Saturday, December 24, 2011

"एमपीएससी'त कृषी विषयाला प्राधान्य

नागपूर - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पद्धतीत मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले आहेत. आता 34 पैकी फक्त चार विषय ऐच्छिक ठेवण्यात आले आहेत. या चारही विषयांचा पेपर वस्तुनिष्ठ स्वरूपाचा राहणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या स्कोअरिंगसाठी कृषिविषयक प्रश्‍नांना अधिकाधिक प्राधान्य द्यावे अशी विनंती आयोगाला करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधान परिषदेत दिली. 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अभ्यासक्रमातून कृषिशास्त्र आणि फलोत्पादनशास्त्र हे विषय वगळण्यात आले आहेत. शेतकऱ्यांची मुले तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांवर हा अन्याय असल्याची लक्षवेधी सतीश चव्हाण यांनी मांडली होती. एक संपूर्ण पेपर कृषी विषयावरचा कायम ठेवावा अशी मागणी त्यांनी केली. डॉ. दीपक सावंत यांनी हा विषय स्कोअरिंगचा असल्याने तो कायम ठेवावा अशी सूचना केली तर भाई जगताप यांनी प्रश्‍न फक्त स्कोअरिंगचा नाही, तर कृषी हा भारताचा गाभा असल्याचे सांगितले. या विषयावर मुख्यमंत्र्यांनी सविस्तर उत्तर दिले. "एमपीएससी'च्या अभ्यासक्रमात एकूण 34 ऐच्छिक विषय होते. प्रत्येक विषयाचे तज्ज्ञ, पेपर तपासणीस मिळण्यास अडचणी येत होत्या. यामुळे काही महत्त्वाच्या विषयांचा समावेश करण्यात आला आहे. यात कायदा, इतिहास, भूगोल, अर्थकारण व विज्ञान व तंत्रज्ञान या विषयांचा समावेश करण्यात आला. याशिवाय परीक्षा पद्धतीतसुद्धा बदल करण्यात आला आहे. यानुसार मराठी आणि इंग्रजीचा शंभर गुणांचा पेपर राहील, वस्तुनिष्ठ स्वरूपाचे दीडशे गुणांचे चार पेपर अशी एकूण परीक्षा आठशे गुणांची राहील तर मुलाखत शंभर गुणांची राहणार आहे. काही विषयांमध्ये स्कोअरिंग करता येत नाही. यामुळे सर्वच विषयांना समान दर्जा देण्यात आला आहे. शेवटी सर्वच विषय महत्त्वाचे आहेत. आता ग्रामीण भागातील शिक्षणाच्या चांगल्या सुविधा उपलब्ध झाल्या आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी इंजिनिअर्स होत आहेत. विज्ञान शाखेत पदव्या घेत आहे. नव्या पद्धतीमुळे सर्वच अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना फायदा होईल, असेही मुख्यमंत्री चव्हाण यांनी स्पष्ट केले. 


Ref.: http://www.agrowon.com/Agrowon/20111224/4615877317869727051.htm