Sunday, September 2, 2012

बहुपयोगी पळस

पत्रावळीनिर्मिती, रंग उद्योग, लाख उद्योग, दोरनिर्मिती उद्योग, औषधीनिर्मिती उद्योगासाठी पळस फायदेशीर आहे. पळसाच्या "ल्युटीया' या जातीची फुले केशरी लाल ऐवजी पिवळी असतात. ही झाडे बागेमध्ये मुद्दामहून लावली जातात. "पळस वेल' नावाची दुसरी प्रजाती आहे. यास शास्त्रीय भाषेत "ब्युटीया सुपरबा' म्हणतात. याच्या फुलापासून पिवळा रंग मिळतो."फाबेशिया' कुळातील या वृक्षाला शास्त्रीय भाषेत "ब्युटीया मोनोस्पर्मा' या नावाने ओळखले जाते. हा मध्यम उंचीचा पर्णझडी वृक्ष भारतातील उष्ण व समशीतोष्ण जंगलामध्ये मुख्य वृक्ष म्हणून विंध्य, सह्याद्री, हिमालय पायथ्याचे जंगल इ. ठिकाणी आढळतो. ब्रह्मदेश, श्रीलंकेतही हा वृक्ष आढळतो. फुले लाल, केशरी रंगाची आणि पाने गळून गेलेल्या झाडावर येतात. त्यामुळे जंगलात जाळ निघाल्याचा भास उन्हाळ्यात होतो म्हणून या वृक्षास इंग्रजीत "फ्लेम ऑफ फॉरेस्ट' या नावाने ओळखले जाते. 

या वृक्षाचा डिंकाचा व्यापार "बेंगाल किनो' या नावाने चालतो म्हणून इंग्रजीत दुसरे नाव "बेंगाल किनो' असे आहे. हिंदीत ढाक, पलस, तेसू आणि संस्कृतमध्ये "पलाश' म्हणून पळसाच्या झाडाला ओळखले जाते. पळसाचे झाड 10-15 मीटरपर्यंत वाढते. पाने हिवाळ्यात गळून पडतात आणि वसंतात नवी येतात. ती येण्यापूर्वीच फुले येतात. फुले केशरी लाल गुच्छाने असतात. फुले पक्ष्यांच्या आकाराची दिसतात म्हणून यास "किंशुक' असेही म्हणता. शेंगांमध्ये एकच चपटे बी असते बीचा रंग काळसर बदामी असतो. 

रोपवाटिका आणि लागवड ः 
फेब्रुवारी-मार्च महिन्यांत फुले येऊन बियाणे एप्रिल-जूनपर्यंत परिपक्व होते. जमा केलेले बियाणे एक वर्षापर्यंत उगवते. लागवडीपूर्वी नाण्यासारखे असलेले चपटे बियाणे दोन-तीन तास कोमट पाण्यात ठेवावे, यामुळे 73 ते 90 टक्के रुजवा मिळतो. बियाणे पेरल्यानंतर उगविण्यासाठी 15 दिवसांचा कालावधी लागतो. चार महिन्यांच्या कालावधीत रोपे शेडनेटमध्ये केल्यास एक ते दोन फुटांची होतात. लागवडीसाठी हलकी, मध्यम निचऱ्याची जमीन वाढीसाठी अनुकूल असते. सुरवातीला वाढीचा वेग कमी असतो. खत, पाणी, तणनियंत्रण, आग व गुरे यापासून संरक्षण केल्यास झाडे चांगली वाढतात. लागवड 5 x 5 मीटर अंतराने करावी. बागबगीचे, रस्ते, कार्यालये, गायराने, ग्रामपंचायतीच्या रिकाम्या जागा इ. ठिकाणी या वृक्षाची मोठ्या प्रमाणात लागवड करून रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे शक्‍य आहे. 

उपयोग भाग ः पाने, फुले, बिया, मुळे आणि खोड. 

रासायनिक घटक ः या वनस्पतीच्या भागामध्ये "बट्रीन', आयसोबट्रीन, कोरिओपोसीन, सल्फुरेन इ. ग्लायकोसाईड्‌स असतात. 
उपयोग ः पानांचा उपयोग पुरातन काळापासून द्रोण, पत्रावळी बनविण्यासाठी होत आला आहे. पळसाची मुळे गरम पाण्यात उकळून सालीपासून धागे काढतात. त्यांचे दोरखंड बनविले जातात. बियांपासून पिवळे तेल मिळते. तेही औषधात वापरले जाते. फुलापासून केशरी लाल रंग मिळतो त्याचा उपयोग कपड्यांना रंग देण्यासाठी होतो. खोडाचा उपयोग खोकी-फळ्या करण्याकरिता केला जातो. पळसाच्या खोडावर लाखेचे किडे चांगले वाढतात. खोडामधून डिंक मिळतो. तो लालसर रंगाचा असतो. डिंक आणि बियांचे चूर्ण पोटातील किडे पाडण्याकरिता केला जातो. मूत्राशयाचे विकार, किडनीचे विकार इ. मध्ये फुलांचा वापर केला जातो. 

उपवनांची निर्मिती ः 

शेतीमध्ये अन्न, वस्त्र, निवारा इ.साठी लागणारी वनश्री सांभाळली जाते, वाढविली जाते म्हणून शेती हे उपवनांचे उत्तम उदाहरण आहे. बागा, उद्याने इ. मध्ये आवश्‍यकतेनुसार उपयुक्त वनश्रीचे संवर्धन होऊ शकते, यानुसार याची नावे आपणास देणे शक्‍य आहे. जसे अशोक वृक्षांची लागवड यास "अशोकवन'; वेलीची लागवड "लतावन'; औषधी वृक्षांची, वनस्पतींची लागवड "औषधी वाटिका'; विविध ऋतूंमध्ये फुलणारी वृक्षप्रजाती लागवड यास "ऋतूवन'; आपल्या राशीवृक्षाचा संग्रह यांस "राशीवन' आणि नक्षत्र वृक्षाची शास्त्रीय पद्धतीने लागवड यास आपण "नक्षत्रवन' असे संबोधतो. अशा पद्धतीने वनश्रींचे उपयोग, अढळ, उत्पत्तीस्थान, धार्मिक, आध्यात्मिक महत्त्व इ. वरून निर्मिती केलेल्या उपवनांस आपण नाव देऊ शकतो. शहरांमध्ये मान्यवरांच्या स्मृतिप्रीत्यर्थ वनांची लागवड केली जाते, यांस आपण स्मृतिवन असे संबोधतो. उपवनाचा विस्तार एखाद्या घरातल्या लहानशा बागेपासून शेकडो एकरांच्या वनसदनापर्यंत असू शकतो. अशी उपवने नजीकच्या काळात पशू-पक्ष्यांसाठी आश्रयस्थाने तर आहेतच; परंतु जैविक विविधता संवर्धन, जतनासाठीही तेवढीच उपयोगी आहेत. वाढणारी लोकसंख्या त्यासाठी लागणारे इंधन, प्राणवायू, उपजे, लाकूड इ. आपणास उपवनापासून प्राप्त होऊ शकते. याचबरोबर आपला परिसरही आपण रम्य, सुशोभित करू शकतो. गावांच्या सामाईक जागा, शाळा, महाविद्यालये, मंदिरे, कार्यालये, गायराने, नद्या, काठ, रस्ते इ. ठिकाणी आपण उपवने निर्माण करू शकतो.