Sunday, December 25, 2011

द्राक्ष सल्ला

सर्वच द्राक्ष विभागांमध्ये थोड्याफार प्रमाणात वातावरण ढगाळ झाले आहे. हे वातावरण असेच शुक्रवारपर्यंत राहण्याची शक्‍यता आहे. नाशिक विभागामध्ये त्यानंतर वातावरण निरभ्र राहील. तापमान किमान 13-15 अंश से.पर्यंत राहण्याची शक्‍यता आहे. पुणे विभागामध्ये पूर्ण आठवडाभर कमी-जास्त प्रमाणात वातावरण ढगाळ राहील, त्यामुळे किमान तापमान 9-13 अंश से.पर्यंत जाईल. सोलापूर आणि सांगली विभागात शुक्रवारनंतर अधूनमधून वातावरण ढगाळ होईल, त्यामुळे किमान तापमान 18-19 अंश से. वाढण्याची शक्‍यता आहे. ज्या दिवशी निरभ्र आकाश असेल, त्यावेळेस दुपारचे तापमान 32 ते 33 अंश से.पर्यंत जाऊ शकेल. वातावरणामध्ये आर्द्रता फारच कमी आहे. म्हणून तापमानानुसार कमाल सापेक्ष आर्द्रता 35 ते 50 टक्‍क्‍यांपर्यंत राहण्याची शक्‍यता आहे. काही ठिकाणी वातावरण कोरडे होऊन दुपारची आर्द्रता 18 ते 19 टक्‍क्‍यांपर्यंत कमी होऊ शकेल. 

- कुठल्याही द्राक्ष विभागामध्ये नवीन डाऊनीची लागण होण्याची थोडीसुद्धा शक्‍यता नाही. म्हणूनच उशिरा छाटलेल्या बागांमध्येसुद्धा बाग फुलोऱ्याच्या जवळपासच्या अवस्थेत असली तरी डाऊनीसाठी फवारण्या (आंतरप्रवाही किंवा बाह्यस्पर्शी) करण्याची अजिबात आवश्‍यकता नाही. सर्व ठिकाणी डाऊनीसाठी फवारण्या थांबवाव्यात. 

- ढगाळ वातावरण व दुपारचे तापमान 25 ते 30 अंश से.पर्यंत जास्त वेळ राहणार असल्यामुळे बागेमध्ये भुरीची शक्‍यता वाढते. कारण या वातावरणामध्ये भुरीचे बीजाणू अधिक तयार होतात व बागेतील आतल्या कॅनोपीमध्ये भुरी पसरू शकते. म्हणून भुरीच्या नियंत्रणाकडे चांगले लक्ष देणे गरजेचे आहे. भुरीच्या नियंत्रणासाठी ट्रायझोल गटातील बुरशीनाशके (पेनकोनॅझोल (10 ईसी) अर्धा मि.लि.प्रति लिटर (पीएचआय 50 दिवस) किंवा ट्रायडिमेफॉन (25 डब्ल्यू.पी.) अर्धा ते एक ग्रॅम प्रति लिटर (पीएचआय 45 दिवस) किंवा हेक्‍झाकोनॅझोल (5 ईसी) एक मि.लि. प्रति लिटर (पीएचआय 38 दिवस) किंवा मायक्‍लोब्युटानील (10 डब्ल्यू.पी.) 0.4 ग्रॅम प्रति लिटर (पीएचआय 30 दिवस) ) भुरीच्या नियंत्रणासाठी प्राधान्याने फवारावीत. स्ट्रॉबील्युरीन गटातील बुरशीनाशकांचा वापर भुरीच्या नियंत्रणासाठी कटाक्षाने टाळावा. बुरशीनाशकाविरुद्ध बुरशीत प्रतिकारशक्ती विकसित होऊ नये यासाठीच्या चांगल्या व्यवस्थापनासाठी असे करणे आवश्‍यक आहे. 

- येत्या आठवड्यात वातावरणात थंडी वाढण्याची शक्‍यता आहे. थंडीच्या दिवसांत सल्फर चांगल्या रीतीने काम करत नाही. म्हणून सल्फरचा वापर या आठवड्यात टाळावा. 

- बऱ्याच ठिकाणी घडावर किंवा मण्यांवर भुरीचे डाग दिसण्यास सुरवात झाली आहे. अशा ठिकाणी ट्रायाझोल गटातील बुरशीनाशकांच्या बरोबर मोनोपोटॅशिअम फॉस्फेट (0ः52ः34) किंवा सल्फेट ऑफ पोटॅश दोन ते तीन ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात मिसळून फवारल्यास भुरीचे चांगले नियंत्रण मिळू शकेल. 

- थंडीच्या दिवसांत किंवा ढगाळ वातावरणामध्ये बागेतील पाण्याच्या व्यवस्थापनाकडे विशेष लक्ष द्यावे. पाणी जास्त झाल्यास मण्यांचे क्रॅकिंग होऊ शकते, तर पाणी कमी झाल्यास भुरी व लाल कोळीचा प्रादुर्भाव वाढू शकतो. 
बागायतदारांनी समस्यांचे निराकरण करण्यासाठी एनआरसीकडे संपर्क साधावा.


Ref.: http://www.agrowon.com/Agrowon/20111222/5144288893859706411.htm