Saturday, December 24, 2011

सफरचंदाचा कुरकुरीतपणा, ताजेपणा मोजणारे उपकरण विकसित

प्रक्रिया उद्योगामध्ये वापरला जाणारा कच्चा माल चांगला आणि ताजा असल्यास तयार होणारे पदार्थ हे चांगल्या दर्जाचे होतात, त्यामुळे अनेक कंपन्यांमध्ये फळांची गोडी, त्यांचा ताजेपणा, कुरकुरीतपणा तपासण्यासाठी खास माणसांची नियुक्ती "बायटर' या पदावर केली जाते. या व्यक्ती फळाची चव घेऊन, त्यावरून त्याचे मूल्यमापन करतात. तरीही त्यामध्ये मानवी स्वभाव, सवयी यांच्यामुळे काही प्रमाणात वेगवेगळे निष्कर्ष येण्याचा धोका असतो. ही त्रुटी कमी करण्याच्या उद्देशाने अमेरिकेतील वॉशिंग्टन राज्य विद्यापीठातील संशोधकांनी संगणकाचा वापर करून "पेनिट्रोमीटर' विकसित केला आहे, त्यामुळे "ऍपल बायटर'च्या कामकाजामध्ये सुसूत्रता आणणे शक्‍य होणार आहे. 

सफरचंद फळाचा टणकपणा, घट्टपणा आणि पक्वता तपासण्यासाठी फळ प्रक्रिया उद्योगात "स्टॅण्डर्ड पेनिट्रोमीटर' आणि "ऍकॉस्टिक रेझोनन्स टेक्‍नॉलॉजी' या उपकरणांचा वापर केला जातो. याच उपकरणाची "मोहर डीजी टेस्ट' ही पुढची आवृत्ती असून, यात फळांचा कुरकुरीतपणाही तपासला जातो. हे उपकरण संगणकाशी जोडलेले असल्याने त्याचे मोजमाप नोंदवणे सोपे जाते. याबाबत माहिती देताना संशोधक केट इव्हान यांनी सांगितले, की सफरचंदाचा घट्टपणा, कुरकुरीतपणा मोजण्यासाठी मोहर डीजी टेस्ट या साधनाचा चांगल्या प्रकारे उपयोग होऊ शकतो. घट्टपणासाठी आवश्‍यक सर्व घटकांतील संबंधांची माहिती यावर उपलब्ध होऊ शकते, तसेच सेन्सरच्या साह्याने मिळालेल्या माहितीचे विश्‍लेषण केले जाते, त्यामुळे मिळालेल्या माहितीची अचूकता अधिक असते. या आधी वापरण्यात येणाऱ्या ऍकॉस्टिक रेझोनन्स किंवा स्टॅण्डर्ड पेनिट्रोमीटर या उपकरणापेक्षा मोहर डीजी टेस्टमधून अधिक माहिती मिळते. 

या उपकरणाच्या चाचण्या 16 जातीच्या सफरचंदांवर घेण्यात आल्या. त्या निष्कर्षांशी "ऍपल बायटर'च्या गटाने दिलेल्या निष्कर्षांची तुलना केली असता, दोन्ही निष्कर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात साम्य आढळून आले आहे. या उपकरणाद्वारे फळांची चव तपासता येत नाही. या संशोधनाचा वापर अन्य फळांसाठी करण्याबाबत संशोधन सुरू आहे. हे संशोधन अमेरिकन सोसायटीच्या "हॉर्ट टेक्‍नॉलॉजी इलेक्‍ट्रॉनिक' या संशोधन पत्रिकेत प्रकाशित करण्यात आले आहे.


Ref.: http://www.agrowon.com/Agrowon/20111221/5030859588172889179.htm