Friday, July 20, 2012

कृषी व्यवस्थापन - उद्योजक घडविणारे शिक्षण

प्रक्रियेसाठीची पूरक धोरणे, तरुणांची वाढती संख्या व क्रयशक्ती यामुळे देशातील अन्न व कृषी उद्योग क्षेत्रात गुंतवणुकीस प्रचंड संधी आहेत. येत्या तीन वर्षांत भारतीय अन्नप्रक्रिया उद्योगातील गुंतवणूक 181 अब्ज अमेरिकन डॉलरवरून 258 अब्ज अमेरिकन डॉलरपर्यंत वाढणे अपेक्षित आहे. यानुसार 2020 पर्यंत अन्नप्रक्रिया उद्योगातील गुंतवणूक 318 अब्ज अमेरिकन डॉलरपर्यंत पोचण्याचा अंदाज आहे. 

देशांतर्गत व जागतिक बाजारपेठेची अन्नाची, विशेषतः प्रक्रियायुक्त अन्नाची मागणी दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे. गेल्या पाच वर्षांत देशाच्या दरडोई उत्पन्नात आठ पटीने वाढ झाली असता, अन्नावरील खर्चात मात्र 20 टक्‍क्‍यांनी वाढ झाली. कोणत्याही उद्योग - व्यवसायातील वाढ ही त्यातील संधींमधील वाढीत परावर्तित होत असते. अन्नप्रक्रिया उद्योग हे कृषी व संलग्न उद्योगांच्या वाढीचे एक प्रातिनिधिक उदाहरण मानले, तर एकंदरीत कृषी क्षेत्रातील वाढत्या संधींची कल्पना यावी. गेल्या दहा वर्षांतील व येत्या दहा वर्षांतील वाढ विचारात घेता कृषी उत्पादन, प्रक्रिया, निर्यात, पायाभूत सुविधा आदी क्षेत्रांत नोकरी - व्यवसाय व गुंतवणुकीच्या प्रचंड संधी राहणार, हे निश्‍चित. या संधी काबीज करण्यासाठी कृषी व्यवसाय व्यवस्थापनाचे शिक्षण अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. 

खते, बियाणे, कीटकनाशक उत्पादक कंपन्या, बॅंका ते अगदी मोबाईल कंपन्यांपर्यंत बहुतेक सर्व उद्योग शेतकरीकेंद्रित होत आहेत. त्यासाठी त्यांना शेतीचे पायाभूत शिक्षण, ज्ञान असलेले व व्यवस्थापनातही कौशल्य मिळवलेले प्रशिक्षित मनुष्यबळ आवश्‍यक असते. यासाठी कृषी, उद्यानविद्या, जैवतंत्रज्ञान आदी कृषी विषयांमध्ये पदवी व त्यानंतर व्यवस्थापनात पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या "ऍग्री टेक्‍नोमॅनेजर' लोकांना सध्या सर्वाधिक संधी आहेत. 

शेतकऱ्यांच्या गरजांचे आकलन कृषीचे शिक्षण घेतलेल्या मुलांएवढे इतर कुणाचे नसते, त्यामुळे बॅंक कर्ज मंजुरीपासून ते शेतकऱ्यांसाठीचे मोबाईल संदेश तयार करण्यापर्यंत सर्व कृषीसंलग्न उद्योगांत कृषी पदवीधरांचे तांत्रिक ज्ञान फार उपयुक्त पडते. शेती किंवा शेतकऱ्यांशी संबंधित असलेल्या सर्व उद्योगांची नियोजनापासून अंमलबजावणीपर्यंतची जबाबदारी ऍग्री टेक्‍नोमॅनेजर लोकांवरच असते, त्यामुळे तांत्रिक ज्ञानाला व्यवस्थापनाची जोड असलेली व्यक्ती तांत्रिक व व्यावसायिक बाबींच्या समन्वयातून मोठे उद्दिष्ट साध्य करते. गेल्या पाच वर्षांत असे दुहेरी प्रभुत्व असलेले विद्यार्थी नोकरी, संशोधन व विकास ते स्वतंत्र उद्योग - व्यवसायांपर्यंत सर्वत्र चांगली कामगिरी करत आहेत. व्यवस्थापनाचे शिक्षण घेतलेले कृषी पदवीधर उद्योजकतेकडे वळण्याचे प्रमाण वाढले आहे. 

कृषी पदवीनंतरच्या व्यवस्थापन शिक्षणामध्ये मार्केटिंग, फायनान्स, प्रॉडक्‍शन यांमध्ये सर्वाधिक संधी आहेत. याशिवाय कृषीतील विविध क्षेत्रांनुसार रिटेल, सप्लाय चेन, फॉरेस्ट्री, कार्बन ट्रेडिंग, एन्व्हायर्न्मेंटल सायन्स, फूड क्वालिटी, पॅकेजिंग, लाइव्हस्टॉक, पेस्टीसाइड, फूड - वॉटर मॅनेजमेंट यामध्येही व्यवस्थापनाचे अभ्यासक्रम सुरू झाले आहेत. 

कृषी व संलग्न तांत्रिक विषयांतील पदवीधरांसाठी विविध विद्यापीठे, शासकीय व खासगी संस्थांमार्फत वैशिष्ट्यपूर्ण व्यवस्थापन अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. मुंबई विद्यापीठ, गुजरातमधील आनंद कृषी विद्यापीठ, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम, अहमदाबाद), वैकुंठ मेहता इन्स्टिट्यूट, मिटकॉम यासह अनेक संस्थांमार्फत विशिष्ट विषयात प्रावीण्य मिळून देणारे व्यवस्थापन अभ्यासक्रम शिकवले जातात. विद्यार्थ्यांनी पदवीनंतर आपले पायाभूत ज्ञान व आवडीनुसार व्यवस्थापन शिक्षणाची दिशा निश्‍चित केल्यास फायदा होतो. संबंधित शिक्षण संस्थांच्या संकेतस्थळांवरून या अभ्यासक्रमांची सविस्तर माहिती मिळू शकते.