Sunday, September 2, 2012

"ब्रॅण्ड'वर खपतात इस्राईलची द्राक्षे

शेतकरी, विक्रेता आणि ग्राहक अत्यंत चोखंदळ, तत्पर असल्याने इस्राईल व युरोपीय बाजारपेठेत शेतीमाल उत्पादने अत्यंत दर्जेदार असतात. बागेचे योग्य व्यवस्थापन केल्याने इस्रायली शेतकऱ्यास एकरी सरासरी 15 टन द्राक्ष उत्पन्न मिळते. निर्यातीच्या द्राक्षाप्रमाणेच स्थानिक विक्रीसाठी निकषांचे तंतोतंत पालन केले जाते. 

इस्राईलमध्ये इतर फळपिकांच्या प्रमाणेच द्राक्ष लागवडदेखील आहे. येथील द्राक्षे स्थानिक बाजारपेठेसह निर्यात केली जातात. इस्राईलमधील द्राक्ष शेतीमध्ये आधुनिक तंत्र पाहायला मिळते. द्राक्ष शेतीमध्ये दक्षिणेकडील लखीश फार्म आघाडीवर आहे. इस्राईलमध्ये मोशाव प्रकारात प्रत्येक जण आपापली शेती खासगी पद्धतीने करतो. खते, बी-बियाणे, कीडनाशके सहकारी संस्थेमार्फत पुरविली जातात. तसेच शेतकऱ्यांचा उत्पादित शेतीमाल सहकारी संस्थांच्या माध्यमातून अथवा समूहाने विक्रीसाठी पाठविला जातो. मोशावमध्ये किबूत्झप्रमाणे समानता नसून प्रत्येकास आपापल्या मालाच्या दर्जाप्रमाणे जो दर मिळेल तो कसलीही कपात न करता दिला जातो. या पद्धतीत 35 टक्के लोक शेती करतात. या ठिकाणी 2000 पासून द्राक्ष लागवड केली जात आहे. पूर्वी द्राक्षाच्या जंगली जातीची लागवड होती.

...अशी आहे द्राक्ष शेती 
लखीश भागात द्राक्ष बाग लागवडीसाठी चांगली जमीन आणि हवामान असल्याने 66 लोकांच्या मोशाव समूहाने 500 हेक्‍टर क्षेत्रात द्राक्षांच्या वेगवेगळ्या जातीची लागवड केली आहे. द्राक्ष बागेसाठी निवड केलेली जमीन हलकी असून सामू 7.5 आहे. जमिनीची खोली 20 ते 35 सें.मी. एवढी आहे. या ठिकाणी अर्ली स्वीट, सुपेरिअर, थॉमसन, सेव्हीयर, स्कॅलॉश या बियांच्या तर मस्कत, व्हाइट ग्लोब, जैनी या बियांच्या जातीची लागवड केली जाते. बिया असलेल्या जैनी जातीच्या द्राक्षांना मुस्लीम धर्मियांकडून चांगली मागणी आहे. इस्राईलमधील एकूण उत्पन्नाच्या 30 टक्के द्राक्षांचे उत्पादन लखीश फार्मवर होते. हा फार्म 80 वर्षांचे निवृत्त लष्करी अधिकारी सांभाळतात. त्यांचा एक मुलगा लष्करात तर दुसरा मुलगा त्यांच्याबरोबर शेती करतो. द्राक्ष बागेसाठी शासनाने पाण्याचा कोटा ठरवून दिला आहे. कोट्याप्रमाणे शेतकऱ्यास पाणी दिले जाते. शासनाने पुरविलेले 25 टक्के शुद्ध पाणी आणि प्रक्रिया केलेले 75 टक्के पाणी शेतीसाठी वापरले जाते. सध्या शेतीसाठी 1000 लिटर पाण्याचा दर 2.5 शकेल म्हणजे 36 रुपये आणि प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा दर 18 रुपये एवढा आहे. पाणी मोजून मापून दिले जात असल्याने उत्पादनाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत जपून वापरले जाते. 

येथील शेतकऱ्यांनी द्राक्ष मंडपाची उंची पाच फूट ठेवली आहे. दोन ओळींतील अंतर आठ फूट तर रोपातील अंतर तीन फूट आहे. द्राक्ष बागेस जास्त सूर्यप्रकाश मिळावा म्हणून Y स्वरूपातील मंडपाची रचना आहे. या रचनेमुळे बागेमधील भाग जास्तीत जास्त उघडा राहून पानांना जास्त सूर्यप्रकाश उपलब्ध होतो, हवा खेळती राहते. आपल्यासारखी द्राक्षवेलीची दोन वेळा छाटणी केली जात नाही. येथे उत्पादनासाठी एप्रिलमध्ये एकदाच छाटणी करून नोव्हेंबरपर्यंत उत्पादन मिळते. छाटणीपासून मंडपाच्या मधल्या भागातील फांद्या छाटून बाजूच्या फांद्यांच्या वाढीस चालना दिली जाते. द्राक्ष बागेवर दोन फूट संपूर्ण शेडनेट तर बाजूला कीड प्रतिरोधक जाळी असल्यामुळे बागेस ऊन, वारा किंवा कीटकांचा त्रास होत नाही. एका ठिकाणी 15 एकर क्षेत्रात द्राक्ष बाग असली तरी चार जातींची चार वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये लागवड केली आहे. वेगवेगळ्या जातींची लागवड केल्याने जास्त काळ द्राक्ष पुरवठा करणे शक्‍य होते. द्राक्ष बागेसाठी खतांचा वापर पूर्णपणे शिफारशीप्रमाणे न करता प्रत्येक शेतकऱ्याने स्वतःचे असे तंत्र विकसित केले आहे. 

संगणक प्रणालीचा वापर ः 
काड्यांची संख्या, मण्यांची विरळणी व इतर कामे आपल्यासारखी केली जातात. द्राक्ष बागातील सर्व यंत्रणा या संगणकाला जोडल्या आहेत. मातीत बसविलेल्या टेन्शीओमीटरद्वारे कमी जास्त झालेल्या पाण्याची संगणकाला माहिती दिली जाते. या माहितीनुसार संगणक पाणी यंत्रणा आपोआप कार्यान्वित करतो. कॅमेराद्वारे खते व पाण्याच्या विभाजनाची छायाचित्रे संगणकाला पाठविली जातात. त्यामुळे सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी दिलेली खते व पाण्याचे किती प्रमाणात मुळांनी शोषण केले आहे आणि किती पुरवठा केला आहे याची तंतोतंत माहिती मिळते. हंगामापूर्वी माती, पाण्याचे परीक्षण करूनच खत आणि पाण्याच्या मात्रा ठरविल्या जातात. बागेत यंत्राद्वारे कीडनाशकांची फवारणी केली जाते. लखीश येथील 15 एकर द्राक्ष बागेच्या व्यवस्थापनासाठी पाच प्रशिक्षित महिला कायमस्वरूपी कार्यरत होत्या. या महिलांना द्राक्ष व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात आले होते. त्यामुळे द्राक्ष शेतीमधील सर्व कामे योग्य वेळेत पूर्ण केली जातात. द्राक्षाच्या विरळणीच्यावेळी विशेष काळजी घेतली जाते. बागेतील स्वच्छता, खेळत्या हवेमुळे रोग व किडींचा प्रादुर्भाव खूप कमी असतो. जमिनी काही प्रमाणात चुनखडीयुक्त असल्याने वेगवेगळ्या रसायनांचे (सूक्ष्म अन्नद्रव्ये, रासायनिक खते, संजीवके) मिश्रण असलेल्या बॅग जमिनीत ठेवल्याने मुळांना हळूहळू दीर्घकाळ सर्व अन्नद्रव्ये उपलब्ध होतात. लखीश फार्मने तयार केलेली "कॉम्प्लेक्‍स बॅग' द्राक्ष उत्पादनवाढीच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त असल्याचे येथील शेतकऱ्यांनी सांगितले. पाणीपुरवठ्यासाठी द्राक्षवेलीच्या दोन्ही बाजूंस दोन लॅटरल्स बसविल्या आहेत. टेन्शीओमीटर असल्याने मुळांना गरजेएवढेच पाणी दिले जाते. संपूर्ण क्षेत्रास पाणी देण्यासाठी एका ठिकाणी अद्ययावत पाण्याची व्यवस्था बसवून त्याला संगणक जोडला होता. वेगवेगळ्या जाती, क्षेत्राची पाण्याची व खतांची गरज वेगळी असल्याने ठिकठिकाणी नॉब व व्हॉल्व्ह बसविलेले असतात. सर्व नॉब संगणक स्वयंचलित पद्धतीने कार्यान्वित करतो. 

शेतकऱ्यांच्या द्राक्ष बागेच्या जवळच द्राक्षाची प्रतवारी आणि पॅकिंगगृहाची सुविधा आहे. येथील शेतकऱ्यांनी 1000 टन क्षमतेचे शीतगृह उभारले आहे. लखीश फार्मच्या दर्जेदार उत्पादनात येथील विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांचा मोलाचा वाटा आहे. विद्यापीठाचे कीटकशास्त्र, रोगशास्त्रज्ञ व पीकशास्त्रज्ञ दर 15 दिवसांनी द्राक्ष बागेस भेट देतात. हवामान केंद्रांचा वेळोवेळी सल्ला घेतला जातो. शेतकरी, विक्रेता आणि ग्राहक अत्यंत चोखंदळ, तत्पर असल्याने इस्राईल व युरोपीय बाजारपेठेत उत्पादने अत्यंत दर्जेदार असतात. बागेचे योग्य व्यवस्थापन केल्याने इस्रायली शेतकऱ्यास एकरी सरासरी 15 टन उत्पादन मिळते. उत्पादित सर्व माल उच्च प्रतीचा असल्याने निर्यात मालासारखेच स्थानिक मालासाठीही निकषांचे तंतोतंत पालन केले जाते. आपल्यासारखे स्थानिक विक्रीसाठी वेगळी आणि निर्यातीसाठी वेगळी द्राक्षे अशी प्रतवारी या देशात नाही. शेतकऱ्यास स्थानिक ठिकाणी प्रति किलोस 50 ते 60 रुपये दर मिळतो. निर्यातक्षम द्राक्षास प्रति किलोस 120 ते 125 रुपये दर मिळतो. 

महाराष्ट्राला संधी : 
नाशिक, पुणे, सोलापूर, सांगली जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी आधुनिक द्राक्ष तंत्रज्ञान आत्मसात करून गुणवत्ता व उत्पादन वाढ साधली आहे. जागतिक बाजारपेठेत इस्राईल, चिलीबरोबरीने आपली स्पर्धा आहे. आपले शेतकरी द्राक्ष उत्पादनवाढीच्या दृष्टीने कल्पकतेचा वापर करीत असले, तरी गुणवत्तेत सातत्य राखले जात नाही. चिली, इस्राईलमध्ये एकरी सरासरी द्राक्ष उत्पादकता 15 ते 20 टन आहे. निर्यातक्षम द्राक्षाचे उत्पादन 90 टक्के आहे. आपल्याकडे एकरी उत्पादन 12 ते 15 टन असले तरी त्यापैकी फक्त 15 ते 20 टक्के द्राक्षे निर्यात योग्य असतात. हे चित्र बदलायचे असले तर अरब, युरोप देशांत तसेच न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया देशांत द्राक्ष निर्यातीचे कोणते निकष आहेत त्याप्रमाणे उत्पन्न घेण्याची गरज आहे. 

प्रगत देशात हवामान बदलाचे परिणाम त्वरित समजण्यासाठी प्रक्षेत्रावर स्वयंचलित हवामान यंत्रे बसविली आहेत. हवामानाचा अचूक अंदाज आल्याने रोग, किडी व वातावरणातील बदललेल्या घटकावर कमी खर्चात नियंत्रण करणे शक्‍य होते. आपल्याकडे विभागनिहाय स्वयंचलित हवामान केंद्रांची जलद गतीने उभारणी झाली पाहिजे. द्राक्षाची योग्य प्रतवारी, पॅकिंग व गुणवत्ता राखून परदेशात निर्यातीच्या संधी वाढविल्या पाहिजेत. 

"ब्रॅण्ड नेम'ने विक्री 
इस्राईलमध्ये लखीश फार्मची उत्पादने अत्यंत दर्जेदार समजली जातात. तेलअवीव, जेरुसलेम या ठिकाणी असलेल्या मोठ्या मॉलमध्ये लखीश फार्मची द्राक्षे विक्रीला असतात. द्राक्षाच्या बॉक्‍सवर "लखीश ग्रेप्स' असा शिक्का असतो. लखीश फार्मची उत्पादने गुणवत्ताक्षम व दर्जेदार असल्याने त्याला खूप मागणी असते. लखीश द्राक्षांना युरोपमध्येही चांगली मागणी आहे. द्राक्षाच्या बॉक्‍समध्ये चुकून डाग असलेली किंवा लहान-मोठी द्राक्ष भरली गेली असल्यास मॉल व्यवस्थापनाकडून लखीश फार्मला संपर्क केला जातो. लगेचच खातरजमा करण्यासाठी फार्मचे व्यवस्थापक स्वत: मॉलला भेट देऊन पुढील नियोजन करतात.