Friday, July 20, 2012

डोंगर उतारावर बारा एकरांत जांभूळ, दोन एकरांत केळीचा प्रयोग


पुणे येथील रामदास मुरकुटे यांची वडिलोपार्जित थोडीफार पारंपरिक भात शेती. विश्‍वास आणि राहुल मुरकुटे ही त्यांची मुले. मुलांनी हॉटेल व्यवसायात लक्ष घालून तो वाढवला. काही वर्षांपूर्वी शेतीत लक्ष देण्यासाठी जाणकार व्यक्तींची गरज असल्याने मुरकुटे यांनी कृषी पदविका पूर्ण केलेल्या मनोहर धुमाळ यांची नेमणूक केली. तेव्हापासून शेतीचा सर्व कारभार धुमाळ पाहू लागले. शेतीविषयी आवड असल्याने त्यांनी या शेतीचा केलेला कायापालट वाखाणण्याजोगा आहे. 

मुरकुटे यांची वीस एकर शेती मुळशी (जि. पुणे) तालुक्‍यातील नांदे शिवारात 15 तर दुसऱ्या ठिकाणी पाच एकर विभागली आहे. सर्वाधिक क्षेत्र असलेली जमीन अतिशय उंच डोंगरावर असून उतारावरची शेती आहे. पाण्यासाठी दोन विहिरी असून पुरेसे पाणी असते. शेतातून मुळशी धरणाचे दृश्‍य दिसते. माती लालसर असून दगडगोट्यांचे प्रमाण अधिक आहे. या ठिकाणी भरपूर पाऊस पडतो. परंतु पाण्याचा चांगल्या प्रकारे निचरा होतो. डोंगर उताराच्या पडीक जमिनीचा उपयोग करण्याच्या दृष्टीने धुमाळ यांनी या जागेत वेगळा प्रयोग करण्याचे ठरविले. जांभळाला मिळणारा भाव पाहता हे फळ अन्य फळांएवढेच बाजारपेठेत विकले जाते या अभ्यासातून त्याची लागवड करण्याचे निश्‍चित केले. 

बारा एकरांत प्रयोग - 
जांभळाची सलग मोठ्या क्षेत्रावर व्यापारीदृष्ट्या लागवड केलेली फारशी आढळत नाही. आपल्या प्रयोगाविषयी धुमाळ म्हणाले, की जांभळांना मागणी मोठ्या प्रमाणात असते. दरही चांगले मिळतात. अभ्यासातून कळले की बाजारात मेच्या अखेरीस शंभर रुपये प्रति किलोच्या आत जांभूळ मिळत नाही. त्यामुळे चांगले आर्थिक उत्पन्न मिळविता येऊ शकते. जांभूळ मधुमेह असणाऱ्यांना उपयुक्त फळ असून त्याच्या बियांपासून पावडर तयार करून मूल्यवर्धन करता येते. पिकातील सर्व गोष्टी समजून 2002 मध्ये (नोव्हेंबर) बारा एकरांत जांभूळ लागवडीचा प्रयोग केला. 

व्यवस्थापन -
धुमाळ म्हणाले, की लागवडीपूर्वी माती- पाणी परीक्षण करून घेतले. त्यामुळे जमिनीत कोणत्या अन्नद्रव्यांची कमतरता आहे हे लक्षात आले. त्यानुसार खत व्यवस्थापन करणे सोपे झाले. कोइमतूर येथून "कृष्णगिरी' जातीची रोपे आणली. 20 x 20 फूट अंतरावर खड्डे खणून शेणखत, निंबोळी पेंड, सिंगल सुपर फॉस्फेट, कीटकनाशक टाकून रोपे लावली. एकरी शंभर याप्रमाणे बारा एकरात सुमारे बाराशे रोपे लावली. त्यानंतर रोपांभोवती आळे तयार केले. सुरवातीला आठवड्यातून एक वेळा आळ्यात पिकाच्या गरजेनुसार पाइपद्वारे पाणी दिले. तीन महिन्यांनी प्रत्येक झाडाला एक घमेले शेणखत गोलाकार पद्धतीने दिले. पाने कुरतडणाऱ्या अळीपासून संरक्षण होण्यासाठी दरवर्षी पावसाळ्यात सायपरमेथ्रीनची फवारणी केली. ऑक्‍टोबरमध्ये झाडाच्या बुंध्याला तीन फुटांपर्यंत बोर्डो पेस्ट लावण्याचे नियोजन ठेवले. झाडांची उंची मर्यादित ठेवण्यासाठी पावसाळ्यापूर्वी झाडांची छाटणी, शेंडे छाटणे ही कामे नियमित केली. काटेकोर व्यवस्थापन केल्याने रोग-किडींचा फारसा प्रादुर्भाव झाला नाही. रासायनिक खतांपेक्षा सेंद्रिय खतांच्या वापरावर भर दिला. त्यामुळे झाडाची प्रतिकारक्षमता वाढली.
 
लागवडीनंतर चालू वर्षी सुमारे दहा टक्के झाडांना फळे लगडली. एका झाडावर सुमारे शंभर किलोहून अधिक जांभळे होती. परंतु मध्यंतरी जोरदार पावसाने अनेक फळे गळून पडली. याच क्षेत्राच्या बाजूला असलेल्या रिसॉर्टमध्ये येणाऱ्या ग्राहकांना जांभळे मोफत दिली आहेत. पुढील वर्षी अधिक झाडांना फळे येण्याचा अंदाज असल्याने त्यादृष्टीने विक्रीचे नियोजन होणार आहे. अडीचशे ग्रॅम प्लॅस्टिक पॅकिंगमधून जांभळे विकण्याचा मनोदय असल्याचे धुमाळ म्हणाले. 

व्यवस्थापनातील ठळक बाबी - 
- प्रत्येक झाडाचे काटेकोरपणे व्यवस्थापन केल्याने झाड निरोगी आहे. 
- झाडांभोवती आळे करून त्यावर पाचटाचे आच्छादन केले आहे. 
- झाडांच्या दोन ओळींतील आसपासची जमीन नांगरून स्वच्छतेवर भर दिला आहे. 

काढणीसाठी मजुरांची समस्या - 
जांभूळ नाजूक असते. त्यामुळे योग्य वेळेत काढणी आवश्‍यक असते. जांभळे खाली पडल्यास नुकसान होते. फळे तोडण्यासाठी मजुरांची मोठ्या प्रमाणात गरज असते. मजूर न मिळाल्यास फळे काढणे अवघड होते. त्यामुळे एक ते दोन महिने मजूर सतत उपलब्ध होतील यादृष्टीने नियोजन आवश्‍यक असते. चालूवर्षी फक्त दहा टक्के झाडांना फळे आल्याने घरच्या घरी जेवढी फळे काढता आली तेवढी काढली, परंतु पुढच्या वर्षी यासाठी काटेकोर नियोजन करणार असल्याचे धुमाळ यांनी सांगितले.
 
केळी - 
जांभूळ लागवड केलेल्या क्षेत्राशेजारी भात लागवड करत असलेल्या शेतात धुमाळ यांनी प्रथमच केळी लागवडीचा प्रयोग करण्याचे ठरविले. मागील वर्षी जुलैत केळी लागवड केली. दोन एकर क्षेत्रात 5 x 6 फूट अंतरावर ग्रॅडनैन या जातीच्या उतिसंवर्धित रोपांच्या लागवडीसाठी 13 रुपये प्रमाणे एक रोप खरेदी केले. एकूण अडीच हजार झाडे आहेत. प्रत्येक झाडावरील केळीचा घड पाहून त्यावर घेतलेल्या मेहनतीचा अंदाज येतो. या भागात केळीचा प्रयोग अद्याप कोणीही केलेला नाही. केळीच्या व्यवस्थापनाविषयी बोलताना ते म्हणाले, की लागवडीपूर्वी माती, पाणी परीक्षण करून घेतले. जमिनीत दहा ट्रॉली शेणखत टाकले. ट्रॅक्‍टरने सरी काढून एक आड एक सरी या पद्धतीने लागवडीसाठी शेत तयार करून केळी रोपे लावली. ह्यूमिक ऍसिडची रोपांभोवती आळवणी केली. त्यानंतर दोन ट्रक घोडखत मातीत मिसळून रोपांना मातीची भर लावली. ठिबकद्वारे पिकाचे खत, पाणी व्यवस्थापन सुरू केले. साधारणतः सव्वा फुटावर तीन लिटरचे इनलाईन ड्रीपर बसविले आहेत. दर पंधरा दिवसांच्या अंतराने केळीला 0ः52ः34, 13ः0ः61, 0ः0ः50 ही विद्राव्य खते दोन किलो या प्रमाणात एक हजार झाडांसाठी ठिबकमधून दिली. असे साधारण एक महिना केले. रोग-किडींचा फारसा प्रादुर्भाव झाला नाही, त्यामुळे फवारणी करण्याची गरज पडली नाही. दररोज एक तास पाणी देण्याचे नियोजन ठेवले होते. जमिनीतून बुरशीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून ठिबकद्वारे ट्रायकोडर्मा हे जैविक बुरशीनाशक दिले. अंतिम टप्प्यात घडावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून कार्बेन्डाझीमची फवारणी केली. दहाव्या महिन्यात घड बाहेर पडायला सुरवात झाल्यावर घडाच्या विरुद्ध बाजूला एक पील ठेवले आहे.
 
लागवडीनंतर नवव्या महिन्यात पिकाला फुले आली. एका झाडावर साधारणतः आठ फण्यांचा एक घड लागला आहे. एका फण्यात सुमारे 28 ते 32 केळी आहेत. नंतरच्या महिन्यात आलेल्या घडामध्येही 30-35 केळी आहेत. घडातील एका केळ्याची लांबी सुमारे आठ ते नऊ इंच आहे. 
एका घडाचे सरासरी वजन अंदाजे 35 ते 40 किलो आहे. दोन एकरांतून अंदाजे 60 ते 70 टन केळीचे उत्पादन निघण्याचा अंदाज आहे. केळी पिकाच्या व्यवस्थापनासंदर्भात वेळोवेळी तज्ज्ञांचा सल्ला घेतल्याचे धुमाळ यांनी सांगितले. 

केळी नियोजनातील महत्त्वाचे... 
- लागवडीपूर्वी माती-पाणी परीक्षण केले. 
- पांढऱ्या मुळ्यांच्या वाढीवर सतत लक्ष दिले. 
- सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पुरेपूर वापर केला. 
- घडांच्या वजनाने झाड कलू नये म्हणून बांबूचा आधार दिला. 
- दोन ओळींतील तणनियंत्रण काळजीपूर्वक केले. 

इतर शेती दृष्टिक्षेपात - 
- केसर, हापूस आंब्याची 300 झाडे 
- नारळाची 400 झाडे 
- सीताफळाची बाराशे झाडे 
- याशिवाय हनुमान फळ, शेवगा आणि फणस 

संपर्क - मनोहर धुमाळ, 9822804347