड जमिनीत मॅग्नेशिअमचे प्रमाण सर्वांत कमी (0.05 टक्का) तर पोयटायुक्त जमिनीत मॅग्नेशिअमचे प्रमाण जास्त असते. (0.5 टक्का) जमिनीच मॅग्नेशिअम विद्राव्य आणि अविद्राव्य स्वरूपात आढळतो. खनिजीय मॅग्नेशिअम व सेंद्रिय पदार्थांमधील मॅग्नेशिअम हे मॅग्नेशिअमचे जमिनीतील स्रोत आहेत. 

मॅग्नेशिअमची कमतरता लक्षणे - 
पिकांना त्यांच्या वाढीच्या वेगवेगळ्या अवस्थेत मॅग्नेशिअमची गरज कमी अधिक प्रमाणात असते. त्यामध्ये फुलधारणा व फळधारणा अवस्थेत झाडांना मॅग्नेशिअमची गरज जास्त असते. या अवस्थेत पिकांतील इतर अवयवांतील मॅग्नेशिअम फूल व फळ यांच्या वाढीसाठी जास्त खर्च होतो. त्यामुळे फूल व फळधारणा अवस्थेत पिकांना पुरेसे मॅग्नेशिअम उपलब्ध न झाल्यास पिकांमध्ये मॅग्नेशिअमच्या कमतरतेची लक्षणे दिसून येतात. मॅग्नेशिअमच्या कमतरतेची लक्षणे प्रथम जुन्या पानांवर दिसून येतात. मॅग्नेशिअमच्या कमतरतेमुळे झाडांची पाने सुकून जातात आणि जुन्या पानांच्या कडा पिवळ्या पडतात व कालांतराने शिरांकडील भाग पिवळा पडतो. तसेच मॅग्नेशिअमची पिकांना जास्त कमतरता झाल्यास पालाश कमतरता व मॅग्नेशिअम कमतरता यामध्ये फरक करणे अवघड होते. 

मॅग्नेशिअमच्या कमतरतेमुळे पानातील हरितद्रव्यांचा अभाव जाणवतो व पाने लहान आकाराची दिसतात. काही पिकांमध्ये मॅग्नेशिअमच्या अभावामुळे जुन्या पानांच्या कडा तपकिरी रंगाच्या दिसतात. कापूस या पिकात मॅग्नेशिअमच्या अभावामुळे पानांचा रंग लाल होतो. म्हणजेच हरितद्रव्याचा ऱ्हास पानांतील इतर रंगद्रव्यांच्या विघटनाच्या तुलनेत जास्त होतो. तसेच पानांतील प्रथिनांचा ऱ्हास होतो व पाने सुकून जातात. पाने सुकून किंवा पिवळी पडणे ही प्रक्रिया ज्या पानांवर सूर्यप्रकाश जास्त पडतो. अशा भागातील पानांवर जास्त असते तर ज्या पानांवर सावली पडते ती पाने हिरवी राहतात. मका पिकात सर्वांत खालच्या पानांमध्ये पिवळसर रेषा दिसतात, नंतर संपूर्ण पानांवर पसरतात. अति मॅग्नेशिअमच्या कमतरतेमुळे पानांवर डाग दिसतात. पानांची गळ होते. 

मॅग्नेशिअमचे पीक पोषणातील कार्य - 
-हरिद्रव्य तयार होण्यासाठी मॅग्नेशिअमची गरज असते. प्रकाशसंश्‍लेषण क्रियेमध्ये मॅग्नेशिअम महत्त्वाची भूमिका बजावतो. 
-पिकांमध्ये कर्बोदके, प्रथिने व मेद तयार होण्यासाठी, त्यांचे वहन व पिकांत साठा होण्यासाठी मॅग्नेशिअम उपयुक्त असते. 
-मॅग्नेशिअममुळे पिकांतील संप्रेरके व त्यांचे कार्य यांची गती वाढते. 
-पिकांमध्ये संप्रेरके व ऊर्जा तयार होण्याची प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी मॅग्नेशिअम अन्नद्रव्य महत्त्वाचे असते. 
-पिकात न्युक्‍लीक आम्ल (ठछअ) तयार होण्यास कार्य करते. 
-पिकांमध्ये ऊर्जा साठवण क्रियेमध्ये मॅग्नेशिअमची उपयुक्तता आहे. 
-पिकांतील पेशींची वाढ, पेशीभित्तका तयार होण्यास मॅग्नेशिअम महत्त्वाचे आहे. तसेच पिकांमध्ये पाण्याचे प्रमाण व संप्रेरकाचे प्रमाण संतुलित ठेवण्यास उपयुक्त असतो. 
-पिकांमध्ये लोहाचा वापर जास्त होण्यास मॅग्नेशिअम मदत करतो. 

मॅग्नेशिअम वापरण्याचे प्रमाण व पद्धत मॅग्नेशिअम जमिनीतून वापर पेरणी किंवा लागवड करतानाच 20 किलो प्रति हेक्‍टरी करावा किंवा पिकांच्या वाढीच्या संवेदनशील अवस्थांमध्ये फवारणीद्वारे 0.2 ते 0.5 टक्का (20 ते 50 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यातून) वापर करण्यात यावा.

रिमोट सेन्सिंग आणि जी.आय.एस.चे महत्त्व

रिमोट सेन्सिंग (सुदूर संवेदन) ही एक कला आणि शास्त्र आहे. रिमोट सेन्सिंगमध्ये आकडेवारीच्या नोंदी, त्यांची नोंदणी करून केलेल्या मोजमापांनुसार अभ्यास केला जातो. त्यावरून माहिती तयार केली जाते. उदा. एखाद्या अंतराबाबतची माहिती. जसे मनुष्य आपल्या डोळ्यांनी दुरून पाहून एखाद्या वस्तूच्या आकारमानाचा, वजनाचा, अगर तत्सम बाबींचा अंदाज घेतो; दूरवरून येणाऱ्या सुवासिक अथवा दुर्गंधीयुक्त वाऱ्याचा श्‍वसनाने नाकाद्वारे अंदाज घेतो, दुरून येणाऱ्या आवाजाचा कानांद्वारे अंदाज घेतो... हे मानवी देहाचे नैसर्गिक संवेदन शोधणारे अवयव आहेत, ते पर्यावरणामधून बराचसा अचूक वेध घेतात, त्यामुळेच मनुष्यास नैसर्गिक संवेदना घेणारे अवयव प्राप्त झालेले आहेत. मोठ्या प्रक्षेत्रावरील, पृथ्वीवरील अभ्यासासाठी यंत्रामध्ये सेन्सॉर बसवून भौगोलिक अभ्यासासाठी त्याचा आता उपयोग केला जात आहे. अशी यंत्रसामग्री हेलिकॉप्टरवर बसवून त्याद्वारे मोठमोठ्या क्षेत्राचे नकाशे तयार करणे, तसेच पृथ्वीवरील भौगोलिक रचनांचा अभ्यास करण्याकामी माहिती गोळा करण्याचे काम केले जाते. तशाच प्रकारची कामे विमानांद्वारे आणि सॅटेलाईटद्वारे सेन्सॉरचा वापर करून बरीच माहिती मिळवली जात आहे. त्यातूनच पृथ्वीवरील वेध घेण्याचे काम आणि माहिती मिळवण्याचे काम केले जाते. पृथ्वीवरील झाडे, घरे, रस्ते, फुले अथवा तत्सम वस्तू यांच्याकडून परावर्तित होणाऱ्या पर्यावरणातून सेन्सॉर वेध घेतात आणि त्याबाबतची माहिती दुरून संकलित केली जाते. 

सेन्सॉरचे 1) पॅसिव्ह, 2) ऍक्‍टिव्ह हे प्रमुख प्रकार आहेत. पॅसिव्ह सेन्सॉरसाठी बाह्यशक्तीची गरज असते. ही बाह्यशक्ती म्हणजे सूर्य. एखाद्या वस्तूवरून परावर्तित होणाऱ्या किरणांद्वारे याचे काम होते, तर ऍक्‍टिव्ह सेन्सॉर सिस्टिममध्ये स्वतःची शक्तिकेंद्रे असतात, उदा. रडार, हे काही विशिष्ट आवाजांद्वारे त्यावर पडलेल्या विशिष्ट प्रभावाचे रेकॉर्ड तयार करते. त्यामुळेच पॅसिव्ह सिस्टिम सर्वज्ञात असून, त्याचा वापर अधिक होतो. उदा. पृथ्वीच्या एखाद्या पृष्ठभागावरील पिकांचे प्रकार, झाडांचे प्रकार, गावांतील अथवा शहरांतील घरे, रस्ते इत्यादीवरून परावर्तित होणारे किरण त्याच प्रकारचे नकाशे बनवण्याकामी अथवा आकडेवारी जमवण्याकामी अत्यंत उपयुक्त ठरत आहेत. 

पृथ्वीच्या पृष्ठभागावरील माहिती गोळा करण्याचे काम बहुतेक बरेच सेन्सॉर करतात. ती माहिती प्रामुख्याने पृथ्वीवरील परावर्तित केल्या जाणाऱ्या इलेक्‍ट्रोमॅग्नेटिक स्पेक्‍ट्रम या किरणांद्वारे केली जाते. त्याचे प्रमुख कारण म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावर विविधता जाणवते, त्यामुळेच परावर्तित किरणांमध्येही फरक दिसून येतो. त्यातूनच पृथ्वीवरील इमेजस्‌ तयार होतात. माणसांचे डोळे ज्याप्रमाणे मॅग्नेटिक स्पेक्‍ट्रमचा उपयोग करून वस्तू अथवा पृथ्वीच्या पृष्ठभागावरील प्रदेश, वस्तू, घरे, झाडे, रस्ते, मोटारी इत्यादी वस्तू पाहू शकतात, त्याचप्रमाणे या सेन्सॉरची रचना केली जाते. इलेक्‍ट्रोमॅग्नेटिक स्पेक्‍ट्रममधून गॅमा रेज -----10-14, एक्‍स रे -----10-12 ते -----10-10, अल्ट्राव्हायोलेट रेज -----10-8, इन्फ्रारेड रेज -----10-6 ते -----10-4, रडार -----10-2, एफ.एम.-1 व टीव्ही -----10 2 -----, रॉर्ट वेव्ह -----10-2, ए-एम -----10 4 वेव्हलेंग्थ मीटरमध्ये. वेव्हलेंग्थ नॅनोमीटर्समध्ये नोंदली जाते आणि 400 ते 700 वेव्हलेंग्थमध्ये आपणास दिसेल असा प्रकाश मिळत असतो. इलेक्‍ट्रोमॅग्नेटिक स्पेक्‍ट्रम वातावरणातून सहजपणे पार होत असतात; मात्र इतर त्यातून पार होत नाहीत. 

रंगसंगतीचा अभ्यास - 
सूर्यप्रकाशाच्या किरणांच्या लांबीनुसार त्यात फरक पडतो. वातावरणातील वायूदेखील काही शक्ती (एनर्जी) साठवून ठेवतात, तसेच त्यातील काही शक्ती ते पुढे वेगवेगळ्या वेव्हलेंग्थनुसार पुढे पाठवतात. हवेत मोठ्या प्रमाणात बाष्पही असते, तेही काही प्रमाणात ही शक्ती घेते, तसेच कार्बन- डाय- ऑक्‍साईड आणि ओझोनही ही शक्ती स्वतःमध्ये साठवतात, त्यामुळेच हवेतील शक्ती साठवणारे हे बॅंड तयार होत असतात. या इलेक्‍ट्रॉनिक बॅंड म्हणजेच (विंडो) खिडक्‍या या हवेच्या आवरणात असून, त्या बॅंडपैकी काही निळ्या, हिरव्या, पिवळ्या, केशरी रंगांनी युक्त असून, त्यातूनच पृथ्वीकडे प्रकाश येतो आणि त्यातूनच पृथ्वीला ऊर्जा प्राप्त होते. याच विंडोमधून अथवा खिडक्‍यांमधून पृथ्वीवरील चित्रीकरण करण्याचे काम एअरक्राफ्टवर बसवलेल्या प्लॅटफॉर्मवरील सेन्सॉर करीत असतात. हे सेन्सॉर यापैकी एखादी खिडकी किंवा इतरही खिडक्‍यांमधून आपले काम करीत असतात. हवामानाचे रडार मात्र हवामानाच्या दृष्टीने ढगांच्या बाबतीतील माहिती घेतात, तसेच पावसाबाबतची माहिती जमवतात. ते रडार आणि त्यातील सेन्सॉर त्याचप्रमाणे बनवलेले असतात. 

वातावरणातील विंडो किंवा खिडक्‍या या निळ्या, हिरव्या आणि लाल रंगाच्या बॅंडमधून दिसू शकणारी व्यवस्था करतात. मात्र, अल्ट्राव्हायोलेट बॅंडमध्ये ऑक्‍सिजन आणि तत्सम वायू असतात, त्यामुळे त्यातून स्पष्टपणे प्रकाश येऊ शकत नाही. उष्णतेच्या दृष्टीने कार्बन- डाय- ऑक्‍साईड वायू, पाण्याचे प्रमाण या सर्व बाबी असतात. 

एकूणच पृथ्वीभोवतीचे वातावरण अतिशय गुंतागुंतीचे आहे. त्यातूनच सूर्याकडून येणारी शक्ती पृथ्वीच्या पृष्ठभागावर येत असते. मात्र, ती पृथ्वीकडे येताना वातावरणातील विविध प्रकारचा परिणाम होताना दिसून येतो आणि शेवटी हा प्रकाश पृथ्वीवर आल्यानंतर जेव्हा तो परावर्तित होतो, त्यातूनच पृथ्वीवरील परिस्थितीचे चित्रीकरण फार दूरवरूनही होऊ शकते. 

रिमोट सेन्सिंगसाठी अनुकूल आणि बिनाअनुकूल स्थिती 
विभागाचे नाव वेव्हलेंग्थ रिमोट सेन्सिंगसाठीची उपयुक्तता 
गॅमा रे 80.03 नॅनोमीटर रिमोट सेन्सिंगसाठी उपयुक्त नाही. 
एक्‍स-रे 0.03 ते 30 नॅनोमीटर रिमोट सेन्सिंगला उपयुक्त नाही. 
अल्ट्राव्हायोलेट 0.03 ते 0.4 मायक्रोमीटर्स या सर्वांचे शोषण ओझोन थर करीत आहे. 
फोटोग्राफीक अल्ट्राव्हायोलेट 0.03 ते 0.4 मायक्रोमीटर्स रिमोट सेन्सिंगसाठी उपयुक्त कॅमेऱ्याद्वारे अथवा सेन्सॉरद्वारे. 
व्हीजिबल 0.4 ते 0.7 मायक्रोमीटर्स रिमोट सेन्सिंगसाठी उपयुक्त कॅमेऱ्याद्वारे अथवा सेन्सॉरद्वारे 
निअर अँड मीड इन्फ्रारेड 0.7 ते 3.0 मायक्रोमीटर्स रिमोट सेन्सिंगसाठी उपयुक्त कॅमेऱ्याद्वारे अथवा सेन्सॉरद्वारे 
थर्मल इन्फ्रारेड <0.7 ते 3.0 मायक्रोमीटर्स रिमोट सेन्सिंगसाठी उपयुक्त मात्र कॅमेऱ्याद्वारे शक्‍य नसते. सेन्सॉरद्वारे शक्‍य आहे. 
मायक्रोवेव्ह किंवा रडार 0.1 ते 100 सेंटिमीटर्स लॅगरवेव्हलेंग्थ हे ढगामधून पास होऊ शकतात. त्याचप्रमाणे धुके आणि पावसातून पास होतात. सेन्सॉरचा वापर करून शक्‍य. 
रेडिओ >100 सेंटिमीटर्स याचा शक्‍यतो वापर रिमोट सेन्सिंगसाठी होत नाही. 

छायाचित्रांचा अभ्यास - 
पूर्वीची छायाचित्रे ब्लॅक ऍण्ड व्हाइट प्रकारातील कॅमेऱ्यांद्वारे चित्रफितीद्वारे घेतली जात असत. उपग्रह चित्रे ही सेन्सॉरचा वापर करूनच घेतलेली असतात. स्कॅनद्वारे एका विभागाचे अथवा अनेक विभागांचे चित्रीकरण सेन्सॉरद्वारे होते, त्यामुळेच व्हिजिबल बॅंडसाठी 400 ते 700 नॅनोमीटरमधील क्षेत्रच वापरण्यास योग्य ठरते. सध्या कलर कम्पोझिट चित्रे घेण्याची कामेही रिमोट सेन्सिंगद्वारे केली जात आहेत. एखाद्याच वास्तव्याबाबतचे चित्रीकरण केल्यास ते ग्रे म्हणजेच तपकिरी रंगाने केले जाते, तर कलर कम्पोझिट हे अनेक चित्रांचे एकत्रित चित्रीकरण मोठ्या चित्राने दाखवले जाते आणि ते चित्र अनेक रंगांनी भरलेले असते. 
जेव्हा सेन्सॉरद्वारे फोटो घेतले जातात, त्यात 30 मीटर × 30 मीटरपर्यंत पिक्‍सल साइज सेन्सॉरद्वारे ते काम केले जाते. 1) स्पेक्‍ट्रो रेडिओ मीटर, 2) सिंगल आणि मल्टीचॅनेल रेडिओ मीटर, 3) फास्ट सोलर ब्लाइंड इमेज रेडिओ मीटर या तीन प्रकारांपैकी सध्या बाजारात ऑप्टो-इलेक्‍ट्रॉनिक सिस्टिमची अनेक प्रकारचे सेन्सॉर असलेली इन्स्ट्रुमेंट्‌स बाजारात आणली आहेत. 

1) सागनॅक इंटरफ्युरॉमीटर बेस्ड सिस्टिम 
2) फिल्टरबेस्ड स्पेक्‍ट्रल इमेजेस 
3) स्पेशल रेडिओ मेट्रिक सेरअप 
4) रेडिओ मेट्रिक कॅलिब्रेशन्स 
5) कम्पलिट इलेक्‍ट्रोऑप्टिकल रिमोट सेन्सिंग डेव्हलपमेंट्‌स 
6) इन्फ्रारेड स्पेक्‍ट्रो रेडिओ मीटर 
7) परफॉर्मन्स मॉडेलिंग ऑफ आय. आर. सिग्नेचर्स 
यांपैकी शेतीतील पिकांच्या बाबतीत अभ्यासासाठी इन्फ्रारेड स्पेक्‍ट्रो रेडिओ मीटरचा वापर करतात. 

जी.आय.एस. : 
जी.आय.एस. म्हणजेच जिऑग्राफिक इन्फर्मेशन सिस्टिम. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील वेगवेगळ्या घटकांच्या अभ्यासासाठी, मोजमापासाठी आणि वर्गवारीसाठी संगणकप्रणालीवर आधारित तंत्रज्ञान विकसित केले आहे. त्यामध्ये कॉमन डेटाबेसचा वापर केला जातो. त्यामध्ये आकडेशास्त्राचा वापर करून वेगवेगळे नकाशे बनवण्याचे काम केले जाते. उदा. पॉप्युलेशन चॅरॅक्‍टरीस्टिक्‍स, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट अपॉर्च्युनिटीज (संधी) आणि वनस्पतींचे प्रकार यांचा समावेश होतो. उपलब्ध डेटाबेस आणि नकाशांचा त्यात वापर केला जातो, त्यामुळेच खासगी आणि सरकारी उद्योगांत त्याचा वापर प्रभावीपणे केला जात आहे. त्यामुळेच इतर डेटाबेसपेक्षा ही वेगळी प्रणाली आहे. त्यातूनच एखाद्या घटनेचा वेध घेणे अथवा अनेक घटनांचा वेध घेण्याचे, माहिती देण्याचे काम करणे सोपे जाते. 
नवनवीन धोरणे आखण्यासाठी जी.आय.एस.चा वापर वाढत आहे. 

रिमोट सेन्सिंगद्वारे बराच डेटा इमेजेस फॉर्ममध्ये गोळा करण्याचे काम केले जाते. त्याच इमेजेसवरून पुढे त्याचे विश्‍लेषण करून, वर्गवारी करून आणि त्यांच्यातील विविधता अभ्यासून जी.आय.एस.कामी त्याचा वापर केला जातो. त्यातूनच पुढे रिमोट सेन्सिंग आणि जी.आय.एस.ची सॉफ्टवेअर बनवली जातात. नासामध्ये अशा सॉफ्टवेअरचा वापर अधिक केला जात आहे. इंडियाना या अमेरिकेतील विद्यापीठात विद्यार्थ्यांना या सॉफ्टवेअर वापराबाबत शिक्षण देण्याचे काम सध्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यासच "युनिव्हर्सिटी इन्फर्मेशन टेक्‍नॉलॉजी सर्व्हिसेस' या नावानेही आता संबोधले जात आहे. 

जी.आय.एस.चा वापर कंपनी क्षेत्रात आणि सरकारी क्षेत्रात आता मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यात प्रामुख्याने विकासाच्या बाबतीतील तुलनात्मक अभ्यास करणे, एखाद्या मेंटेनन्सबाबतची माहिती संकलित करणे आणि त्यातील उणिवा शोधणे, रस्त्यांचा प्रभावीपणे वापर करणे, व्हेजिटेशनबाबत माहिती उपलब्ध करणे, पाण्याचा वापर, लाइटचा वापर, कम्युनिकेशन सिवेज इत्यादीबाबतची माहिती उपलब्ध होत आहे. रिमोट सेन्सिंगचे काम 1800च्या दरम्यान एरिअल फोटोग्राफी करून सुरू झाले. 1900च्या सुरवातीस एअरबलूनचा उपयोग वाऱ्याची दिशा आणि वेग मोजण्यासाठी प्रथम करण्यात आला. 

अपोलो स्पेसक्राफ्टद्वारे 1969 मध्ये पहिली इमेज स्पेसमधून घेण्यात आली. उपग्रहाद्वारे पहिले पृथ्वीचे चित्रण घेण्यात आले. सध्याच्या छायाचित्रे 1000 × 1000 पिक्‍सल स्केलपर्यंत मोठी बनवता येतात. सध्याच्या जे.पी.ई.जी. 2000 नुसार छायाचित्रे लहानात लहान आणि मोठ्यात मोठी बनवता येतात. हवामानशास्त्रात उपग्रहाद्वारे पृथ्वीचे छायाचित्र घेण्याचे काम करून ढगांचे प्रमाण, ढगांची जाडी, हवेची दिशा, हवेचा दाब, ढगांचे तापमान इत्यादी अनेक प्रकारची माहिती उपलब्ध केली जात आहे. 

बी.एस्सी. शुगर टेक्‍नॉलॉजी पदवी अभ्यासक्रम

आज साखर अपारंपरिक ऊर्जाक्षेत्र मोठ्या प्रमाणात विकसित होत आहे. येत्या दोन वर्षांत राज्यात 60 ते 70 प्लान्ट साखर को-जनरेशन डिस्टिलरीज उद्योग येत आहेत. याचा विचार करून कुशल व तांत्रिक मनुष्यबळ घडविण्यासाठी राजारामबापू कॉलेज ऑफ शुगर टेक्‍नॉलॉजी या संस्थेने महाराष्ट्र शासनाच्या मान्यतेने शिवाजी विद्यापीठाशी संलग्न असणारा बी.एस्सी. शुगर टेक्‍नॉलॉजी पदवी अभ्यासक्रम सुरू केला आहे. हा पदवी अभ्यासक्रम तीन वर्षांचा आहे, अशी माहिती संस्थेचे संचालक उमेश पवार यांनी दिली. 

असा आहे अभ्यासक्रम- 
बी.एस्सी. शुगर टेक्‍नॉलॉजी पदवीमध्ये शुगर मॅन्युफॅक्‍चरिंग, शुगर इंजिनिअरिंग, केमिकल इंजिनिअरिंग, केमिकल कंट्रोल, प्रोसेस कंट्रोल, सिस्टिम ऍण्ड इन्स्ट्रुमेशन इक्विपमेंट डिझाईन ऍण्ड कॅपॅसिटी कॅल्क्‍युलेशन, अल्कोहोल टेक्‍नॉलॉजी वॉटर मॅनेजमेंट, इन-को जनरेशन बिझनेस मॅनेजमेंट ऍण्ड मार्केटिंग फॉर शुगर इंडस्ट्रीज या अभ्यासक्रमांचा यामध्ये समावेश आहे. विद्यार्थ्यांना आठवड्यातून दोन दिवस प्रशिक्षण दिले जाते, तसेच सुट्टीच्या कालावधीत सलग प्रशिक्षण दिले जाते. सलग प्रशिक्षण दिल्याने विद्यार्थ्यांना तांत्रिकदृष्ट्या ज्ञान मिळते. 

नोकरीची संधी- मुलांचा व्यक्तिमत्त्व विकास व औद्योगिक प्रशिक्षणासाठी स्वतंत्र विभाग सुरू आहे. या विभागामध्ये प्रशिक्षणाबरोबर मुलांच्या नोकरीच्या दृष्टीने प्रयत्न केले जातात. त्या विद्यार्थ्यांना 15 ते 20 हजार रुपये इतके वेतन मिळत आहे. साखर व उपपदार्थ उद्योग, अल्कोहोल इंडस्ट्रीज केमिकल, फूड इंडस्ट्रीज आदी ठिकाणी नोकरीची संधी आहे; तसेच स्वतंत्र उद्योग व व्यवसायाची संधी आहे. 

पदव्युत्तर अभ्यासक्रम- 
पदवी अभ्यासक्रमानंतर एम.एस्सी. इन्स्ट्रुमेशन, केमिस्ट्री अल्कोहोल टेक्‍नॉलॉजी, शुगर टेक्‍नॉलॉजी, इनव्हायर्न्मेंटल सायन्स व एमबीएमध्ये पदवी घेता येते. 
सवलती : 
मागासवर्गीय विद्यार्थ्यांना समाजकल्याण शिष्यवृत्ती, साखर उद्योगाने विद्यार्थ्यास पुरस्कृत केल्यास त्यांना विशेष सुविधा दिल्या जातात. उद्योगात कार्यरत असणाऱ्यांनाही प्रवेश दिला जातो. इनप्लान्ट प्रशिक्षण, प्लेसमेंट आणि प्रशिक्षण विभागाची स्वतंत्र सोय आहे. 
पात्रता - 12 वी विज्ञान, डी. फार्मसी, इंजिनिअरिंग डिप्लोमा, एमसीव्हीसी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना बी.एस्सी. पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येतो. 

10 वी उत्तीर्ण नंतरच्या शिक्षण संधी - पेन बॉयलिंग, बॉयलर अटेंडंट, ड्रॉफ्टस्‌मन मेकॅनिकल, इलेक्‍ट्रिकल पॉवर जनरेशन ऍण्ड डिस्ट्रिब्युशन इन्स्ट्रुमेंटेशन प्रोसेस प्लान्ट मेंटेनन्स, फिटर, वेल्डिंग टेक्‍नॉलॉजी, मेडिकल लॅब टेक्‍निशियन असिस्टंट हे महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ मान्यतेने व्यवसाय प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू आहेत. 

संपर्क - 02342 - 222961 
राजारामबापू कॉलेज ऑफ शुगर टेक्‍नॉलॉजी, इस्लामपूर, जि. सांगली 

www.sugartechnology.in