Friday, July 20, 2012

हळद उत्पादक झाला यशस्वी उद्योजक


चिरेखाणवाडी (ता. बारामती, जि. पुणे) हा अवर्षणग्रस्त भाग. येथील सतीश आनंदराव जगदाळे यांची पाच एकर शेती. पारंपरिक पिकांतून फारसा फायदा होत नसल्याने आले, हळदीकडे ते वळले. त्या वेळी या पिकांना चांगले दर होते. कृषी विज्ञान केंद्र, बारामती येथील हळद लागवड प्रशिक्षण कार्यक्रमात भाग घेतला. वाई येथील बाळासाहेब मांढरे यांच्या हळदीच्या शेताला भेट देऊन पिकाचे व्यवस्थापन समजून घेतले. त्यानंतर 10 गुंठे क्षेत्रावर हळदीचे सेलम आणि 30 गुंठ्यांत सातारी आले लावले. हळदीचे सहा तर आल्याचे 15 क्विंटल उत्पादन मिळाले. मात्र उतरलेल्या दरामुळे हळद तशीच ठेवण्याचा निर्णय घेतला. 
हाती पट्टी फक्त 300 रुपयांची!
 
हळद सांभाळून तरी किती ठेवणार हा प्रश्न होता. एके दिवशी पुणे मार्केटमधील व्यापाऱ्याला फोन करून 50 किलो हळद काढून विक्रीसाठी नेली. तेथे हाती पडले केवळ 300 रुपये. हळद काढणीचा खर्च होता 200 रुपये. वाहतूक व अन्य खर्च वजा जाता हाती काहीच पडले नाही. पिकात अपयश आल्याची भावना झाली. मनात साऱ्या व्यवस्थेविरुद्ध संताप येत होता. जगदाळे अनेकांशी चर्चा करीत होते.

...असे वळले प्रक्रियेकडे 
चर्चेअंती हळदीवर प्रक्रिया हा नामी उपाय असल्याचे जगदाळे यांच्या समोर आले. मात्र सहा क्विंटलसाठी बॉयलर, अन्य सामग्री घेणे परवडणारे नव्हते. ते पुन्हा हताश झाले. कृषी सहायक प्रवीण माने यांनी त्यांना ओल्या हळदीचे लोणचे बनवून विकण्याचा सल्ला दिला. घरचा नमुना दाखवून लोणचे रेसिपीही आणून दिली. त्यातून ही गोष्ट आपल्याला जमू शकते असा विश्‍वास जगदाळे यांना आला. पत्नी शशिकला यांना मदतीला घेऊन ओल्या हळदीचे लोणचे थोड्या प्रमाणात बनवून पाहिले. शेजारीपाजारी, पाहुण्यांकडे नमुना देऊन गुणवत्तेचा आढावा घेतला. 

विक्रीला सुरवात ओल्या हळदीच्या लोणच्याचा नमुना घेऊन जगदाळे कृषी विभागाच्या कार्यालयात गेले असता प्रवीण माने आणि कृषी पर्यवेक्षक हिंदूराव मोरे यांनी कृषी विभागाच्या धान्य महोत्सवात भाग घेण्यास सांगितले. आता माघार घेऊन चालणार नव्हते. पत्नी तसेच गावातील दोन महिलांच्या मदतीने 50 किलो ओल्या हळदीचे लोणचे बनवले. मसाले व अन्य घटकांचे मापन करण्यासाठी इलेक्‍ट्रॉनिक वजनकाटा विकत आणला. अचूक प्रमाणात मसाले व घटक यांचे मिश्रण करून केले. 200 ग्रॅमची 250 पाकिटे तयार झाली. त्याचे लेबलिंग केले. प्रति पाकीट किंमत 40 रुपये ठेवली. धान्य महोत्सवात तीन दिवसांत 200 पाकिटे विकली गेली. ओल्या हळदीचे एक क्विंटल कंदही 50 रुपये किलो दराने विकले गेले. बाजारात ज्या हळदीपासून केवळ 20 रु. प्रति किलो असा दर मिळाला असता ती ओली हळद लोणच्याच्या स्वरूपात 200 रुपये दराने विकली गेली.
 
 हुरूप वाढला. अर्थशास्त्र प्रक्रियेचे (एक किलो हळद लोणच्यासाठी) 
- एका किलो हळद किसणे, काप करणे यासाठी 30 रु. मजुरी, लिंबूरस 250 ग्रॅम (एक किलो लिंबातून हा रस मिळतो.) त्याचे 60 रुपये, लाल मिरची, मोहरी डाळ, हिंग, प्रिझर्वेटिव्ह, मीठ यांचे 30 रुपये, तसेच लेबल व लेबलिंग मजुरी पंधरा रुपये असे एकूण खर्च- 135 रुपये. ओली हळद बाहेरून खरेदी केल्यास खर्च 50 रुपये प्रति किलो. लोणच्याची विक्री 200 रुपये किलोप्रमाणे केली जाते. खर्च वजा जाता 15 रुपये निव्वळ नफा विक्रीच्या कौशल्यामुळे जगदाळे यांना मिळतो.
 
संवादातून समजल्या ग्राहकांच्या अपेक्षा 
- जगदाळे प्रथमच प्रक्रिया करून शेतीमालाची विक्री करीत होते. त्यासाठी ग्राहकांशी बोलून हळदीच्या लोणच्याचे महत्त्व पटवून देत होते. ग्राहकांकडूनही हळदीच्या आरोग्य उपयुक्ततेविषयी माहिती मिळत होती. याविषयी मासिके, पुस्तकांतून माहिती संकलित केली. काही पुस्तके विकत आणली. पहिल्या दिवशी लोणचे विकत नेलेल्या ग्राहकांनी पुन्हा फेरी मारल्यावर तर आनंदाला पारावार राहिला नाही. तरीही धान्य महोत्सव संपताना 50 पॅकेट शिल्लक राहिली. त्यावर विचार सुरू केला. 

ग्राहकांच्या गरजेनुसार सुधारणा 
- ग्राहकांच्या अपेक्षा लक्षात घेऊन लोणच्यात सुधारणा सुरू केल्या. सुरवातीला हळद किसून लोणचे केले जायचे. त्यात तेल जास्त शोषले जाते. पाकिटात लोणचे कोरडे दिसते. त्याचाही विक्रीवर परिणाम होत असल्याचे जाणवले. लोणचे म्हटले, की डोळ्यांसमोर फोडी न येता तो कीस वाटत होता. लोणचे चमच्याने खाण्याची कल्पनाही लोकांना रुचत नसल्याचे जाणवले. पाकिटावरील लेबलही थोडे गडद रंगाचे होते. आकर्षक असले तरी लोकांवर त्याचा प्रभाव पडत नसल्याचे दिसले. तेलाचा किंचितही डाग लेबलवर असल्यास ग्राहक त्याला नापसंत करत असल्याचेही विक्रीवेळी लक्षात आले. 

...अशा केल्या सुधारणा - पॅकेट 200 ग्रॅमचे व किंमत 40 रुपये हे ग्राहकांना थोडे अधिक वाटले. त्यांच्यासाठी 100 ग्रॅमचे पॅकेट बनवले. मागणीनुसार विविध आकाराची पाकिटे बनविण्यास सुरवात केली. 
- ओली हळद किसून लोणचे बनविण्याऐवजी काप करण्याविषयी गावातील सुनंदा वाबळे यांनी सूचना केली. त्या पद्धतीत तेल शोषणही कमी झाले. पॅकेटमध्ये कोरडे न राहता तेलकट राहू लागल्याने लोणच्याची आकर्षकता वाढली. 
- काप किंवा चकत्या केल्याने लोणच्याच्या फोडीसारखा परिणाम दिसू लागला. 
- फिक्कट रंगाचे, पण आकर्षक नवीन लेबल बनवून घेतले. 

जगदाळेंकडे याही गोष्टी बनतात... 
- ओल्या हळदीची पेस्ट, ओल्या हळदीची पावडर, दिवाळीसाठी उटणे. 
-ओल्या हळदीच्या कापाचा वापर केलेली भजीही परिचितांत मोठ्या चवीने खाल्ली जातात. या भज्यांच्या विक्रीचा कायमस्वरूपी स्टॉल सुरू करण्याची जगदाळेंची इच्छा आहे. 

सातत्यपूर्ण कष्टातून वाढवली विक्री - औंध येथील अभिनव फार्मर्स क्‍लबच्या महोत्सवात 50 किलो ओल्या हळदीचे लोणचे दोन दिवसांतच विकले गेले. ओली हळद एक क्विंटल तर मागील महोत्सवातील शिल्लक 50 पाकिटेही विकली गेली. 
- शेवटच्या दिवशी सुमारे 10 किलोच्या ऑर्डर मिळाल्या. त्या पुढे पूर्ण केल्या. 
- सातत्याने विविध सरकारी खात्यांच्या कचेरीत जाऊन लोणच्याची विक्री केली. काही चांगल्या ऑर्डर मिळवल्या. 
- मुर्टी गावात मंगळवारच्या आठवडी बाजारात लोणच्याची विक्री होते. पुढील टप्प्यात जेजुरी व अन्य बाजारांतही लोणचे ठेवले जाणार आहे. 

आगामी नियोजन 
- दिवाळीच्या उटण्यासाठी बारामती परिसरातील काही शेतकऱ्यांशी तोंडी करार करून शीतगृहातील ओल्या हळदीचे आताच बुकिंग केले आहे. 
- ओली हळद (कच्चा माल) मिळविण्यासाठी पिकाला पाणी देऊनही ती ताजी ठेवण्याचा प्रयत्न आहे. 
- 30 जून ते 5जुलै कालावधीत बारामतीत शेतकरी व महिलांच्या बचत गटांच्या स्टॉलमध्ये सहभाग घेतला आहे. 

संपर्क - सतीश जगदाळे, 9730360110