Thursday, April 5, 2012

ठिबकद्वारे खते देण्याची कोणती यंत्रणा असते?

ठिबक सिंचनाचे फायदे पूर्णत: मिळण्यासाठी पिकास आवश्‍यक असलेली खते ठिबक संचाद्वारे देणेच जास्त योग्य. सिंचनाच्या पाण्यासोबतच खते देण्याच्या या प्रक्रियेस फर्टिंगेशन म्हणतात. ठिबक सिंचनाद्वारे खते देण्यासाठी खताची टाकी (फर्टिलायझर टॅक), व्हेंच्युरी, फर्टिलायझर इंजेक्‍शन पंप व एचटीपी पंप वापरले जातात.

खताची टाकी (फर्टिलायझर टॅंक)
यामध्ये एक स्टीलची/ लोखंडी टाकी फिल्टरच्या पूर्वी (इनलेटला) जोडलेली असते. या टाकीचे कार्य व रचना सोपी असते. या टाकीमध्ये खताचे द्रावण किंवा विद्राव्य खते ठिबक सिंचनामधून पाण्याबरोबर दिली जातात.
खताच्या टाकीची क्षमता 60 लिटरपासून 100 लि. पर्यंत असते. फक्त टाकीमधील पाणी उलट प्रवाहाच्या दिशेने विहीर, तलाव, नदी आदी पाण्याच्या स्त्रोतामध्ये मिसळू नये यासाठी वितरण नळीवर नॉन रिटर्न व्हॉल्व्ह (झडप) बसविणे आवश्‍यक आहे. फर्टिलायझर टॅंकरद्वारे खते देण्याची पद्धत सर्वांत सोपी असली तरी त्यामुळे सर्व झाडांना समप्रमाणात खते दिली जात नाहीत.

व्हेंच्युरी
व्हेंच्युरीद्वारे खते देणे ही सर्वांत योग्य, कार्यक्षम, खात्रीशीर व सोपी पद्धत. व्हेंच्युरी हे अत्यंत सोपे व योग्य साधन असून सर्वसाधारण शेतकऱ्यांना परवडण्यासारखे आहे. याचा उपयोग खते देण्यासाठी व आम्ल व क्‍लोरिन प्रक्रिया करण्यासाठीही केला जातो. व्हेंच्युरी ही फिल्टरच्या पूर्वी बसवून यामध्ये पाणी देण्याच्या मुख्य पाइपला व्हेंच्युरी जोडली जाते. खतमिश्रीत पाण्यात व्हेंच्युरीचे एक टोक सोडून दुसरे टोक मुख्य पाइपला जोडले जाते. मुख्य पाइपवरील व्हॉल्वच्या साहाय्याने दोन्ही बाजूंनी पाण्याच्या दाबामध्ये फरक निर्माण केला जातो व खतमिश्रित पाणी मुख्य प्रवाहात हळूहळू सोडता येते. व्हेंच्युरीच्या शोषणाचा दर व्हेंच्युरीच्या आकारानुसार 30 ते 1500 लिटर प्रती तास एवढा असतो. हा दर पाइपलाइनवर बसविलेल्या व्हॉल्व्हद्वारे कमी जास्त करता येतो. व्हेंच्युरीच्या आत जाणारे पाणी व बाहेर येणारे खत मिश्रित पाणी यांच्या मार्गाजवळ दाब अनुक्रमे 1.5 कि.ग्रॅम आणि 0.75/1 कि. ग्रॅम प्रती चौ.से.मी. असावा. व्हेंच्युरी इंजेक्‍टर हे 0.75 1.0, 1.5 व 2 इंच आकारामध्ये उपलब्ध असतात. पाण्यात विरघळणारी सर्व खते या प्रक्रियेने पिकांना देता येतात.

फर्टिलायझर इंजेक्‍टर पंप
या प्रकारामध्ये खतांचे द्रावण टाकीत किंवा बादलीत तयार केले जाते व इंजेक्‍टर पंपाच्या साहाय्याने ठिबक सिंचनाद्वारे पिकांना दिले जाते. सध्या बाजारात या पंपाचे तीन मॉडेल उपलब्ध आहेत. त्यांचा खते शोषून घेण्याचा दर ताशी 40, 160 व 400 लिटर एवढा आहे. फर्टिलायझर इंजेक्‍टर पंपाने पिकांना योग्य तीव्रतेची व अत्यंत तंतोतंत दिली जातात.

एचटीपी पंप
शेतकऱ्यांकडे उपलब्ध असणारा एचटीपी स्प्रे पंप वापरून देखील विद्राव्य खते ठिबक सिंचनामधून देता येतात. यासाठी खताचे द्रावण किंवा विद्राव्य खते, पंपाने शोषण करून ठिबक संचाच्या मुख्य पाणी पाइपमध्ये मिसळण्यात येतात व पिकांना पाण्याबरोबर दिली जातात.
फर्टिगेशनसाठी वापरल्या जाणाऱ्या विद्राव्य खतामध्ये खालील गुणधर्म असणे आवश्‍यक आहे,
- विद्राव्य खते संपूर्णपणे पाण्यात विरघळणारी असावीत.
- विद्राव्य खते आम्लधर्मी असावीत.
- विद्राव्य खते घन स्वरूपात उपलब्ध असावी यामुळे हाताळणी व वाहतूक करण्यासाठी सुलभ असतात.
- विद्राव्य खते क्‍लोराईडस व सोडियमसारख्या हानिकारक मूलद्रव्यांपासून मुक्त असावीत.
- विद्राव्य खते पाण्यात विरघळल्यावर साका तयार होऊ नये.
- विद्राव्य खतामध्ये दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्ये उपलब्ध असावीत.

Source link: http://www.agrowon.com/Agrowon/20120323/5360225276973058954.htm