Friday, July 20, 2012

संधी दुग्ध तंत्रज्ञानातील...


सध्याच्या काळात वैद्यकशास्त्र, अभियांत्रिकी, विज्ञान, वाणिज्य याचबरोबरीने विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांत नवनवीन अभ्यासक्रम उपलब्ध झाले आहेत, त्यापैकी एक महत्त्वाचा विषय म्हणजे दुग्ध तंत्रज्ञान. पहिल्यापासून शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायाकडे बघितले जात होते; परंतु बाजारपेठेतील दुग्धजन्य पदार्थांची वाढती मागणी आणि उपलब्ध होत असलेले नवनवीन तंत्रज्ञान पाहता या व्यवसायाने स्वतंत्र रूप घेतले आहे, त्यामुळे यातील संधी वाढताहेत. 

डॉ. ज्ञानेश्‍वर पतंगे 
भारतातील वार्षिक दूध उत्पादन 110 दशलक्ष टनांपेक्षाही जास्त आहे. दूध उत्पादनवाढीचा दर मंदीच्या काळातही 3.5 ते चार टक्केपर्यंत टिकून आहे. भारतीय आहारात दूध सेवनाला अत्यंत महत्त्व आहे. गेल्या काही वर्षांत देश तसेच परदेशांतही दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची मागणी वाढते आहे. ग्राहकाच्या आरोग्याच्यादृष्टीने स्वच्छ दुधाची निर्मिती आणि त्यावर योग्य प्रक्रिया ही महत्त्वाची गोष्ट आहे. यासाठी ग्राहकांपर्यंत दर्जेदार दुधाचे योग्य वितरण, योग्य पद्धतीने होण्यासाठी दुग्ध तंत्रज्ञान हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. दूध प्रक्रिया उद्योगातही आता चांगल्या संधी उपलब्ध होत आहेत. दुग्ध तंत्रज्ञान हा विषय बहुतांशी प्रमाणात अभियांत्रिकी या विषयावर आधारलेला आहे. यामध्ये जीव रसायन, सूक्ष्म जीवशास्त्र, प्रक्रियाशास्त्र आणि आहारशास्त्र हे विषयही शिकविले जातात. भारतीय दुग्धजन्य पदार्थ तयार करण्यासाठी यंत्रसामग्रीची निर्मिती, विविध प्रकारच्या दुग्धजन्य पदार्थांचे संशोधन व त्यांचे बाजारीकरण यामुळे मागील तीन दशकांत डेअरी उद्योगाने प्रगती केली आहे. 

दुग्धशास्त्रातील पदविका, पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम 1) पदविका अभ्यासक्रम - Indian Dairy Diploma (IDD) 
2) पदवी अभ्यासक्रम - बी. टेक. (दुग्धतंत्रज्ञान किंवा बी.एस्सी. दुग्धशास्त्र) 
3) पदव्युत्तर अभ्यासक्रम - M. Tech. / M.Sc. डेअरी तंत्रज्ञान, डेअरी मायक्रोबायोलॉजी, डेअरी केमिस्ट्री, डेअरी इंजिनिअरिंग. 
4) आचार्य पदवी (Ph.D) संबंधित विषयातील आचार्य पदवी. 

1) इंडियन डेअरी डिप्लोमा (IDD) हा अभ्यासक्रम देशात 1923 मध्ये प्रथम बंगलोर येथे सुरू करण्यात आला. नंतर तो अलाहाबाद, कर्नाल, मुंबई, हरिगट्टा आदी शहरांत सुरू करण्यात आला. कालांतराने हा अभ्यासक्रम पदवी म्हणजेच बी.टेक. किंवा बी.एस्सी. (दुग्धशास्त्र)मध्ये रूपांतरित करण्यात आला; परंतु आजही हा इंडियन डेअरी डिप्लोमा मुंबई येथे सुरू आहे. या अभ्यासक्रमाचा कालावधी दोन वर्षांचा आहे. 

पात्रता - 12 वी विज्ञान - PCM गटात कमीत कमी 50 टक्के गुण, तर इंग्रजी विषयात किमान 40 टक्के गुण आवश्‍यक आहेत. 
अभ्यासक्रमाची संलग्नता - हा अभ्यासक्रम मुंबईत आरे कॉलनीतील महाविद्यालयातून शिकवण्यात येत असून, तो महाराष्ट्र पशुविज्ञान व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूरशी संलग्न आहे. 
प्रवेशक्षमता - 40 विद्यार्थी. 

प्रवेश प्रक्रिया - - बारावीच्या निकालानंतर साधारणतः 15 दिवसांत स्थानिक वर्तमानपत्रांतून किंवा संबंधित महाविद्यालयातून / दुग्ध विज्ञान संस्थेतून प्रवेशाची जाहिरात प्रसारित होते. 
- विद्यार्थ्यास / उमेदवारास बारावीच्या गुणप्रतवारीनुसार प्रवेश दिला जातो. 
- आज महाराष्ट्रातील बहुतांश दुग्ध प्रक्रिया केंद्रांत याच विद्यालयातील विद्यार्थी कार्यरत असून, त्यांनी त्यांची गुणवत्ता व उपयुक्तता सिद्ध केलेली आहे. 
- अधिक माहितीसाठी................ www.mfsu.in या संकेतस्थळास भेट द्यावी.

2.) बी.टेक. किंवा बी.एस्सी. दुग्धतंत्रज्ञान अधिक क्षमतेचे दुग्ध प्रक्रिया केंद्र चालविण्यासाठी आणि या क्षेत्रातील नवनवीन आव्हाने आणि तंत्रज्ञान पेलण्यासाठी उच्च विद्या किंवा पदवी क्षेत्रातील मनुष्यबळाची गरज लक्षात घेऊन हा अभ्यासक्रम तयार करण्यात आलेला आहे. भारतात प्रथम 1957 मध्ये हरियाना येथील कर्नाल येथे डेअरी सायन्स कॉलेज सुरू करण्यात आले. आज मितीस आपल्या देशात साधारणतः डेअरी तंत्रज्ञानाची 16 महाविद्यालये आहेत, पैकी दोन महाविद्यालये महाराष्ट्रातील पुसद (ता. वरूड) व उदगीर (जि. लातूर) येथे आहेत. 
या सर्व महाविद्यालयांतील 25 टक्के प्रवेश भारतीय कृषी संशोधन परिषद (आयसीएआर), नवी दिल्ली यामार्फत होतात, तर उर्वरित जागा संबंधित महाविद्यालयाच्या विद्यापीठामार्फत भरल्या जातात. 

"आयसीएआर'मार्फत होणाऱ्या प्रवेशाची माहिती
- पात्रता - 12 वी विज्ञान शाखेस प्रवेश घेतलेले किंवा 12 वी विज्ञान परीक्षा उत्तीर्ण झालेले, PMC गट आवश्‍यक, भारताचे नागरिकत्व हवे. 
- वयोमर्यादा - वयाची किमान मर्यादा 17 वर्षे, तर कमाल मर्यादा -----93 वर्षे. 
- प्रवेशप्रक्रिया - "आयसीएआर'च्या संवर्गातून प्रवेश द्यावयाचा असल्यास "आयसीएआर'ने ठरवून दिलेली प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होऊन गुणवत्ता यादीत असणे आवश्‍यक आहे. 
- प्रवेश परीक्षेच्या अर्जाची उपलब्धता ः साधारणतः प्रत्येक वर्षी डिसेंबर - जानेवारी. 
- परीक्षेची तारीख - साधारणतः एप्रिलचा तिसरा आठवडा 
- निकाल - मे किंवा परीक्षेनंतर 20 ते 25 दिवसांत 
- प्रवेश - जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात 
- प्रवेश परीक्षेचा अभ्यासक्रम - 11 वी, 12 वी विज्ञानाच्या भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व गणिताचा अभ्यासक्रम. 
परीक्षा पद्धती - 
- परीक्षा बहुपर्यायी असून, एकूण 180 प्रश्‍न असतात. प्रत्येक प्रश्‍नास चार गुण असतात. चुकीच्या प्रत्येक प्रश्‍नास एक गुण कमी केला जातो. 
- परीक्षा उत्तीर्ण होऊन गुणवत्तेनुसार प्रवेश मिळाल्यास राष्ट्रीय प्रज्ञाशोध शिष्यवृत्ती 1000/- रु. प्रतिमहा एवढी मिळते. 

3) बी.टेक. दुग्धतंत्रज्ञान या विषयाची पदवी  
राज्यात वरूड (ता. पुसद) व उदगीर (जि. लातूर) येथील दुग्धतंत्रज्ञान महाविद्यालयात एकूण प्रत्येकी साधारण 32 प्रवेशक्षमता आहे. या महाविद्यालयांतून बी.टेक. दुग्धतंत्रज्ञान या विषयाची पदवी मिळते. येथे प्रवेश घेण्यासाठी खालील बाबी लक्षात घ्याव्यात. 
1) पात्रता - 12 वी विज्ञान शाखेत PCM गटामध्ये 50 टक्के गुण आवश्‍यक, इंग्रजीमध्ये 40 टक्के गुण आवश्‍यक. 
2) अभ्यासक्रमाची संलग्नता - हा अभ्यासक्रम महाराष्ट्र पशुविज्ञान व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूरशी संलग्न आहे. 
3) प्रवेशक्षमता - साधारण 32 जागा 
4) प्रवेश प्रक्रिया- 12 वी विज्ञानच्या एकूण गुणांच्या गुणवत्ता यादीनुसार प्रवेश दिला जातो. 
अ) अतिरिक्त गुण - ज्या विद्यार्थ्याकडे शेतीचा 7/12चा उतारा किंवा भूमिहीन शेतमजुराचा उतारा किंवा 12 वी असताना डेअरी सायन्स हा विषय असल्यास अतिरिक्त 20 टक्के गुण मिळतात. 
ब) प्रवेश दिनांक - 12 वीच्या निकालानंतर........... www.mafsu.in या संकेतस्थळावर आणि स्थानिक वर्तमानपत्रांतून प्रवेश प्रक्रियेची माहिती दिली जाते, तसेच पुसद येथील दुग्धतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या दूरध्वनी क्रमांक 07233 - 248696 या क्रमांकावर संपर्क साधावा. या व्यतिरिक्त महाराष्ट्रातील बऱ्याचशा महाविद्यालयांतून बी.एस्सी. दुग्धशास्त्र या पदवीचे धडे दिले जातात. 

आयडीडी व बी.टेक. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतरच्या संधी  
1) दुग्धप्रक्रिया प्रकल्पांतील संधी 
आजमितीस आपल्या देशात सुमारे 700 पेक्षा अधिक दुग्धप्रक्रिया प्रकल्प असून, या प्रकल्पांमध्ये वरील अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या उमेदवारांसाठी खालील संधी उपलब्ध आहेत. 
अ) आर्थिक दृष्टिकोनातून सक्षमरीत्या प्रकल्प चालविणे, ब) उत्पादनाचे व खर्चाचे सर्व तपशील हाताळणे, क) विविध प्रकारच्या प्रक्रिया दुधावर करून त्याचे विविध दुग्धजन्य पदार्थांत रूपांतर करणे व त्यास योग्य त्या वेष्टनात साठवणे, ड) पदार्थांच्या वितरणाचे योग्य नियोजन करणे... यासारख्या भरपूर संधी या क्षेत्रात उपलब्ध आहेत. 

2) दुग्धप्रक्रिया प्रकल्पांसाठी लागणाऱ्या उपकरणांसाठी व साहित्यनिर्मिती क्षेत्रातील संधी ः- 
आजही भारतात निर्माण होणाऱ्या दुग्धजन्य पदार्थांच्या प्रक्रिया केंद्रांत वापरण्यात येणाऱ्या उपकरणांची निर्मिती अधिक दर्जेदार होत असल्याने आज भारतीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठांत मोठी मागणी आहे. ही उपकरणे तयार करताना त्यांची आखणी करणे, उपकरणांचा आराखडा आणि निर्मिती सारख्या क्षेत्रात भरपूर संधी उपलब्ध आहेत. सध्या ग्राहकांकडून खवा तयार करण्याचे यंत्र, पनीर प्रेस मशिन, आइस्क्रीम निर्मिती यंत्रासाठी चांगली मागणी आहे. 

3) सल्ला सेवा 
दुग्धप्रक्रिया व्यवसायात रोजच नवनवीन प्रक्रिया तंत्रज्ञान, विविध नावीन्यपूर्ण दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती होत असते. बाजारात होणारे सर्व नवीन बदल, प्रस्थापित दूधप्रक्रिया प्रकल्पात अवलंबण्यासाठी तज्ज्ञांकडून सल्ला घेतला जातो. उच्चविद्या व चांगला अनुभव असणाऱ्या, तसेच संभाषणचातुर्य असणाऱ्या उमेदवारांस या क्षेत्रातदेखील चांगल्या संधी उपलब्ध आहेत. 

4) शिक्षण व संशोधन देशात असणाऱ्या 16 दुग्धतंत्रज्ञान महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी कौशल्यपूर्ण व उच्चविद्याविभूषित प्राध्यापकांची मोठ्या प्रमाणात गरज आहे. अशा प्रकारच्या महाविद्यालयांत व संशोधन सहायक यासारख्या क्षेत्रात संधी मिळू शकतील. 

5) उद्योगशीलता 
कौशल्यपूर्ण व शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलेला उमेदवार स्वतः दूधप्रक्रिया किंवा दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती करून स्वतःचा उद्योगधंदा चालवू शकतो. या उद्योगधंद्यात दुधापासून सायनिर्मिती, भारतीय दुग्धजन्य पदार्थ निर्मिती, आइस्क्रीम यासारखे लघुउद्योग सहज करू शकतो. त्यासाठी "एनडीडीबी' आणि इतर शासकीय संस्थांकडून आर्थिक मदत मिळत असल्याने या क्षेत्रातही उद्योग उभारणीची संधी पदवीधरांना उपलब्ध आहे.