Saturday, December 24, 2011

भाज्या, फळे निर्जलीकरणासाठी "बायोमास फायर्ड ड्रायर' विकसित

नागालॅंडमध्ये फळे आणि भाज्यांचे उत्पादन वाढत आहे. हा शेतीमाल नाशिवंत असल्याने त्याची टिकवण क्षमता वाढवण्यासाठी निर्जलीकरणाची आवश्‍यकता असते. निर्जलीकरण करण्यासाठी आवश्‍यक ड्रायर बाजारात उपलब्ध आहेत; मात्र त्यासाठी विजेची आवश्‍यकता आहे. नागालॅंडमध्ये डोंगराळ प्रदेशामुळे खेड्यापाड्यांत अद्यापही विजेची उपलब्धता हाच मोठा प्रश्‍न आहे. यावर नागालॅंडच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने उपाय शोधला आहे, त्यांनी टाकाऊ घटकांचा ऊर्जेसाठी वापर करणारा ड्रायर विकसित केला आहे. नुकतेच त्याचे प्रात्यक्षिक फेक जिल्ह्यातील साक्रबा या गावामध्ये करण्यात आले. 

ताज्या शेतीमालामध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असते, त्यामुळे भाज्या, फळे लवकर खराब होतात. शेतीमाल दूरच्या बाजारपेठेत पाठवताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. शेतकऱ्यांना योग्य दर मिळत नाही. त्यामुळे निर्जलीकरणाची प्रक्रिया केल्यास शेतीमाल अनेक दिवसांपर्यंत टिकू शकतो, तसेच वजनही कमी होत असल्याने वाहतुकीच्या दृष्टीनेही ते सोयीचे ठरते. प्रक्रिया केंद्रावर महागड्या ड्रायरचा वापर केला जातो; मात्र हे ड्रायर विजेवर चालणारे असून, त्यांना मोठ्या प्रमाणात वीज लागते. ग्रामीण भागात विजेची कमतरता असल्याने अनेक अडचणी येतात. या गोष्टीचा विचार करून नागालॅंडच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने लाकडे आणि टाकाऊ घटकांचा इंधन म्हणून वापर करता येईल, असा ड्रायर विकसित केला आहे. हा विजेवर चालणाऱ्या ड्रायरइतकाच कार्यक्षम असून, कमी किमतीमध्ये उपलब्ध होऊ शकतो. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रक्रिया उद्योगांना चालना मिळू शकते. हा ड्रायर कोहिमा येथील टर्बो इंजिनिअरिंग यांच्याकडून बनवून घेण्यात आला आहे. त्याची प्रात्यक्षिक चाचणी नुकतीच साक्रबा येथे घेण्यात आली. 


Ref.: http://www.agrowon.com/Agrowon/20111215/4643771396134225087.htm