Monday, June 11, 2012

संत्रा बागेत केले कपाशीचे पीक यशस्वी


अमरावती जिल्ह्यातील नेरपिंगळाई येथील एका शेतकऱ्याने नवीन संत्रा बागेत कापसाचे आंतरपीक घेऊन चांगले उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला आहे. फरदडसहित एकरी 35 क्विंटल उत्पादन त्यांनी घेतले. कापसाला दरही चांगला मिळाल्याने हे पीकही आर्थिकदृष्ट्या किफायतशीर ठरले आहे. 
प्रा. जितेंद्र दुर्गे,  प्रा. डॉ. विजेंद्र शिंदे 

बीटी कपाशीचे उत्पादन वाढवण्यासाठी अनेक शेतकरी विविध पद्धतीने प्रयोग करताना दिसत आहेत. 
यामध्ये काहीजण लागवडीचे अंतर बदलून पाहतात, तर काहीजण ठिबक सिंचन, तसेच खते, पीक संरक्षण, सूक्ष्म 
अन्नद्रव्ये, लाल्या विकृतीचे नियंत्रण यावर अधिक भर देऊन उत्पादनवाढ साधण्याचा प्रयत्न करतात. 

अमरावती - मोर्शी रोडवरील नेरपिंगळाई हे गाव तसे पाहिले तर पिंगळाई देवीचे मंदिर, तसेच भाजीपाला उत्पादनासाठी पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. भाजीपाला पिकांसोबतच या भागात संत्रा, सोयाबीन, तसेच कपाशीचे पीकसुद्धा घेतले जाते. गावातील प्रगतिशील शेतकरी गोपाल दामोदर शार हे परिसरात कपाशीसोबतच सर्वच पिकांचे चांगले उत्पादन घेण्यासाठी प्रसिद्ध आहेत. गेल्या 30 वर्षांपासून ते शेती करतात. बीटी कपाशी घेण्यापूर्वी ते कपाशीचे एकरी 20 क्विंटलपर्यंत उत्पादन घेत असत. आताही बीटी कपाशी घेऊ लागल्यापासून त्यांनी उत्पादन चांगले ठेवण्यात सातत्य ठेवले आहे. शार यांची एकूण जमीन सुमारे साडेपाच एकर आहे. त्यामध्ये ते कपाशीसोबत सोयाबीन, मिरची, कांदा, भुईमूग आदी पिके घेतात. पाण्यासाठी त्यांच्याकडे विहिरीची सोय आहे. ठिबक सिंचनाच्या ऐवजी त्यांनी स्प्रिंकलरची सोय केली आहे. सन 2009 मध्ये त्यांनी संत्रा बाग लावली. हे क्षेत्र सुमारे अडीच एकरांपर्यंत आहे. या नव्या बागेत सध्या उत्पादन घेण्यासाठी नगदी पिकाचा प्रयोग करण्याचे त्यांनी ठरवले. त्याप्रमाणे 5.5 × 1.5 फूट या लागवडीच्या अंतरानुसार बीटी कपाशीची आंतरपीक म्हणून लागवड केली. शार शक्‍यतो पूर्वहंगामी लावणीवर अधिक भर देतात. मागील वर्षाच्या खरिपात मेचा अखेरचा आठवडा ते जूनचा पहिला आठवडा या दरम्यान त्यांनी कपाशीचे नियोजन केले. लागवड कोरड्यात करून घेतली. दोन झाडांतील दीड फूट अंतरानुसार एका ठिकाणी एक बी डोबून घेतले. त्यानंतर स्प्रिंकलरच्या साहाय्याने शेत ओलावून घेतले व कपाशीची उगवण करून घेतली. 

उगवणीनंतर तीन - चार दिवसांनी स्प्रिंकलरच्या साहाय्याने हलके पाणी दिले. उगवण झाल्यानंतर रासायनिक खताचा पहिला डोस दिला. कपाशीचे पीक साधारणतः 30 दिवसांचे झाले असताना दोन ओळींच्या मधोमध गाळ पाडून घेतला व कपाशीचे पीक गादीवाफ्यावर करून घेतले. यामुळे दोन प्रकारचे फायदे झाले. पावसाच्या पाण्याचे मूलस्थानी संवर्धन शक्‍य झाले, तसेच पाटपाण्याच्या माध्यमातून ओलित करण्याची सोय झाली. तसेच, स्प्रिंकलरचे पाइप टाकण्यासाठी नालीचा उपयोग करता आला व झाडांना इजा होण्याचा धोका कमी झाला. कपाशीचे पीक साधारणतः तीन - चार फूट उंचीचे झाल्यानंतर (लागवडीपासून साधारणतः 65 दिवसांनी) झाडांचे शेंडे खुडून घेतले. यामुळे फळफांद्यांच्या संख्येत वाढ झाली, तसेच दोन कांड्यांमधील अंतर कमी राखले गेले. झाडांचे बूड तसेच मुख्य खोड जाड झाले, त्यामुळे कपाशीचे झाड बोंडांचे वजन सहन करू शकले. फळफांद्यांची संख्या वाढल्यामुळे आपोआपच पात्या, फुलांच्या संख्येत वाढ शक्‍य झाली. फळफांद्या येण्याच्या अवस्थेला रासायनिक खतांचा दुसरा डोस दिला. त्यानंतर कपाशीचे पीक पात्या-फुलांवर असताना रासायनिक खतांचा तिसरा डोस दिला. अशाप्रकारे रासायनिक खतांचे व्यवस्थापन करताना खतांची मात्रा तीन वेळा विभागून दिल्यामुळे पिकाला आवश्‍यक असलेली अन्नद्रव्ये योग्य वेळी उपलब्ध झाली. त्यामुळे पिकाच्या जोमदार व बळकट वाढीसाठी फायदा झाला. कपाशी पिकाचे रस शोषण करणाऱ्या किडींपासून, तसेच बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण करण्याकरिता कीटकनाशक तसेच बुरशीनाशकाची वेळोवेळी फवारणी केली. त्याचबरोबर वाढनियंत्रक, सूक्ष्म अन्नद्रव्यांचाही वापर आवश्‍यकतेप्रमाणे केला. आंतरमशागतीकरिता निंदण, डवऱ्याचे फेर, तसेच तणनाशकाची फवारणी यांचाही योग्य समन्वय साधला. अशाप्रकारे पिकाच्या आवश्‍यकतेनुसार योग्य लागवड व्यवस्थापनाच्या माध्यमातून एकरी क्षेत्रात सुरवातीच्या टप्प्यात व फरदड पिकाचे सुमारे सहा क्विंटल असे एकूण 35 क्विंटल उत्पादन, तर दोन एकरांतून सुमारे 70 क्विंटल उत्पादन त्यांना मिळाले. अलीकडील वर्षांत एकरी किमान 25 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळवण्याचा प्रयत्न शार यांनी केला आहे. कापसाला सुरवातीच्या टप्प्यात 4100 रुपये प्रति क्विंटल, तर त्यानंतर 3800 ते 3900 पर्यंत दर मिळाला. दोन एकर क्षेत्रातून सुमारे दोन लाख 80 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. दोन एकरांकरिता उत्पादन खर्च सुमारे 59,400 रुपये आला. खर्च वजा जाता दोन एकरांतून सुमारे 2,20,600 रुपये निव्वळ नफा मिळविला. 

संत्रा पिकाला असलेला भाव पाहून हे पीक परवडेल असे शार यांना वाटते. त्यांच्या परिसरात सोयाबीन हे पीकही घेतले जाते. मात्र, या पिकाच्या तुलनेत कापसाला मिळत असलेला भाव, त्याचे उत्पादन यांचा विचार करता आर्थिकदृष्ट्या हे पीक फायदेशीर होत असल्याचा अनुभव शार यांना मिळाला आहे. यंदाही बीटी कपाशी घेणार असून, अधिक उत्पादनवाढीचे उद्दिष्ट ठेवल्याचे त्यांनी सांगितले. 

शार यांना आलेला उत्पादन खर्च साधारणपणे असा - 
दोन एकरांकरिता जमा - खर्च (रुपये) 

- जमिनीची पूर्वमशागत - 3000/- 
- बियाणे - 1900 
- लागवड मजुरी - 1100 
रासायनिक खते - 9000 
निंदण (तीन वेळा) - 2400 Agriculture Information
डवरणी (चार वेळा) - 2000 
तणनाशक (मजुरीसहित) - 1200 
ओलित (नऊ वेळा) - 3000 
पीक संरक्षण (मजुरीसहित) - 7800 
फरदडसह वेचणी (नऊ वेचण्या) - 28000 
एकूण लागवड खर्च रु. 59,400 रु. 

कपाशीचे मिळालेले उत्पादन 70 क्विंटल 
मिळालेला दर प्रति क्विंटल - 4000 
मिळालेले उत्पन्न - 2,80,000 रु. 
निव्वळ नफा रु. 2,20,600 
ref. link : http://www.agrowon.com/Agrowon/20120612/4623058111462907262.htm