Sunday, October 14, 2012

द्राक्ष रस हृदयरोगासाठी फायदेशीर

अल्कोहोल असलेल्या वाइनपेक्षा द्राक्षाचा रस हृदयरोगाचा धोका असलेल्या व्यक्तींसाठी अधिक फायदेशीर ठरत असल्याचे दिसून आले आहे. द्राक्ष रसाच्या सेवनामुळे माणसाच्या हृदयरोगाचा धोका असलेल्या माणसांमध्ये रक्तदाब कमी होत असल्याचे संशोधनात आढळले असून, हे संशोधन "अमेरिकन हार्ट असोसिएशन'च्या "जर्नल सर्क्‍युलेशन रिसर्च'मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. 


हृदयरोगासाठी अल्कोहोलचा वापर फायद्याचा असे मानले जात होते. मात्र त्या इतकेच, किंबहुना अल्कोहोल नसलेल्या द्राक्ष रसाचा वापर चार आठवड्यांसाठी केल्यास फायद्याचा ठरतो. या संशोधनासाठी मधुमेह असलेल्या किंवा हृदयाचे दोन, तीन धक्के बसलेल्या 67 व्यक्तींवर अभ्यास करण्यात आला. त्यांना खाण्यामध्ये नेहमीचे खाद्य आणि रेड वाइन, अल्कोहोल नसलेली रेड वाइन व जीन देण्यात आली. या प्रमाणे चार आठवड्यांसाठी प्रत्येक माणसाच्या आहाराचे नियोजन करण्यात आले. 

संशोधनपत्रिकेमध्ये दिलेल्या माहितीनुसार, रेड वाइनमध्ये असलेल्या अल्कोहोलमुळे माणसांच्या रक्तदाबाच्या शक्‍यता कमी होतात. मात्र अल्कोहोल काढून घेतल्यानंतर शिल्लक राहत असलेल्या पॉलिफिनॉल घटक हे आरोग्यासाठी चांगले असल्याचे दिसून आले आहे. तसेच अल्कोहोल नसलेल्या रेड वाइनमुळे शरीरातील नायट्रिक ऑक्‍साईडचे प्रमाण वाढते. या नायट्रिक ऑक्‍साईडमुळे शरीरातील रक्त नलिकांवरील ताण नाहीसा होऊन शांत होतात. त्यामुळे हृदयापर्यंत व हृदयामार्फत अन्य अवयवांना अधिक प्रमाणात रक्त पुरविले जाते. परिणामी रक्तदाब कमी होत असल्याचे दिसून आले आहे.